Colorful Bastar – Part 6 – Forests of Kanger Valley | विविधरंगी बस्तर – भाग ६ – कांगेर खोऱ्याचे अरण्यवैभव

हळूहळू शेती मागे पडली आणि आम्ही रानात शिरलो. एव्हाना इवलासा वाटणारा तो ओहोळ आता एका खोडकर ओढ्यात रुपांतरीत झाला होता. हा ओढा वाट्टेल तसा खडकांना कापत नि धरणीला चिरत गर्द झाडीतून सुसाट वाहत चालला होता. आमची सारी भ्रमंती आता याच्याच साथीने होणार होती. वाट उताराची होती. दोन्ही बाजूंनी गच्च गवत वाढले होते. इथे जळवा नाहीत ना याची दोन-तीन वाटाड्यांकडून खातरजमा करून घेतली. मागच्या वेळचा तांबडी सुर्ला मधला अनुभव गाठीशी होताच. थोड्या वेळातच पाण्याचा आवाज वाढल्यासारखा वाटला. काही पावलं पुढे गेलो नी पाहतो तर काय, गर्द रानाच्या मधोमध एक निळा-सावळा डोह दिसत होता. आजूबाजूच्या खडकांवरून ओढ्याचे पाणी त्यात खिदळत उड्या घेत होते. काठाने वाढलेले प्रचंड वृक्ष आपल्या दाट पर्णसंभाराचे छत्र त्या डोहावर अलगद धरून उभे होते. काही वेगळीच गूढ शांतता तिथे भरून राहिली होती.