बाली – इंडोनेशिया या अगणित बेटांच्या देशातील एक लहानसे नयनरम्य बेट. तसं बाली पर्यटनाच्या नकाशावर जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे फारशी ओळख करून द्यायची गरज नाही. पण उपचारापुरती या बेटाची काही वैशिष्ट्ये सांगतो. बेट असल्याने इथे सुंदर समुद्रकिनारे तर आहेतच, पण मध्यवर्ती भागात एक नव्हे तर तीन ज्वालामुखी आहेत. यांपैकी अगुंग आणि बतूर सक्रीय आहेत. बालीच्या आजूबाजूचा समुद्र हा सागरी जैव विविधतेने युक्त असून इथे अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हिंदू परंपरा आणि चालीरीतींचा प्रभाव असलेला इथला समाज. बालीमध्ये पर्यटनाला साधारण १९६० च्या दशकात सुरुवात झाली. अल्पावधीतच हे लहानसे बेट आशिया खंडातले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले. सागरी क्रीडाप्रकार, ट्रेकिंग, किनाराभ्रमंती, पार्टिंग आणि नाईटलाईफ, किंवा अगदी कौटुंबिक सहल, असा कोणताही पर्यटन प्रकार बालीसाठी त्याज्य नाही. मग तुम्ही बॅकपॅकर असा किंवा हनिमूनर, बालीमध्ये तुमच्यासाठी काही ना काही आहेच. तर असे हे वैशिष्ट्यपूर्ण बेट माझ्या बकेटलिस्ट वर बऱ्याच वर्षांपासून होते.