पुढच्याच आठवड्यात जर्मनी विरुद्ध अर्जेन्टिना असा अंतिम सामना होता. जर्मन लोकांत जणू उत्साहाचं वारं शिरलं होतं. सगळ्यांचे प्लॅन बनत होते. मीही एक भारतीय मित्र आणि त्याच्या ग्रुपसोबत जायचं ठरवलं. या वेळी बार माझ्या घरापासून तसा लांब होता. तसा मी कायम सायकलीने फिरायचो. पण आज अंतिम सामना म्हटल्यावर पोलीस बंदोबस्त असेल. मग बारमधून निघताना कोणी पकडलं तर? उगाच कशाला रिस्क? असा विचार करून मी सरळ ट्राममध्ये चढलो. यथावकाश सामना सुरु झाला.