युरोपियन लोकांची ही फिरण्याची तऱ्हा मला कायमच अचंबित करते. हे लोक फिरतात ते जग समरसून अनुभवण्यासाठी. उगीच पळापळ नाही. आणि ग्रुपने येऊन अंताक्षरी किंवा हाऊजी असला धांगडधिंगा नाही. आपलं आपण फिरायचं, स्थानिक लोकांची जीवनपद्धती बघायची, फोटो वगैरे काढायचे आणि एक समृद्ध अनुभव गाठीशी बांधून परत जायचं. मला कधी असं फिरायला जमेल का याचा विचार मी करू लागलो. पण लक्षात आलं की आपला पिंडच मुळी भटका आहे. एका जागी असे दोन-चार दिवस काही न करता घालवणं हे सर्वथा अशक्य आहे. असो. ज्याची त्याची फिरण्याची तऱ्हा न्यारी. मी काकांना विचारलं तुमचं इनस्टाग्राम किंवा फेसबुक वर प्रोफाइल आहे का. यावर ते हसायला लागले. या नव्या पिढीच्या गोष्टी काही जमत नाहीत आपल्याला असं सांगू लागले. मला एकदम आई-बाबांची आठवण झाली. देश कोणताही असो माणसं सारखीच असतात. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला मुठीत घेऊन जगभर संचार करणारी आमची पिढी आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मागे न धावताही आयुष्यातले सगळे क्षण भरभरून जगणारी ही मागची पिढी. काय गंमत आहे नाही!