Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 3 – Nirvana Beach and a beautiful sunset | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग ३ – निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त

बीच आणि टेकडी हा क्रम आता नित्याचाच झाला होता. एक बीच संपला की खडकाळ टेकडी येणार आणि ती उतरली की पुन्हा बीच हे आता सगळ्यांना पाठ झाले होते. पण त्या टेकड्यांमुळेच ट्रेकच्या मार्गात वैविध्य येत होतं. उंचीवरून बीच आणि आजूबाजूच्या परिसराचा रम्य देखावा दिसत होता. चढ-उतार करण्यात दमछाक होत होती तो भाग वेगळा. पण ट्रेकिंग म्हटलं की दमछाक आलीच. कडले बीचवरची फोटोग्राफी संपवून आम्ही पुढे निघालो होतो. पुढच्या टेकडीवर बऱ्यापैकी झाडं दिसत होती. झाडांतून वाट काढत आम्ही थोड्या मोकळ्या पठारावर आलो. इथून पुढे वाट एका कड्यावरून जात होती. डाव्या हाताला फेसाळलेला समुद्र कड्यावर आदळत होता. आता वाराही भन्नाट सुटला होता. समुद्राच्या त्या धीरगंभीर आवाजात आणि बेभान वाऱ्यात उन्हाची तीव्रता कमी भासत होती. थोडे अंतर गेलो आणि समोर अचानक तो कडा तुटल्यासारखा भासू लागला. वाट चुकलो की काय? पण पुढे जाताच लक्षात आलं की वाट उजवीकडे वळून खाली बीचवर उतरत होती. आणि समोर अत्यंत रम्य असा निर्वाणा बीच पहुडलेला होता.
 
आतापर्यंत या ट्रेकमध्ये पाहिलेले बीच काहीसे अंतर्वक्र, मधेच खडकाळ असे होते. हा मात्र एकसलग, एका रेषेत पसरलेला वाळूचा किनारा होता. मध्ये कसलाच व्यत्यय नसल्याने समुद्राच्या लाटा संथपणे किनाऱ्यावर येऊन विसावत होत्या. समुद्रात दूर कुठेतरी एक पांढरी रेघ निर्माण होत होती आणि किनाऱ्याशी समांतर राहण्याचे वचन पाळत एका लयीत वाळूशी एकरूप होत होती. मग मागून लगेच दुसरी रेघ. त्याच्यामागून तिसरी. लाटांचा हा खेळ इथेच बसून बघत रहावा असे वाटत होते. तापत्या उन्हातून खडकाळ टेकड्यांवर केलेली पायपीट इथे सार्थकी लागल्यासारखी वाटत होती. बीचवर अक्षरशः कुणीच नव्हते. आमच्याच ग्रुपमधले पुढे गेलेले काही लोक दूरवर चालताना दिसत होते. त्यांची वाळूत उमटलेली पावलं एवढाच काय तो मानवी अस्तित्वाचा पुरावा त्या किनाऱ्यावर दिसत होता. आम्ही मागे राहिलेले काही जण तिथे बसून फोटो काढू लागलो. किती काढू तितके कमीच. शेवटी लीडर ओरडायला लागल्यावर आम्ही कॅमेरा आवरता घेतला. 
 
कड्यावरून खाली उतरून आता आम्ही बीचवरून चालू लागलो. इथल्या मऊसूत वाळूत पाय रुतत होते. बूट काढून चालावे तर गरम वाळूत पाय पोळत होते. शेवटी आम्ही ओल्या वाळूवरून अनवाणी चालू लागलो. इथली ओळी वाळू ऊबदार लागत होती. मधेच एखादी खट्याळ लाट पायांवर येत होती. ओल्या वाळूवर खेकड्यांची घरटी दिसत होती. त्यातून अधूनमधून खेकडबाळे डोकावत होती. आम्ही जवळ गेलो की झपकन आपल्या इवल्याशा बिळात शिरत होती. त्यांच्या वाकड्या चालीने वाळूवर सुरेख नक्षी उमटलेली दिसत होती. आम्ही एका लयीत चाललो होतो. जणू काही आमची चाल लाटांच्या लयीशी एकरूप झाली होती. निर्वाणा बीच एकूण ४-५ किमी लांबीचा होता. त्यातले ३ किमी आम्हाला चालायचे होते. उन्हामुळे आणि वाळूमुळे सगळ्यांचाच वेग मंदावला होता. जवळचे पाणी संपले होते. घशाला कोरड पडली होती. आधीच टेकड्या चढून दुखावलेले पाय आता वाळूत चालून अजूनच बोलायला लागले होते. आता मात्र कधी एकदा वाळू संपतेय असं झालं होतं. 
 
बीचवरची फोटोग्राफी (सौजन्य – प्रणीत धुरी)
 
शेवटी एकदाचा गावाकडे जाणारा रस्ता दिसला. आम्ही बीचवरून बाहेर पडून डांबरी रस्त्यावर आलो. तिथून अर्धा-एक किलोमीटरवर मुख्य रस्ता लागला. इथून बसने आम्ही अघनाशिनी जेट्टी पर्यंत जाणार होतो. बसची वाट बघत आम्ही तिथे रस्त्यातच बसकण मारली. नेहमीच्या गप्पा-टप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात बस आलीच. वीसेक मिनिटात जेट्टी वर पोहोचलो. अघनाशिनी नदी इथे समुद्राला मिळते. तिचं विस्तीर्ण पात्र पार करायला तिथे नावांची सोय होती. आम्ही सगळे दाटीवाटीने नावेत बसलो. नावाड्याने मोटर चालू केली आणि सरसर पाणी कापत आमची नाव पुढे सरकू लागली. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचा सोनेरी प्रकाश फारच मोहक वाटत होता. पाणी तसे संथ होते. दूरवर गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा दिसत होत्या. नदीच्या काठाने बगळ्यांच्या माळा पाण्याला समांतर उडत जाताना दिसत होत्या. सगळे घरट्यांकडे परतत असावेत. घारी अजूनही शेवटचा चान्स म्हणून मासे शोधण्यात गुंतल्या होत्या. तेवढ्यात आमची नाव तडाडी जेट्टीवर लागली. हे कदाचित स्थानिक मच्छीमारांचे मोठे बंदर असावे. दिवस मावळायला आल्याने सगळ्यांचीच आवरा-आवर सुरु होती. त्या कोलाहलातून आम्ही लगबगीने बाहेर पडलो आणि बेलेकन बीचची वाट धरली. 
 
नावेतून नदी पर करताना (सौजन्य – देवेंद्र देशमुख) 
 
आता शरीर अगदीच थकले होते. अजून किती चालायचं असा प्रश्न हळूच कोणीतरी ट्रेकलीडरला विचारताना दिसत होतं. जणू काही त्या प्रश्नाचं वेगळं उत्तर मिळणार आहे! हा रस्ता काहीशा उंचीवरून नदीला समांतर जात होता. इथून नदीतल्या नावांची ये-जा दिसत होती. उजव्या हाताला लहानशी टेकडी होती. तिला वळसा घालून उजवीकडे वळून रस्ता बेलेकन बीचवर उतरत होता. तेवढ्यात समोर एक लहानसे मंदिर दिसले. मंदिरातून कानडी भक्तीसंगीताच्या सुरावटी ऐकू येत होत्या. काही स्थानिक बायका शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. खालून वाहणारी नदी, पलीकडचा गरजणारा समुद्र, मंद वाहणारा वारा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याने केशरी-गुलाबी रंगात रंगवलेले आकाश, आणि मंदिरात लागलेले ते मधुर भक्तीसंगीत. नाटकातल्या कलाकारांनी एकत्र येऊन मंचावर एखादे दृश्य साकारावे आणि प्रत्येकाने आपल्या अदाकारीने ते दृश्य खुलवावे तसे निसर्गातले ते एकक त्या भूदृश्याला आपापला रंग बहाल करत होते. त्याक्षणी इतकं प्रसन्न वाटलं की शरीराचा थकवा जणू त्या रंगांमध्ये विरघळून गेला असावा. उजवीकडे वळण घेऊन खाली उतरलो तर आणखी एक अप्रतिम दृश्य स्वागताला हजर होते. दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये एक लहानसा अंतर्वक्र बीच दिसत होता. हाच होता वेलेकन बीच. याच बीचवर आमची कॅम्पसाईट होती. बीच तसा खडकाळच होता. दूरवर गरजणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येईपर्यंत लिंबू-टिंबू होत होत्या. टेकड्यांच्या मागे लपलेला सहस्ररश्मी आपल्या सोनेरी किरणांनी साऱ्या भूदृष्याला वेगळाच उठाव देत होता. त्याच्या सोनेरी प्रकाशात लाटा चमकत होत्या. क्षीण आवाजात ऐकू येणारे मंदिरातले भक्तीसंगीत याही दृश्याची सोबत करत होते. तिथे थोडा वेळ फोटो काढून आम्ही पुढे निघालो. 
 
वेलेकन बीच आणि रम्य सूर्यास्त 
 
रस्त्याच्या कडेने काही हॉटेल्स दिसत होती. त्यांनी पक्क्या खोल्यांच्या बाजूने अगदी बीचवर काही झोपड्या उभारल्या होत्या. पर्यटनाची ही नवी कल्पना इथे चांगलाच जोम धरत होती. आमची कॅम्पसाईट सुद्धा अशीच एका छोटेखानी हॉटेलने उपलब्ध करून दिली होती. कॅम्पसाईटवर पोहोचल्याबरोबर चहा आणि भजी स्वागताला हजर होती. भूक तर लागलीच होती. दिवसभर उन्हात चालल्याने डोकं अगदी सुन्न झालं होतं. गरम चहाने जरा तरतरी आली. मग गप्पागोष्टी आणि कॅम्पिंग गेम्स सुरु झाले. यथावकाश जेवण आले. एव्हाना गार वारा सुटला होता. आकाशात विखुरलेले असंख्य तारे जणू एकमेकांशी प्रकाशाची स्पर्धा करत होते. आता मात्र झोप अनावर होत होती. उबदार स्लीपिंग बॅगेत स्वतःला गुर्फुटून घेत एकदाचे झोपी गेलो.
 
आमची कॅम्पसाईट (सौजन्य – देवेंद्र देशमुख)

Leave a Reply