Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 2 – Calm beaches and Dolphins | कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग २ – शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन

कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली.
साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला
होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे सुकायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा
अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या
वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर
दिसत होते. इथे काही बसायला बाकं आणि पार्किंगची जागा होती. कदाचित स्थानिक
लोकांची संध्याकाळी फिरायला येण्याची जागा असावी. आसपास थोडा कचरा आणि फुटलेल्या
बियरच्या बाटल्या दिसत होत्या. सुंदर जागेचं वाट्टोळं कसं करायचं हे भारतीय लोकांकडून
शिकावं. असो. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
 
वन्नळी बीच


ते टेकाड उतरून आम्ही आता वन्नळी बीचवर पोहोचलो. हा एक
लहानसा अंतर्वक्र किनारा. बाजूला थोडीफार कोळ्यांची वस्ती होती. दुपारची वेळ
असल्याने बहुतांश बोटी किनाऱ्यावरच नांगरलेल्या होत्या. एका ओळीत नांगरलेल्या बोटी
आणि संथ लयीत वाळूवर येणाऱ्या लाटा सुरेख वातावरणनिर्मिती करत होत्या. किनाऱ्यावर
फारच उन लागत होते म्हणून आम्ही बाजूच्या रस्त्याने चालू लागलो. इथे नारळांच्या
झाडांनी थोडी सावली धरली होती. खरेतर ही आमच्या दुपारच्या जेवणाची जागा होती.
जवळच्या हॉटेलमधला एक जण बिर्याणीचे पार्सल घेऊन येणार होता. त्याची वाट बघत आम्ही
एका सावलीच्या जागी थांबलो. फोटोग्राफर मंडळी आपल्या कामाला लागली. काही जण
ट्रेकिंगमधले खेळ खेळू लागले. उरलेले आम्ही काही लोक गप्पा मारत बसलो. आमचा मोठा
ग्रुप बघून कुठूनतरी एक कुल्फीवाला सायकलीची रिंग वाजवत तिथे आला. आधीच एवढं उन
, त्यात समोर आलेली कुल्फी. सगळ्यांनी त्या कुल्फीवाल्यासमोर
एकच गर्दी केली. अक्षरशः पाच मिनिटात त्याच्याकडच्या सगळ्या कुल्फ्या संपल्या!
तेवढ्यात जेवणाची पार्सल्स घेऊन हॉटेलवाला माणूस आला. इतका भरपेट नाश्ता
, त्यात उन्हामुळे सारखं प्यायलं जाणारं पाणी, आणि आता खाल्लेली कुल्फी,
यांमुळे कोणालाच भूक नव्हती. मग आम्ही पुढच्या बीचवर जेवायचा निर्णय घेतला आणि
पार्सल घेऊन पुढे निघालो.
 

 

लाटांमध्ये व्यत्यय आणणारे खडक
वन्नळी बीच संपला तशी वाट पुन्हा टेकाडावर चढू लागली. ही
टेकडी जरा उंच आणि खडकाळ होती. उन्हात तेवढं अंतर चढणंही अवघड वाटत होतं. एकदाचे
आम्ही वर पोहोचलो. सावलीच्या जागी जरा विसावलो. चढणीमुळे काही जण मागे पडले होते.
त्यांची वाट बघत सगळे जण थांबलो होतो. समुद्रावरच्या दमट हवेची झुळूक सुखावह वाटत
होती. छान डुलकी लागेल असे वाटत असताना अचानक एक जण ओरडला
, डॉल्फिन!! खरंच समोर पाण्यात डॉल्फिन उड्या मारताना दिसत
होते. त्यांचे त्रिकोणी पंख आणि टोकेरी शेपट्या पाण्याबाहेर येताना दिसत होत्या.
बराच मोठा कळप असावा कदाचित. एकाने दुर्बीण आणली होती. त्यातून मग सगळे एक-एक करत
डॉल्फिन पाहू लागले. त्या जलचरांची ती क्रीडा फारच मोहक वाटत होती. तेवढ्यात मागे
पडलेले लोक तिथवर येऊन पोहोचले. एक-दोन जणांचे उन्हामुळे अगदीच अवसान गळाले होते.
ते मागे फिरायची भाषा करत होते. मग ग्रुप लीडरने त्यांना समजावून पुढे चालण्यास
प्रवृत्त केले. डॉल्फिन बघून त्यांचा मूडही जरा बरा झाला. एकदाचे सगळे जण पुढच्या
वाटेला लागलो.
 
टेकाडावर बसून डॉल्फिन दर्शन
 

 

टेकडीवरून खाली उतरणारी वाट थोडी अवघड होती. मोठाले खडक
विखुरलेले दिसत होते. त्यावरून माकडउड्या मारत आम्ही खाली उतरत होतो. पुढच्या
टप्प्यात तर वाट पाण्याच्या अगदी जवळून जात होती. तोल सांभाळत आम्ही त्या डेंजर
झोनमधून बाहेर आलो. आता सगळ्यांचा जठराग्नी पेटला होता. मग तिथेच एका सपाट खडकावर
सगळे जण बसलो आणि जेवणाची पार्सल्स उघडली. तासभर जेवण अधिक विश्रांती घेऊन आम्ही
पुढे निघालो. पुढचा बीच होता कडले बीच. हा बीच अगदीच शांत होता. आधीच्या बीचवर
दिसणारी कोळ्यांची वस्ती इथे दिसत नव्हती. शिवाय बोटीही दिसत नव्हत्या. लाटा
संथपणे वाळू भिजवत होत्या. मधेच काही खडक लाटांची लय बिघडवायचा प्रयत्न करत होते.
पण त्या लहानशा व्यत्ययाचा त्या दर्याला काहीएक फरक पडत नव्हता. उष्ण हवेच्या
झोतांवर घारी पंख पसरून घिरट्या घालत होत्या. शांतता बघून आम्ही तिथे ग्रुप फोटो
काढायला सुरुवात केली. यात बराच वेळ जातोय हे बघून ग्रुप लीडर घाई करू लागला. मग
सगळे हळू-हळू पुढे जायला निघाले.


टेकडावरून दिसणारा रम्य बीच


क्रमशः

भाग ३ – निर्वाण बीच आणि एक रम्य सूर्यास्त 

Leave a Reply