Icy Marvels of Iceland – Part 1 – Introduction to Iceland | बर्फाळलेले आईसलँड – भाग १ – तोंडओळख

आईसलँड म्हटले की डोळ्यासमोर येतो बर्फाने भरलेला वस्तीर्ण, वैराण प्रदेश. कधीतरी Man Vs Wild या कार्यक्रमात इथल्या रौद्र निसर्गाची ओळख झालेली असते. जगातल्या कोणत्याही भागाचे तसेही अतिरंजित चित्रीकरण करणारा हा कार्यक्रम आईसलँडसारख्या देशाला तर निसर्गाच्या रौद्रतेची कमाल मर्यादा असे घोषितच करून टाकतो. एरवी जगातल्या विविध घडामोडींत कुठे नावही दिसणारा हा देश अचानक एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अर्ध्या जगातली विमानवाहतूक उद्ध्वस्त करून टाकतो आणि बरेच दिवस ठळक बातमी बनून राहतो. अशा प्रकारे माध्यमांतून ओळख झालेला हा देश प्रत्यक्षात कसा असेल याबद्दल कमालीची उत्सुकता मनात होती. निसर्गाच्या रौद्रतेत सौंदर्य शोधायची सवय सह्याद्रीने लावलीच होती. आईसलँड म्हणजे त्या रौद्रसौंदर्याची पुढची पातळी असेल अशी अटकळ मनात बांधून होतो.
 
२०१५ हे माझ्या पी. एच. डी. च्या अभ्यासक्रमाचं शेवटचं वर्ष होतं. प्रबंध लिहायला वर्षाच्या सुरुवातीलाच शुभारंभ केला होता. पी. एच. डी. ची ही अंतिम पायरी म्हणजे तुमच्या मेहनतीची आणि चिकाटीची खरी परीक्षा असते. जून महिन्याच्या अखेरीस एकदाचा प्रबंध लिहून युनिवर्सिटीकडे पाठवला आणि एका मोठ्या ताणातून मुक्त झालो. आता मौखिक परीक्षेपर्यंत दोन महिने बाकी होते. एवढ्या सहा महिन्यांच्या तणावावर काहीतरी उतारा हवाच होता. एकीकडे आईसलँड खुणावत होतं. सहज म्हणून विमानाची तिकीटं बघितली. सगळ्या सहलीचा खर्च आवाक्यात आहे हे पाहताच लगेच आवश्यक ती सारी आरक्षणं करून टाकली. एकीकडे आईसलँडच्या बर्फाळलेल्या सहलीची स्वप्नं बघता बघता थोडा त्या देशाविषयी गृहपाठ करू लागलो.
 
आईसलँड चे भौगोलिक स्थान 
आईसलँड हा उत्तर अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर यांच्या मधोमध वसलेला एक चिमुकला द्विपीय देश. लोकसंख्या जेमतेम साडेतीन लाख. त्यातली दोनतृतीयांश लोकसंख्या रिकयाविक या राजधानीच्या शहरात आजूबाजूच्या उपनगरांत एकवटलेली. देशाचा ६५% भूभाग म्हणजे वैराण टुंड्रा प्रदेश! Highlands of Iceland या नावाने ओळखला जाणारा या देशाचा मध्यवर्ती भाग उंच पर्वत, ज्वालामुखी, लाव्हा पठारे, आणि हिमनद्या यांनी व्यापलेला. देशाचे हवामान मुख्यत्वे अतिशीत, टुंड्रा प्रकारचे. दक्षिण किनारा त्यामानाने काहीसा उबदार. अशा टोकाच्या हवामानामुळे इथे वनस्पतीसंपदा तशी कमीच. खुरटी झुडुपे आणि गवताच्या विविध जाती एवढीच काय ती हिरवाई. उन्हाळ्यातले दोनेक महिने या वनस्पतीसंपदेला बहर येतो. सप्टेंबरनंतर थंडी पडू लागली की बर्फाच्या चादरीखाली सारे गुडूप.  आईसलँडचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचे भूगर्भशास्त्रीय स्थान. युरेशियन आणि उत्तर अमेरिकन भूप्रतालांच्या सीमेवर हा देश वसला आहे. त्यामुळे ज्वालामुखी, गरम पाण्याचे झरे, आणि लाव्हा पठारे यांची घनता इथे जास्त आहे.
 
आईसलँडमधली पहिली मानवी वस्ती रिकयाविकया शहराच्या जागी झाली असे मानण्यात येते. इसवी सन ७८० मध्ये इंगोल्फर अर्नासन नावाच्या नॉर्वेजियन खलाशाने रिकयाविकमध्ये मानवी वस्तीची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन परंपरेनुसार त्याने जहाजातून मार्गकरमण करताना आपलेसिंहासनलाकडाच्या ओंडक्यांना बांधून समुद्रात सोडून दिले. ते किनाऱ्यावर जय ठिकाणी वाहून आले, ती जागा वस्तीसाठी निवडण्यात आली. या आख्यायिकेची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. रिकयाविकचा स्थानिक भाषेत अर्थ होतो धुराचा उपसागर (smoke bay). रिकयाविकच्या आसपास असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे हे नाव पडले असावे. मासेमारी आणि जहाजबांधणी यावर अवलंबून असलेली लोकवस्ती हळूहळू नगरात परिवर्तितत झाली. इसवी सन ९३० मध्ये इथल्या लोकांनी स्वतःची संसद बनवली. त्यास Althing म्हणतात. नंतरच्या काळात नॉर्वेजियन आधिपत्य, ख्रिस्ती धर्माचा प्रसार, डॅनिश अधिपत्य, धर्म सुधारणा, आणि राष्ट्रवादाचा उदय अशी अनेक सामाजिक राजकीय स्थित्यंतरे आईसलँडने अनुभवली. अखेरीस एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात आईसलँडला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला.

 

म्हणता म्हणता प्रवासाचा दिवस उजाडला. जुलै महिन्याचा पहिला आठवडा होता. जर्मनीतल्या उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात झाली होती. वसंत ऋतूतले वरखाली होणारे  तापमान आता स्थिरावू लागले होते. मधूनच एखाद्या दिवशी ३० अंश सेल्सियसचा आकडा पार करू लागले होते. आईसलँडसाठी ही पर्यटनाच्या हंगामाची सुरुवात होती. आईसलँडसाठी उन्हाळ्याची व्याख्या म्हणजे १० अंश सेल्सियसच्या वर गेलेले तापमान. आंतरजालावरचे तापमानाचे आकडे  उन्हाळा दाखवत असले तरी मी मात्र सारा हिवाळी जामानिमा करून निघालो. जर्मनीतले उन्हाळे पहिल्यानंतर आईसलँडमधल्या उन्हाळ्याकडून माझी फारशी काही अपेक्षा नव्हती. या वेळी विमान डुसेलडॉर्फवरून उडणार होते. वेळेनुसार विमान उडालं आणि साधारण अडीच तासांत रिकयाविकच्या केफलाविक विमानतळावर उतरलं. विमानतळाबाहेर पडलो तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. रात्र कसली, संध्याकाळ म्हणा. अस्ताला निघालेल्या सूर्याची सोनेरी प्रभा आसमंतात पसरली होती. आपण आर्क्टिक वृत्ताच्या अगदी जवळ आलो आहोत याची प्रकर्षाने जाणीव झाली. अतिउत्तरेकडच्या प्रदेशांत जूनजुलैच्या महिन्यात रात्र म्हणावी असा अंधार होतच नाही. दोनतीन तासांसाठी सूर्य क्षितिजाखाली जातो. मात्र त्याचा संधिप्रकाश आसमंतात कायम राहतो. काही ठराविक दिवशी तर चक्क मध्यरात्री सूर्यबिंब पाहता येते. अशा मध्यरात्रीच्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध असला तरी अतिउत्तरेकडच्या सगळ्याच देशांतून तो पाहता येतो. अर्थात, वातावरणाची कृपादृष्टी असेल तरच! असा मध्यरात्रीचा सूर्य नाही, तर किमान संधिप्रकाश अनुभवणे हा देखील एक या सहलीतला एक औत्सुक्याचा विषय होता. तासाभराच्या बसप्रवासानंतर मी रिकयाविकच्या मुख्य बस स्थानकात पोहोचलो. तिथून हॉस्टेलकडे जाणारी बस मी याआधीच आरक्षित करून  ठवली होती. हॉस्टेलवर चेक इन केलं आणि निद्रादेवीच्या अधीन झालो
 
विमानतळावर उतरलो तेव्हा सूर्य अस्ताला निघाला होता 
 

Leave a Reply