तीरथगढ धबधब्यावरची ती रम्य पहाट अनुभवल्यानंतर कांगेर खोऱ्यात भटकायची उत्सुकता अजूनच ताणली गेली होती. आजवर पश्चिम घाटातली आणि हिमालयातली वने पाहिली होती. रणथंभोर आणि ताडोबाच्या निमित्ताने मध्य भारतातली पानझडी वनेदेखील अनुभवली होती. पण बस्तरमधले मिश्र पानझडी प्रकारचे वन कधी अनुभवले नव्हते. कांगेर खोरे हे ओदिशा आणि छत्तीसगढच्या सीमेलगत, जगदालपूरपासून २७ किमी अंतरावर स्थित आहे. साधारण ३०० ते ७०० मीटर उंचीच्या टेकड्यांनी वेढलेल्या या भागात विपुल वनसंपदा आहे. मध्य भारतातली शुष्क पानझडी वने आणि पूर्व भारतातली साग-साल वृक्षांनी नटलेली दमट पानझडी वने यांच्या मध्यभागात हे वन असल्याने येथे दोन्ही प्रकारची जैवविविधता आढळते. खरे तर भारतातल्या काही अस्पर्शित राहिलेल्या वनांपैकी हे एक वन मानले जाते. तीरथगढ धबधब्यासोबत इथल्या चुनखडकातल्या नैसर्गिक गुहा हे एक मुख्य आकर्षण आहे.
भातशेतीच्या कडेने ट्रेकला सुरुवात |
हॉटेलवर आन्हिकं उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. बसने एका शेताजवळ आणून सोडलं आणि मग आमची वनभ्रमंती सुरु झाली. जीतने आम्हाला रस्ता दाखवायला स्थानिक तरुणांची एक टीमच तयार केली होती. आमच्या ग्रुपसोबत इतरही काही जण होते. साधारण ८-१० किमीचा रस्ता होता. भातशेतीच्या कडेकडेने आम्ही चालू लागलो. बाजूने एक ओहोळ गुणगुणत होता. वातावरण तसं स्वच्छ होतं. पावसाचे दिवस असल्याने थोडा दमटपणा हवेत होता. हळूहळू शेती मागे पडली आणि आम्ही रानात शिरलो. एव्हाना इवलासा वाटणारा तो ओहोळ आता एका खोडकर ओढ्यात रुपांतरीत झाला होता. हा ओढा वाट्टेल तसा खडकांना कापत नि धरणीला चिरत गर्द झाडीतून सुसाट वाहत चालला होता. आमची सारी भ्रमंती आता याच्याच साथीने होणार होती.
वाट उताराची होती. दोन्ही बाजूंनी गच्च गवत वाढले होते. इथे जळवा नाहीत ना याची दोन-तीन वाटाड्यांकडून खातरजमा करून घेतली. मागच्या वेळचा तांबडी सुर्ला मधला अनुभव गाठीशी होताच. थोड्या वेळातच पाण्याचा आवाज वाढल्यासारखा वाटला. काही पावलं पुढे गेलो नी पाहतो तर काय, गर्द रानाच्या मधोमध एक निळा-सावळा डोह दिसत होता. आजूबाजूच्या खडकांवरून ओढ्याचे पाणी त्यात खिदळत उड्या घेत होते. काठाने वाढलेले प्रचंड वृक्ष आपल्या दाट पर्णसंभाराचे छत्र त्या डोहावर अलगद धरून उभे होते. काही वेगळीच गूढ शांतता तिथे भरून राहिली होती. ग्रुपमधले काही सेल्फी ट्रेकर्स तिथे नुसते फोटो काढण्यात आणि एकमेकांवर पाणी उडवण्यात मग्न झाले होते. त्यांच्या कलकलाटाचा वैताग येत होता. पण काय करणार, आपलेच दात नी आपलेच ओठ. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोन क्षण माझ्या निसर्गाराधनेत मग्न झालो. काही फोटो काढून, आवाज करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून, पुढे निघालो.
रानाच्या मध्यातला डोह |
गर्द वनराईतून खळाळत जाणारा ओढा |
रानातले एकलकोंडे वठलेले झाड |
पुढची वाट काहीशी सपाट होती. हाच ओढा वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटत होता. कधी त्याच्या काठाने, कधी त्याला पार करत, कधी वर चढत, तर खाली उतरत आम्ही पुढे चाललो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने रान अगदी तृप्त दिसत होतं. झाडांच्या पर्णसंभाराची गडद हिरवी छटा माथेरान-भीमाशंकरच्या सदाहरित वनांची आठवण करून देत होती. तर मधेच दिसणारी बांबूची बेटे पानझडी वनांचा आभास निर्माण करत होती. मधेच जमिनीचे काही सपाट तुकडे भाताच्या रोपांनी भरलेले दिसत होते. त्या रोपांची पोपटी छटा जणू तिथल्या भूदृश्याच्या रंगपेटीतला हरवलेला रंग भरून काढत होती. आता ओढ्याचे पात्र जरा मोठे झाल्यासारखे वाटत होते. एका ठिकाणी पाणी दहा-बारा फुटांवरून खाली कोसळत होते. जणू एक लहानसा धबधबाच!
आतापर्यंत पाहिलेल्या धबधब्यांच्या तुलनेत हे कोसळणारे पाणी म्हणजे लिंबू-टिंबूच. मात्र तिथे दगडांची रचना मस्त बैठक मारून बसायला अगदी अनुकूल होती. आम्ही तिथेच बसकण मारली. ग्रुप फोटो वगैरे काढला, थोडीफार खादाडी केली, आणि मग पुढे निघालो. आता ट्रेक अंतिम टप्प्यात आला होता. अचानक तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता आम्ही एका अरुंद घळीत येऊन पोहोचलो. ओढ्याचे पाणी इथून भरधाव वेगाने वाहत होते. त्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. एका क्षणी वाटले, स्वार व्हावे या मुक्त प्रवाहावर, तो जिथे घेऊन जाईल तिथवर जावे. अगम्य प्रदेश बघावा. अनुभवांची पोतडी अजून श्रीमंत करावी. आणि मग परत नवा प्रवाह शोधावा!
लिंबू-टिंबू धबधबा |
इतक्यात अंगावर दोन-चार थेंब पडल्यासारखे वाटले. वाटलं ओढ्याचंच पाणी आहे. पण तेवढ्यात वर ढगांची गर्दी झालेली दिसली. नशिबाने अजूनतरी आम्ही गुडघ्यांच्या वर कोरडे होतो. आणि आता ट्रेक जवळपास संपलाच असताना ओले होण्याची फारशी उत्सुकता नव्हती. शिवाय कॅमेरा सोबत होताच. मग लगबगीने त्या घळीतून वर आलो. काही पावलं चाललो काय नि एक ओळखीचा वाहनतळ दिसू लागला. हाच सकाळी पाहिलेला तीरथगढ धबधब्याच्या बाजूचा वाहनतळ! हात्तिच्या! एवढाच ट्रेक? दहा कसले जेमतेम पाच किमीसुद्धा अंतर भरले नसेल! मग जीत म्हणाला, लोकांना मुद्दाम वाढवून सांगावे लागते अंतर. त्यांना फेसबुकवर टाकायला सोपे जावे म्हणून! आता छत्तीसगढ मध्ये त्याला आमच्यासारखी सह्याद्रीतल्या गडवाटा तुडवणारी लोकं कुठे आलीत भेटायला! त्याच्या या तथाकथित दहा किमीच्या ट्रेकची खिल्ली उडवणारे आम्ही आणि सतरा वेळा घसरून पडलेले, कुठे-कुठे चिखल लागलाय ते पुनःपुन्हा बघणारे आणि कपाळावरचा घाम पुसणारे ग्रुपमधले इतर जण अशी आभासी वर्गवारी तिथे झाली होती. ट्रेक लहानसा असला तरी खोऱ्यातल्या रानाचे सुंदर दर्शन घडले होते.
अरुंद घळीतला जोमात वाहणारा ओढा |
ओढ्याचे काहीसे शांत रूप |
हा बस्तरमधला शेवटचा दिवस होता. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानात तशा बघण्यासारख्या अजून अनेक जागा आहेत. पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या नैसर्गिक गुहा त्यांपैकीच एक. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तिथे पाणी असल्याने जाणे शक्य नव्हते. त्याव्यतिरिक्त काही दुर्गम भागात जाणारे ट्रेक मार्गही आहेत. पण ही सहल तशी लहानच असल्याने हे सगळे काही बघता येणे शक्य नव्हते. पुढच्या वेळी जास्त वेळ काढून यायचे आणि रान यथेच्छ अनुभवायचे असे मनाशी ठरवून टाकले. जेवण करून आम्ही जगदालपूरला आलो. दशेराचे आणखी काही विधी चालू होते. ते बघण्यात संध्याकाळ घालवली. मग रात्रीचे जेवण उरकून रायपूरकडे रवाना झालो. बस्तरच्या या सहलीने आपल्या शेजारच्या राज्यातल्या एका विविधरंगी-विविधढंगी प्रदेशाचे दर्शन घडले घडवले होते. इथले धबधबे, समृद्ध वनसंपदा, आणि तितकेच समृद्ध लोकजीवन अनुभवायला मिळाले होते. अनुभवांच्या पोतडीत आणखी एक अत्तरकुपी दाखल झाली होती. तिच्या गंधतृप्तीने मुंबईच्या धकाधकीला सामोरं जायची नवी उर्जा मिळाली होती.
समाप्त