चित्रकोट धबधब्याचे रौद्रसौंदर्य अनुभवून आम्ही आसपासच्या काही जागा बघायला बाहेर पडलो. बस्तर जिल्हा वनसंपदेसोबतच अनेक लहानमोठ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या यादीतली पहिली जागा होती मेंद्री घुमड धबधबा. चित्रकोटवरून बस निघाली आणि बस्तरच्या अनवट रांगड्या प्रदेशातून आमचा प्रवास सुरु झाला. सगळीकडे भातशेती डवरलेली दिसत होती. रोपांची पाती दुपारच्या उन्हात चमकत होती. त्या नाजूक पोपटी रोपांमध्ये जणू अवघ्या विश्वाची क्षुधातृप्ती सामावली होती. आकाशात एखाद-दुसरा काळा ढग उगीच वाट चुकल्यागत रेंगाळलेला दिसत होता.
डवरलेली भातशेती |
अर्ध्या तासातच आम्ही एका पठारावर येऊन पोहोचलो. तिथे इतरही काही गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. पण धबधबा काही कुठे दिसत नव्हता. लांब कुठेतरी लोकं जमलेली दिसत होती. त्यापुढे दरी आणि तिथेच धबधबा असावा बहुतेक. आम्ही त्या दिशेने चालत पुढे निघालो. थोडं अंतर जाताच वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवला. हा नक्कीच दरीतून उसळून वर येणारा वारा. आता उत्सुकता अजूनच ताणली जात होती. पाचेक मिनिटं पुढे गेलो आणि एक विस्तीर्ण दरी नजरेस पडली. नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडीने ती दरी व्यापलेली होती. दरीच्या डाव्या कोपऱ्यातून एक पांढरीशुभ धार खाली कोसळताना दिसत होती. पठाराच्या खडकाचा तांबूस रंग आणि दाट वनश्रीचा गडद हिरवा रंग त्या शुभ्र फेसाळत्या धारेला उठाव देत होते. वाऱ्याच्या वेगाने मधेच ती धार विस्कळत आणि हेंदकाळत होती. जणू धारेतले ते थेंब वाऱ्याच्या मदतीने रोलरकोस्टर राईडचा अनुभव घेत होते.
कोसळणारे पाणी, मग ते कोणत्याही स्वरूपात असो, मनाला एक वेगळाच आनंद देते. कुठे चित्रकोट प्रपाताचा एखाद्या तपस्वीच्या मुखातून निघालेल्या ओंकारागत भासणारा प्रचंड ध्रोंकार, तर कुठे लहानग्या मुलीने मांडलेल्या भातुकलीच्या खेळासारखा वाटणारा मेंद्री घुमडचा प्रवाह. रूप वेगळे, आकार वेगळा, पण मनात उमटणारे तरंग तेच! वाहते पाणी बघून मेंदूत काही ठराविक संप्रेरके निर्माण होत असावीत कदाचित. असो. त्या जागी निवांत बसावं आणि नुसता निसर्गाचा अवखळ खेळ पहात रहावं असं वाटत होतं. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच असावं बहुतेक. आतापर्यंत वाट चुकून रेंगाळलेले वाटणारे काळे ढग आता मेंढरांच्या कळपासारखे आकाशात गर्दी करू लागले. दरीतून घोंघावणारा वारा त्यांना अजूनच प्रोत्साहन देऊ लागला. वातावरणाचा बदलता नूर पाहून आम्ही घाईघाईत तिथे दोन-चार फोटो काढले आणि बसच्या दिशेने धावलो.
मेंद्री घुमड धबधबा |
धबधब्यासमोरची विस्तीर्ण दरी |
बाजारातले भाज्यांचे ठेले |
रस्त्यात एका ठिकाणी बाजार भरलेला दिसला. दसऱ्याचा दिवस असल्याने बाजार चांगलाच फुललेला दिसत होता. जरा चक्कर मारू म्हणून खाली उतरलो. पाऊस भुरभुरत होता. पण भिजण्याइतका जोर नव्हता. बरेच भज्यांचे ठेले होते. गरमागरम भज्यांचा वास भूक चाळवत होता. एकीकडे सुक्या मासळीचे ठेले होते. तर पलीकडे रानभाज्या विकायला ठेवल्या होत्या. फळफलावळ आणि नेहमीच्या भाज्या वगैरे होत्याच. इथल्या रानातले मुख्य उत्पन्न म्हणजे तेंदूपत्ता आणि महुआ. महुआच्या फुलांपासून दारूही बनवतात. मात्र त्याचा सीझन उन्हाळ्यात असतो. एका ठेल्यावर वाळवलेली महुआची फुलेही दिसत होती. खजूर किंवा मनुकांसारखी त्यांची चव होती.
एका कोपऱ्यात काही लोक मोठ्या हंड्यांमध्ये काहीतरी पिण्याचा पदार्थ विकत होते. बघतो तर ती होती सल्फी – म्हणजे ताडाच्या पानांपासून बनवलेली दारू. उत्सुकतेपोटी थोडी चव घेऊन पाहिली. आंबट-गोड आणि थोडीशी झणझणीत अशी काहीशी चव होती. विदेशी मद्याला सरावलेल्या आपल्या जिभेला ही स्थानिक चव रुचण्याची शक्यता तशी कमीच. पलीकडच्या एका बाईकडे भातापासून बनवलेली बियर होती. हा तर प्रकार अजूनच विचित्र होता. आंबट दह्यामध्ये भाताची पेज मिसळावी तशी काहीशी त्याची चव होती. याने पोट एकदम साफ होतं म्हणे. पोट साफ करण्यासाठी जिभेवर एवढे अत्याचार करायची आमची अजिबातच इच्छा नव्हती. एकंदरीत, स्थानिक अपेयपान आम्हा कोणालाच फारसे रुचले नाही. बाजारात एका ठिकाणी काही तरुण कसलासा पारंपरिक कार्यक्रम सादर करत होते. ते बघत आम्ही थोडा वेळ रेंगाळलो आणि बसकडे निघालो.
बस्तरच्या पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेताना |
कॅम्पसाईटवर परतलो तेव्हा दोन वाजत आले होते. जेवण तयारच होते. पारंपरिक पद्धतीचे भोजन अनुभवायला आम्ही फारच उत्सुक होतो. सगळेजण मनोऱ्याच्या गच्चीवर जमलो. स्थानिक आचारी पानांच्या द्रोणातून एक-एक पदार्थ वाढू लागले. बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी व्यर्ज नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. आजच्या मेनूमध्ये बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे त्यातल्या त्यात शहरी लोकांना खायला जमतील असे पदार्थ होते. शिवाय एक चिंचेची आंबट-गोड चटणीही होती. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला. सगळेच पदार्थ चविष्ट होते. बांबूच्या मोडांची करी तर फारच छान होती.
थोड्या वेळात एक मुलगी एक लाल रंगाची अजून एक चटणी घेऊन आली. हीच ती बस्तर मधली प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी. सुरुवातीला माझा विश्वासच बसेना. मग जीतने चक्क रानातून शोधून आणलेले मुंग्यांचे घरटेच दाखवले. असंख्य मुंग्या आणि त्यांची अंडी एका पानावर उन्हात वाळवत स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूस ठेवलेली होती. ती संध्याकाळच्या चटणीची पूर्वतयारी असावी. शाकाहारी असल्याने मी चटणी खाऊन बघण्याचा प्रश्नच नव्हता. इतरांनी मात्र मनसोक्त आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ विसावलो. मग आवरून जगदालपूरकडे निघालो. पुढचा कार्यक्रम होता बस्तर मधला पारंपरिक दसरा बघणे.
वाळवायला ठेवलेल्या लाल मुंग्या |
क्रमश: