Beautiful Bali – Part 5 – Nusa Lembongan and snorkelling adventure | नयनरम्य बाली – भाग ५ – नुसा लेंबोंगान आणि स्नोर्केलिंगचा थरार

जाग आली तेव्हा सव्वासात वाजले होते. मी ताडकन उठून बसलो. नुसा लेंबोंगानला जाणारी बोट नऊ वाजता सुटणार होती. मात्र त्यासाठी आठ वाजता सनूर पोर्टवर चेक इन करायचे होते. हॉस्टेल पासून तिथपर्यन्त अंतर होते १८ किमी! सत्यानाश! आता बोट सुटणार आपली! मी झटक्यात आवरलं आणि चेक आऊट केलं. बॅग तिथेच काउंटरवर ठेवली. ना चहा ना नाश्ता. तसाच स्कूटरवरुन सनूर च्या दिशेने निघालो. काल ज्या बाईशी बोलून बुकिंग केलं होतं तिला फोन करून मी सव्वाआठपर्यन्त येतोय असं सांगितलं. नशिबाने सकाळची वेळ असल्याने फार ट्रॅफिक नव्हतं.

म्हणता म्हणता एकदाचा साडेआठला पोर्टवर पोहोचलो. चेक इन वगैरे केलं. मग तिथल्या वेटिंग रूम मध्ये बसायला गेलो. बघतो तर काय, तिथे दोन-चारच टाळकी दिसत होती. म्हणजे एवढी पळापळ करूनही मी लवकरच पोहोचलो होतो. असो. अजून बराच वेळ आहे असं बघून मी जवळच्या उपहारगृहात नाश्ता केला आणि परत बोट सुटायची वाट बघत वेटिंग रुममध्ये येऊन बसलो. अखेरीस साडेनऊ वाजता बोटीत चढायला सांगण्यात आले. इथे ना जेट्टी होती ना वर चढायला पायर्‍या. गुडघ्याएवढ्या पाण्यातून चालत जात तिथल्या माणसाचा हात धरून अक्षरशः बोटीत उडी मारायची होती. अर्धा तर इथेच भिजलो. उत्तम सुरुवात आहे असं म्हणत मी आत जाऊन बसलो. 

नुसा लेंबोंगानचा किनारा

बोट चांगलीच वेगवान होती. चहूबाजूंनी पाण्याचे तुषार उडवत लीलया पुढे चालली होती. अर्ध्या तासातच नुसा लेंबोंगान आले. इथून पुढे तुम्ही जे पॅकेज बुक केले असेल त्याप्रमाणे गाईड तुम्हाला घेऊन जात होते. मी नुसा लेंबोंगानवरचे स्थलदर्शन आणि स्नोर्केलिंग असं पॅकेज बुक केलं होतं. गम्मत म्हणजे हे पॅकेज बुक केलेला मी एकटाच होतो. थोडक्यात मला पर्सनल गाइडेड टूर मिळणार होती. अपेक्षेप्रमाणे गाईड स्कूटर घेऊन आला. त्याचं नाव होतं ली. ली हा तिथला स्थानिक होता. त्याच्याशी गप्पा मारता मारता आमची नुसा लेंबोंगान सहल सुरू झाली.

पहिलेच स्थळ होते डेविल्स टियर. ही जागा नुसा दूआवरच्या वॉटरब्लो सारखी, मात्र त्यापेक्षा बरीच मोठी होती. अर्धवर्तुळाकृती खडकाळ किनारा होता. त्याखाली एक भलीमोठी गुहा होती. त्यावर समुद्राच्या लाता आदळून पाणी उंच उडत होतं. गरजणार्‍या दर्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. लीच्या मते आज समुद्राला फारसा आवेग नव्हता. नाहीतर याहीपेक्षा पाणी उंच उडतं म्हणे. मला तर उडणार्‍या पाण्यापेक्षा तो खडकाळ किनारा आणि पाण्याचा गडद निळा रंग जास्त मोहक वाटत होता. तिथे थोडे फोटो काढल्यावर ली मला उजव्या बाजूने किनार्‍याच्या दुसर्‍या बाजूला घेऊन गेला.

इथे कमालीची शांतता होती. तुरळक पर्यटक होते. किनार्‍यावर लहानमोठे खड्डे होते. त्यावर लाटा आदळून उंच उडत होत्या. वारा भन्नाट सुटला होता. इथे चिक्कार फोटो काढले. लीकडून स्वतःचे पण फोटो काढून घेतले. मग आम्ही स्कूटरवरून त्याच किनार्‍याच्या पुढच्या भागात गेलो. इथे सुंदर असा वाळूचा किनारा होता. असंख्य पर्यटक पाण्यात मस्ती मजा करत होते. किनार्‍याच्या वरच्या बाजूला एक छानसे रेस्तोरंट होते. तिथून किनार्‍याचे सुंदर दृश्य दिसत होते. एक कॉफी मागवली आणि थोडा वेळ किनार्‍यावर येणार्‍या लाटा बघत बसलो. 

डेविल्स टियर चा खडकाळ निकारा
डेविल्स टियर
अर्धवर्तुळाकृती खडकाळ किनारा आणि त्यावर आदळणार्‍या लाटा
डेविल्स टियरच्या बाजूचा बीच

आता वेळ आली होती स्नोर्केलिंगची. पहिल्यांदाच करणार होतो. नक्की प्रकार काय असतो याची थोडीफार कल्पना होती. पण पोहता येत नव्हते आणि पाण्याची थोडी भीतीही होती. तरीही पाण्याखालचे जग बघायला मिळणार म्हणून प्रचंड उत्सुकताही होती. थोड्याच वेळात आम्ही त्या जागी पोहोचलो. इथे किनार्‍यावरच्या एका रेस्तोरंटवर मला सोडून तीन वाजता घ्यायला येतो असे सांगून ली निघून गेला. रेस्तोरंटमध्ये तसं कुणीच नव्हतं. एकच गोरा मुलगा बसलेला दिसला. तोही स्नोर्केलिंगसाठीच आला होता. ओळख-पाळख झाली. हा होता जर्मनीचा वेलेण्टिन. मग त्याच्याशी जर्मन मध्ये गप्पा मारू लागलो. मला जर्मन येतं हे बघून तो तर एकदमच आश्चर्यचकित झाला. आमची चांगली गट्टी जमली.

तेवढ्यात स्नोर्केलिंगचा गाईड आला. माझ्या सगळ्या वस्तू तिथल्या एका लॉकर मध्ये ठेवून फक्त स्विमिंगसूट घालून मी निघालो. वेलेण्टिन सोबत होताच. चला, सोबत कोणी तरी आहे, असं बघून मला जरा दिलासा वाटला. मग आम्ही तिघे एका लहानशा बोटीतून निघालो. सुरूवातीला केरळच्या बॅकवॉटरसारखा वाटणारा तो भाग अचानक खुल्या समुद्रात बदलला. पाणी शांतच होतं. जेमतेम वीसेक फूट खोली असेल. आणि इतकं नितळ होतं की इथूनच तळ दिसत होता. मग गाईडने आम्हाला स्नोर्केलिंगचे उपकरण दिले आणि म्हणाला मारा उड्या! आता मात्र माझी तंतरली. अरे तू गाईड आहेस, तू हे शिकवायला हवस, मी मनोमन म्हणत होतो. पण हे त्याला कसं सांगणार! शिवाय भाषेचा प्रश्नही होताच. इकडे वेलेण्टिन सगळा जामानिमा करून उडी मारायला तयार. एकंदरीत माझा चेहरा बघून त्या दोघांना कल्पना आली.

मग वेलेण्टिनने मला सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. त्याने आधी बर्‍याच वेळा स्नोर्केलिंग केले होते. ते उपकरण कसे नाकावर घट्ट लावायचे आणि कसा तोंडाने श्वास घ्यायचा हे त्याने नीट समजावले. आता प्रश्न होता पोहण्याचा. फ्लोटिंग जॅकेट तर घातले होतेच. त्यामुळे बुडण्याची शक्यता नव्हती. पण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेलो तर? माझी ही अडचण समजून गाईडने एक प्लास्टिकची एक तरंगणारी चौकट दोरीला बांधून पाण्यात फेकली. म्हणाला याला पकडून पाण्यात बघत रहा. हळू हळू धीर करून मी पाण्यात उडी मारली. दोन्ही हातांनी त्या चौकटीला घट्ट पकडून चेहरा पाण्याखाली नेला. आणि काय ते दृश्य! रंगीबेरंगी प्रवाळ आणि त्यावर पोहणारे लहान-लहान मासे! त्यातले धमक पिवळ्या रंगाचे प्रवाळ तर फारच आकर्षक दिसत होते. त्यांचे आकार तर कित्ती वेगवेगळे! काही हातातल्या पंख्यासारखे, काही काटेरी झुडुपांसारखे, काही गोल स्पंजसारखे, तर काही वळवळणार्‍या सापासारखे. सगळे दृश्य अगदी डिस्कवरी चॅनेल वर दाखवतात तसे दिसत होते. काश माझ्याकडे गो-प्रो असता! 

स्नोर्केलिंगसाठी जाताना
चौकटीला धरून स्नोर्केलिंग करताना

गाईड बोट हळूहळू पुढे नेत होता. त्यामुळे मला थोड्याफार आजूबाजूच्या भागाचे दर्शन घडत होते. आता श्वास घ्यायची प्रक्रिया चांगली अंगवळणी पडली होती. पाण्यात पाय मारता पण येऊ लागले होते. सुंदर जलसृष्टीचे दर्शन घडत होते. तसे इथले बरेचसे प्रवाळ ब्लीच झालेले दिसत होते. माशांची संख्याही खूप जास्त नव्हती. पण जे काही जलजीवन दिसत होते ते अद्भुत होते. मधूनच वेलेण्टिन माशासारखा पोहत येत मी जीवंत आहे की नाही बघत होता. मला तर त्याची असूया वाटत होती. आणि एकीकडे आपल्याला पोहता येत नसल्याची लाजसुद्धा. पुढच्या वेळी पाण्याचे कुठले खेळ करायला यायचं तर पोहणं शिकूनच यायचं असा मनोमन निश्चय केला.

तासभर स्नोर्केलिंग करून मी बोटीवर आलो. मग गाईडने बोट मागे वळवली. एवढा वेळ पाण्यात खेळून आता चांगलीच भूक लागली होती. रेस्तोरंटवर पोहोचलो तेव्हा जेवण तयारच होते. पटकन आवरले आणि बीचवरच्या आडव्या खुर्चीवर बसलो. आज गप्पा मारायला वेलेण्टिन सोबत होता. मग आमच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. जर्मनीतले आयुष्य आणि भारतातले आयुष्य, जगातली वेगवेगळी पर्यटनस्थळे आणि तिथली संस्कृती, असे बरेच विषय होते. एकंदरीत वेळ छान गेला. तेवढ्यात ली आलाच. मग वेलेण्टिनला बाय बाय करून मी लीसोबत परतीच्या वाटेवर निघालो. अधेमधे थांबून थोडेफार फोटो काढले. मग चार वाजताची बोट पकडून पुन्हा बालीला पोहोचलो.

बीचवरच्या खुर्चीवर बसून जेवणाची वाट बघताना
फ्राइड नूडल्स

क्रमशः

0 thoughts on “Beautiful Bali – Part 5 – Nusa Lembongan and snorkelling adventure | नयनरम्य बाली – भाग ५ – नुसा लेंबोंगान आणि स्नोर्केलिंगचा थरार

  1. पोहायला येत नसताना स्नॉर्केलिंग करणे म्हणजे पंख नसताना बिना पॅरॅशूट स्काय डायविंग करणे ��. कसे जमवलेस तू?

Leave a Reply