अली बुग्यालच्या मध्यावर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवण आणि चहा घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढचा कॅम्प बेदिनी बुग्याल ला होता. जवळपास निम्मे अंतर अजून बाकी होते. पण वाट मात्र बरीचशी सपाट होती. शिवाय हिरव्यागार कुरणाचे नितांतसुंदर दृश्य सोबत होतेच. आभाळात उन-पावसाचा खेळ चालला होता. आता आम्ही जवळपास ३५०० मीटर उंचीवरून चाललो होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. सपाट वाटेवरून चालतानाही दम लागत होता. जेवणाच्या ब्रेकनंतर माझा वेग अगदीच मंदावला होता. मी आणि इतर दोघे असे बरेच मागे पडलो होतो. आमच्यासोबत विकी होता. मागे पडलेल्या लोकांना ग्रुपसोबत घेऊन येण्याची अवघड जबाबदारी रघुने त्याच्यावर टाकली होती. माझी फोटोग्राफी सुरु होतीच. कॅमेरा पाहून विकी कुतूहलाने बरेच प्रश्न विचारत होता. त्याला कळेल अशा भाषेत उत्तरे देणे जरा आव्हानात्मक होते. पण तरी त्यातही मजा येत होती.
बेदिनी बुग्यालच्या वाटेवर |
अली बुग्यालचा सपाट पठारी प्रदेश आता संपत आला होता. दोन्ही बाजूंना दरी आणि समोर एक टेकाड अशा त्रिकोणी जागेवर आम्ही येऊन पोहोचलो. टेकाडाच्या पायथ्याशी एक हॉटेल होते. उजव्या बाजूला, थोडे खाली काही तंबू लागलेले दिसत होते. हाच आपला कॅम्प असावा अशा आशेने मी एकदम उत्साहित झालो. पण विकीने केवळ नकारार्थी मान हलवली. समोरचे टेकाड चढून पलीकडे जायचे आहे हे कळल्यावर तर मी एकदमच हताश झालो. शरीरातली उर्जा संपल्यागत वाटत होती. अति उंचीमुळे थोडेसे गरगरल्यासारखे वाटत होते. शिवाय थंडी-वाऱ्यामुळे अंगात थोडीशी कणकणही वाटत होती. आता पुढे कसे जायचे या विचाराने मी चिंताग्रस्त झालो.
वातावरण क्षणोक्षणी बदलत होते. कोणत्या क्षणी पुन्हा पाऊस सुरु होईल याची काहीही शाश्वती नव्हती. त्यामुळे विकी घाई करू लागला होता. सोबतच्या दोघांना हळूहळू पुढे जाण्यास सांगून मी तिथल्या हॉटेलपाशी थांबलो. दहा मिनिटं विश्रांती घेऊन अंगातले उरलेसुरले त्राण एकत्र करून पुढे निघालो. काही पावलांतच टेकाडाची चढण सुरु झाली. नागमोडी वळणं घेत ती वाट टेकाडावर चढत होती. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाने वाटेवर राडा झाला होता. त्यात खेचरांचे शेण मिसळून वाट अगदीच निसरडी झाली होती. लोकांच्या चालण्याने एका जागेवरचा चिखल इतरत्र पसरला होता. अक्षरशः दर चार पावलांवर मी थांबत होतो. विकी बिचारा माझ्या गतीने, मला पुढे चालण्यास प्रोत्साहित करत सोबत चालला होता. दर वळणावर अजून किती जायचे आहे या प्रश्नाने मी त्याला हैराण करत होतो. ट्रेक लीड करण्याचा त्याच्याकडे कितपत अनुभव होता देव जाणे, पण त्याचा पेशन्स मात्र वाखाणण्याजोगा होता.
अली बुग्यालचा सपाट प्रदेश |
ट्रेकिंगमध्ये एक असतो शरीराचा गियर आणि एक असतो मनाचा गियर. पहिला गियर सुदृढ असावा लागतोच, पण दुसरा त्याहून मजबूत. दुसरा गियर जर ढासळू लागला तर ट्रेक संपलाच म्हणून समजा. त्या नागमोडी वाटेवर माझ्या शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर चालला होता. सगळी उर्जा संपल्यागत होती. पण मनाचा गियर मात्र अजून सुदृढ होता. त्या जागेवरून मागे वळणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. कारण डिडनापासून बरेच अंतर आम्ही पुढे आलो होतो. त्यामुळे मनाला कितीही वाटलं, इथेच थांबावं, तरी तो काही व्यवहार्य पर्याय नव्हता. त्यामुळे मी स्वतःला पुढे रेटायचा निर्णय घेतला. दहा पावले चालणे आणि दोन मिनिटे थांबणे अशा तालात मी पुढे चाललो होतो.
माझ्या थोडं पुढे असलेल्यांची काही वेगळी परिस्थिती नव्हती. हिमालयाच्या उंचीने सगळ्यांना चांगलाच इंगा दाखवला होता. म्हणता म्हणता ती नागमोडी चढण संपली. त्या टेकाडाच्या पायथ्याशी असलेले छोटेखानी हॉटेल इवलेसे दिसत होते. त्याच्या मागचे अली बुग्याल ढगांच्या दुलईत हरवून गेले होते. आणि समोर बघतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत, नाही कदाचित अनंत अंतरापर्यंत डोंगराच्या एका अंगाने जाणारी वाट दिसत होती! पुढच्या कॅम्पसाईटचा कुठे मागमूसही दिसत नव्हता! ते टेकाड म्हणजे खरे तर एका लांबलचक डोंगरधारेची एक बाजू होते! आता मात्र पुरे झालं! अजून पुढे काही जमणार नाही. ती न संपणारी वाट बघून माझ्या मनाचा गियर धाडकन खाली कोसळला.
माझी अवस्था विकीच्या लक्षात येत होती. तो म्हणाला १०-१५ मिनिटं थांबू. मी एका दगडाला टेकून डोळे मिटले. किती वेळ झोपलो देव जाणे, पण डोळे उघडले तेव्हा चिंताग्रस्त चेहऱ्याचा विकी समोरच्या दगडावर बसलेला दिसला. पलीकडच्या बाजूला विजयेंद्रजी आणि पुढे गेलेले ट्रेकमधले दोघे मेम्बर उभे होते. मी असा अचानक झोपलेला पाहून विकी घाबरला होता आणि त्याने पुढे गेलेल्या विजयेंद्रजींना बोलावून आणले होते. त्यांनी माझी नाडी तपासली. ऑक्सीमीटर बोटाला लावून ऑक्सिजन तपासला. सारे काही नॉर्मल होते. काही त्रास होतोय का वगैरे विचारलं. इथून मागे जायचे आहे का असेही विचारले.
मला त्रास तसा काहीच होत नव्हता. जरा डोकं दुखत होतं आणि अंगात कणकण होती. फार गंभीर असं काहीच नव्हतं. जे काही होतं ते निव्वळ exhaustion होतं. त्या दगडावरच्या शीघ्र निद्रेने आता थोडीफार उर्जा शरीरात एकवटली होती. तिथपर्यंत येऊन मागे फिरण्यात मला काहीच अर्थ वाटत नव्हता. आता मला पुढच्या कॅम्पपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी विजयेंद्रजींनी घेतली होती. सारे बळ एकवटून मी एकदाचा उठलो. हर हर महादेव म्हटले आणि पुढे चालू लागलो. नशिबाने आता चढण मंद झाली होती. त्या डोंगरधारेच्या अंगाखांद्याने वेटोळे घेत घेत एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखी पहुडलेली ती वाट पार करणे म्हणजे माझ्यासमोरचे आव्हान होते.
टेकडावरून दिसणारे अली बुग्याल |
विजयेंद्रजी म्हणजे एक भलतेच रसायन होते. पन्नाशीचा हा काटक माणूस त्या डोंगरांत, रानात, नी कुरणात लोणच्यासारखा मुरला होता. कोण ट्रेक पूर्ण करू शकेल आणि कोण अर्ध्यात सोडेल याचा अंदाज त्यांना पहिल्याच दिवसात आला होता. “सरजी, आप ट्रेक छोडनेवालोंमेंसे नही हो, हम ये पुरे विश्वासके साथ बता सकते हैं” असे म्हणत म्हणत ते मला पुढे रेटत होते. कदाचित मागे पडलेल्या लोकांना प्रोत्साहित करण्याची ही त्यांची एक पद्धत असावी.
काही का असेना, मी पुढे जात होतो खरा! मग त्यांनी त्यांच्या अनुभवातले रंजक किस्से सांगायला सुरुवात केली. मग त्यात बुग्यालवर उगवणाऱ्या जडीबुटी पासून तिथल्या देव-देवतांच्या वास्तव्यापर्यंत सारे काही होते. त्या सगळ्या गप्पा ऐकता ऐकता त्या अजगर-वाटेवरचे एकेक वळण मागे पडत होते. जवळपास तासभर चालल्यानंतर एकदाचा बेदिनी बुग्याल चा कॅम्प नजरेच्या टप्प्यात आला. ट्रेकिंगमधला हा क्षण म्हणजे आयुष्यातल्या कोणत्याच गोष्टीशी तुलना करता येणार नाही असा असतो! आपले लक्ष्य समोर दिसत असल्याचा आनंद, वाट संपत आल्याचा आनंद, वाट यशस्वीरित्या पार केल्याचा आनंद, त्या जागेचे सौंदर्य असे कित्येक कंगोरे त्या क्षणाला असतात. मोठ्या उत्साहात आम्ही कॅम्पसाईट कडे निघालो.
कॅम्पसाईट नजरेच्या टप्प्यात आली ती जागा |
बेदिनी बुग्यालच्या विस्तीर्ण कुरणात आमचे तंबू लागले होते. अली बुग्यालपेक्षा बेदिनी बरेच मोठे आणि विस्तीर्ण होते. कुरणाच्या एका कोपऱ्यात बेदिनी कुंड दिसत होते. पावसाळ्यात या कुंडात पाणी साठून एक लहानसा तलाव बनतो. शेजारच्या त्रिशूल आणि नंदा घुंटी शिखरांचे मनोहारी प्रतिबिंब त्यात पहायला मिळते. अनेक रानफुले, औषधी वनस्पती, आणि पशु-पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे. भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेले ब्रह्मकमळ (Sassurea oblavata) येथे आढळते. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूने तीव्र उतार व उताराला बिलगलेले घनदाट रान अशी बेदिनी बुग्यालची भौगोलिक रचना आहे. कॅम्पसाईटवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे चार वाजत आले होते. सगळ्यात शेवटी पोहोचणाऱ्या आम्हा लोकांचे एकदम जंगी स्वागत झाले. गरमागरम चहा हजर होताच. चहा पिऊन एक क्रोसिनची गोळी घेऊन मी तंबूमध्ये जरा वेळ विसावलो. आल्या आल्या झोपायला सक्त मनाई होती. जेवढे मोकळ्या हवेत फिराल तेवढे वातावरणाला लवकर जुळवून घ्याल, असे सगळे ट्रेक लीडर सांगत होते. तासाभरात अंगातली कणकण कमी झाली आणि मी उत्साहाने बेदिनी बुग्यालवर भटकायला बाहेर पडलो.
बेदिनी बुग्याल मधली कॅम्पसाईट आणि मागे दिसणारे त्रिशूल शिखर |
क्रमश: