Wild Trail of Kudremukh – Part 4 – The Scenic Return Journey | कुद्रेमुखची रानवाट – भाग ४ – परतीचा रम्य प्रवास

मुसळधार पावसातून आम्ही मुलोडीच्या दिशेने उतरत होतो. उतरतानाची वाट म्हणजे वाट कमी आणि ओहोळवाट जास्त वाटत होती. रस्त्यात लागणारे झरे आता कमरेपर्यंत फुगले होते. एकमेकांचे हात धरत, तोल सावरत, आम्ही ते पार करत होतो. सगळी झाडं-झुडुपंं, डोंगर-टेकड्या, गवत-फुलं त्या पावसापुढे नतमस्तक होऊन त्याचा मारा झेलत होते. त्या सगळ्यांसाठी निसर्गाचा आशीर्वादच होता तो पाऊस. पुढचे आठ-दहा महिने काही एवढं विपुल जलामृत मिळणार नव्हतं त्या रानाला. म्हणून आता हवं तितकं जलामृत पिऊन घेत होतं ते रान. सततच्या पावसाने आमची मात्र अवस्था बिकट झाली होती. ओल्या-कच्च कपड्यांतून अंगात हुडहुडी भरत होती. चष्म्याच्या काचा थेंबांनी धूसर झाल्या होत्या. शरीरातले सगळे स्नायू बोलत होते. पाय थरथरत होते. कधी एकदा कोरडे होऊन उबदार जागी रजई घेऊन बसतोय असं झालं होतं. ते चित्र डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही स्वतःला पुढे रेटत होतो. ती वाट काही संपता संपत नव्हती. 
 
भिजून तृप्त झालेलं रान
हात धरून ओहोळ पार करताना
दोन-तीन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही त्या वन विभागाच्या चेकपोस्टपाशी पोहोचलो. सकाळी जाताना काढून ठेवावी लागलेली खाऊची पाकीटंं आता परत मिळाली. सगळ्यांनी त्यावर एकच फडशा पाडला. थंडी-पावसाने आणि अथक पायपिटीने त्रस्त झालेल्या जिवाला ते पिवळे केळ्याचे चिप्स सुद्धा स्वर्गीय वाटत होते. कुद्रेमुखसारखे ट्रेक हे असे पाय जमिनीवर राखण्यास भाग पाडतात. आयुष्यातल्या छोट्यात छोट्या गोष्टीची किंमत दाखवून देतात. रौद्र निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे याची पदोपदी जाणीव करून देतात. असो. 
 
खाली पोहोचल्याचा आनंदात आम्ही बागडत बागडत होम स्टे वर पोहोचलो. साधारण पाच वाजत आले होते. वेळेत ट्रेक पूर्ण केल्याचे समाधान वाटत होते. खोलीवर येऊन रेनकोट काढला आणि बघतो तर काय सगळा टी-शर्ट आणि विजार रक्ताने माखलेले!! जळूबाईने आपला डाव साधला होता. पोटावर एक-दोन नाही चांगले चार व्रण दिसत होते. आता ती जळूबाई सरपटत रेनकोट आणि शर्टच्या आत कशी काय पोहोचली हे एक कोडंच होतं. थोडं रक्त अजूनही येत होतंच. मग लगेच त्यावर डेटोलचा कापूस दाबून धरला. त्याशिवाय पायावरही काही ठिकाणी व्रण दिसत होते. ना कसली वेदना ना काही जळजळ. नुसते रक्ताने वाहणारे व्रण.
सगळ्यांचीच अवस्था अशी झाली होती. कोणाला छातीवर, कोणाला पाठीवर, तर कोणाला मांडीवर, जिथे मिळेल तिथे जळूने चावा घेतला होता. होम स्टे वर अजून एक ग्रुप आला होता. त्यांना वर जायचे परवाने मिळाले नव्हते म्हणून ते होम स्टे वरच थांबले होते. उद्याच्या दिवशी लवकर नंबर लावून परवाने मिळवणार होते. जळूबाईंच्या हल्ल्याने आमची झालेली अवस्था बघून सगळे धास्तावले होते. आम्हीही त्यांना ट्रेकच्या गमतीजमती खुलवून सांगू लागलो. तेवढ्यात गरमागरम चहा आणि भजी आणली गेली. सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. मग उगाच गप्पा मारत बसलो. फोनला नेटवर्क नव्हतंंच. त्यामुळे आमचं आपापसातलंं नेटवर्क जमण्यास मदत झाली. गप्पा मारता मारता जेवायची वेळ झाली. मग मस्तपैकी सांबार-भात आणि पापड खाऊन अजून जरा वेळ बोलत बसलो. तासाभरातच सगळे निद्रादेवीच्या अधीन झालो. 
 
पहाटे पावसाच्या आवाजानेच जाग आली. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडणार नव्हता. शेवटी घाटातलाच पाऊस तो. आन्हिकं आणि नाश्ता उरकून आम्ही परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. कळसापर्यंत सोडायला जाणाऱ्या जीपगाड्या तयारच होत्या. त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून आम्ही तासाभरात कळसाला येऊन पोहोचलो. तिथे आमची बस होतीच. घाटातून वाटवळणं घेत बस जसजशी पुढे जाऊ लागली तसे गार हवेवर सगळेच डुलक्या काढू लागले. मी मात्र लहान मुलासारखा टकामका घाटातले सृष्टीसौंदर्य न्याहाळत होतो. कर्नाटकातला हा भाग म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. जागोजागी कॉफीचे मळे, त्यात मध्येच लावलेली सिल्व्हर ओकची गोंडस झाडे, ढगांत हरवलेले डोंगरमाथे, डोंगरांच्या बेचक्यांतून वाहणारे शुभ्र धुमाळ, सारेच विलोभनीय होते. मधेच एखादी पावसाची सर साऱ्या परिसराला झोडपून काढत होती. मग एखादा चुकार ढग भलताच खाली उतरून कॉफीच्या मळ्यांना गोंजारून जात होता. रविवार असल्याने अधून-मधून पर्यटकांच्या गाड्या दिसत होत्या. हा नितांतसुंदर प्रदेश हुडकायला परत एकदा इथे यायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं. 
 
कॉफीचे मळे (फोटो आंतरजालावरून साभार (http://vivasayam.org/wp-content/uploads/2014/08/Plantation.jpg)
म्हणता-म्हणता आम्ही बंगलोरला पोहोचलो. नव्याने दोस्ती झालेल्या सवंगड्यांचा निरोप घेतला आणि घराच्या दिशेने निघालो. बरीच वर्षं बकेट लिस्ट वर असलेलं एक ठिकाण पाहिल्याचं विशेष समाधान मनात दाटलं होतं.                             
 
समाप्त 

Leave a Reply