Traversing Madhya Pradesh – Part 3 – Architectural Jewels of Khajuraho Main Temple Complex | मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ३ – खजुराहोची स्थापत्यरत्ने – मुख्य मंदिर समूह

खजुराहोमधला पश्चिम मंदिर समूह मुख्य मंदिर समूह म्हणून
ओळखला जातो. इथे साधारण दहा मंदिरे आहेत. लक्ष्मण मंदिर आणि कंडरीय महादेव मंदिर
ही त्यांतली महत्वाची मंदिरे. दुपारच्या विश्रांतीनंतर मी या मंदिरांकडे निघालो.
वातावरण ढगाळच होते. त्यामुळे फोटो चांगले येणार नाहीत म्हणून थोडासा हिरमुसलो
होतो. मात्र पाऊस थांबला होता. पर्यटकांची गर्दीही फार नव्हती. आत शिरताच एका
गाईडने गाठले. त्याच्याकडे योग्य परवाना असल्याची खात्री करून त्याला सोबत घेतले.
खजुराहो सारख्या ठिकाणी गाईड सोबत हवाच. ही मंदिरे म्हणजे तत्कालीन स्थापत्यघटक
, लोककथा,
पुराणकथा
, राजघराण्यांचा
इतिहास यांचा भरगच्च्च खजिना आहेत. त्यांची सगळी वैशिष्ट्ये समजून घ्यायची असतील
तर सोबत जाणकार हवाच. आता योग्य माहिती असलेला जाणकार मिळणे हा नशिबाचा भाग झाला.
असो. तर या गाईडवर भरोसा ठेवून मी त्याच्यासोबत मंदिरदर्शनास निघालो.
 
लक्ष्मण मंदिर
खजुराहोचे पूर्वीचे नाव खर्जूरवाहक असे होते. इथे मोठ्या
संख्येने असलेल्या खजुरांच्या झाडांमुळे हे नाव पडले असावे. जवळच असलेले महोबा
म्हणजे चंडेल राजांची राजधानी होती. चंडेल राजांनी नवव्या ते तेराव्या
शतकांदरम्यान मध्य भारतावर राज्य केले. त्यांपैकी यशोवर्मन आणि धंगदेव राजांची
राजवट म्हणजे चंडेल साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्याच कारकिर्दीत ही
प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली. या साम्राज्याची कुळकथा रंजक आहे. असे म्हणतात की
हेमवती, काशीच्या राजपुरोहिताची अतिशय रूपवान अशी कन्या
, एकदा रात्रीच्या वेळी नदीत स्नान करत होती. तिच्या
सौंदर्यावर भाळून खुद्द चंद्र पृथ्वीवर अवतरला. त्या संबंधातून हेमावती गर्भवती
झाली व तिने चंद्रासोबत विवाहाची मागणी केली. मात्र चंद्रास अवकाशात जाणे भाग
होते. मग त्याने तिला आशीर्वाद दिला की तुझा पुत्र भविष्यात राजा होईल. हेमवातीने
मग अरण्यात राहून आपल्या पुत्रास, चंद्र्वर्मनास, वाढवले. चंद्रवर्मनाने पुढे जाऊन
चंडेल घराण्याची स्थापना केली. सुमारे चारशे वर्षे सत्ता गाजवल्यानंतर अखेरीस
तेराव्या शतकात दिल्लीच्या सुलतानशाहीने चंडेल राजांचा पराभव केला. सुलतानशाहीच्या
काळात या मंदिरांवर अनेक आक्रमणे झाली. त्यात बरीचशी मोडतोडही करण्यात आली. मात्र
तुलनेने दुर्गम जागी असल्याने उत्तरेतल्या इतर मंदिरांपेक्षा ही मंदिरे सुरक्षित
राहिली. पुढची अनेक शतके ही मंदिरे दुर्लक्षित अवस्थेत राहिली. पुढे १८३० मध्ये
स्थानिक हिंदूंनी ही मंदिरे एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नजरेस आणून दिली आणि मग
त्यांचा जगभरातील जनतेस पुन्हा परिचय झाला. आज ही सगळी मंदिरे
ASI च्या अखत्यारीत
आहेत व उत्तमरित्या जपलेली आहेत. एवढेच नव्हे तर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ
म्हणून मान्यता देऊन या मंदिरांचा यथोचित सन्मान केला आहे.
 
इतिहास ऐकता ऐकता आम्ही लक्ष्मण मंदिराजवळ येऊन पोहोचलो. हे
मंदिर इसवी सन ९५४ मध्ये यशोवर्मन राजाने बांधले. मंदिर विष्णूचे असून भोवतालची
चार उपमंदिरे इतर देवतांना समर्पित आहेत. मंदिर एका चौरसाकृती अधिष्ठानावर
उभारलेले आहे. मंदिराच्या सगळ्यात खालच्या भागावर वाहणारे पाणी आणि फुलांच्या
प्रतिमा आढळतात. त्यावरची एक ओळ हत्तींच्या प्रतिमांची. यातला प्रत्येक हत्ती
वेगळ्या चर्येत. त्यावरच्या दोन ओळी देव-देवता आणि मानवी व्यवहार दाखवणारी शिल्पे.
त्यावर हळूहळू निमुळता होत जाणारा कळस. संपूर्ण मंदिर नाजूक शिल्पकृतींनी भरगच्च
भरलेले. त्याचे सौंदर्य जितके नजरेत साठवावे तितके कमीच. दर्शनी भागातला नाचणारा
गणपती आणि शृंगार करणाऱ्या ललनांच्या असंख्य प्रतिमा म्हणजे या मंदिराचे
वैशिष्ट्य. मुख्य मंदिर आणि इतर उपमंदिरे सुस्थितीत असल्याने या मंदिरास संपूर्ण
पंचायतन मंदिर समजले जाते. चोहू बाजूंनी मंदिर पाहिल्यावर आम्ही खाली उतरून
अधिष्ठानाच्या बाहेरूनही एक चक्कर मारली. त्यावर तत्कालीन व्यवहारांतले अनेक
प्रसंग घडवलेले होते. त्यांपैकी कोर्टमधले प्रसंग आणि वाद्ये वाजवणारी व नाचणारी
लोकं या शिल्पकृती विशेष उल्लेखनीय. मी शक्य त्या कोनातून फोटो काढत होतो. सगळे
मंदिर तर फ्रेममध्ये मावतच नव्हते. प्रत्येक शिल्पकृतीला न्याय देणे तर निव्वळ
अशक्यच होते.
 
तिथून पुढे आम्ही कंडरीय महादेव मंदिराकडे निघालो. शिल्पकला
आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीने हे मंदिर इथले सर्वश्रेष्ठ समजले जाते. लक्ष्मण
मंदिराप्रमाणे हेही मंदिर एका उंच अधिष्ठानावर उभारलेले आहे. या मंदिराचा कळस
म्हणजे हळूहळू उंच व निमुळता होत जाणारा हिमालय पर्वतच. एका बाजूने बघितले असता हे
मंदिर एका महाकाय पर्वतासारखे भासते. आणि त्याचे प्रवेशद्वार म्हणजे पर्वतातली एक
गुहा! मंदिराच्या चहूबाजूंनी एकापेक्षा एक सरस शिल्पकृती घडवलेल्या. त्यात मानवी
व्यवहार
, शृंगार करणाऱ्या
ललना
, पौराणिक प्रसंग वगैरे तर आहेतच. त्याशिवाय
सप्तमातृका
, अष्टदिक्पाल, आणि
इतर देवतांच्या शिल्पकृतीही आहेत. मी दिङमूढ होऊन ते सारे सौंदर्य न्याहाळत होतो.
मंदिराच्या कोनांतून शिखराकडे नजर नेली असता कळसाची उंची नजरेत भरत होती. मंदिराच्या
भिंतींचे रेखीव कोन, कळसाच्या बाजूने असेले उपकळस व त्यांची एकसमान रचना
, भिंतीतून बाहेर डोकावणारे सज्जे व त्यावरचे कोरीवकाम,
सारेच थक्क करणारे होते. ज्या कारागिरांनी हे घडवले असेल त्यांच्या कलानैपुण्यास
मी मनोमन सलाम करत होतो. ढगांच्या पडद्यातून अंधुक झालेला संध्याकाळचा सूर्यप्रकाश
सारे वातावरण अजूनच गूढमय करत होता. ती शिल्पकला पाहून अंगावर उठलेले रोमांच थंड
हवेमुळे अंगभर सळसळत होते. किती फोटो काढू आणि किती नको असं झालं होतं. शेवटी
गाईडच्या सल्ल्यानुसार मी दुसऱ्या दिवशी केवळ फोटोग्राफीसाठी पुन्हा यायचं ठरवलं
आणि उरलेली मंदिरे बघायला निघालो.
 
यथावकाश मुख्य समुहातली सगळी मंदिरे पाहिली आणि गाईडचा
निरोप घेतला. थोडा वेळ हॉस्टेल वर विश्रांती घेऊन लाईट अँड साउंड शो बघायला
निघालो. अमिताभ बच्चनच्या आवाजातला हा शो खजुराहोचा इतिहास आणि इथल्या मंदिरांचे
स्थापत्यवैभव कथन करतो. अडीचशे रुपयांच्या तिकिटाच्या तुलनेत हा शो तितकासा रोचक वाटला
नाही. कथा बऱ्याच ठिकाणी रेंगाळलेली वाटली. असो. मग रात्रीचे जेवण उरकून मी दिवस
संपवला.
 
 
 
 
 
क्रमशः 

Leave a Reply