उलून दानू म्हणजे बाली मधले एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. बेरातान सरोवराच्या काठाशी असलेल्या या मंदिराने देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. किंबहुना हे मंदिर म्हणजे बालीची ओळख बनून राहिले आहे. सतराव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर पाण्याची देवता दानू हिच्यासाठी बांधले गेले आहे. इथे काही बौद्ध आणि हिंदू देवतांची पूजास्थाने आहेत. दुपारची वेळ असल्याने मंदिरात विशेष गर्दी नव्हती. मंदिराचा प्रशस्त परिसर उठून दिसत होता. इथेही मंदिराच्या आतल्या भागात जायला परवानगी नव्हतीच. आजूबाजूचा सगळा परिसर सुंदर फुलझाडांनी सुशोभित केलेला होता. तेवढ्यात दृष्टीस पडले ते मंदिराचे मुख्य आकर्षण – पाण्याच्या मधोमध असलेले उतरत्या छपरांचे दोन मनोरे. हे दोन मनोरे सरोवराच्या आत असलेल्या एक लहानशा बेटावर उभारले आहेत. बेटाचा पृष्ठभाग अगदी सपाट असल्याने हे मनोरे अक्षरशः पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटतात.