कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला
होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे कायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर दिसत होते. इथे काही बसायला बाकं आणि पार्किंगची जागा होती. कदाचित स्थानिक लोकांची संध्याकाळी फिरायला येण्याची जागा असावी.
Beach trail of Karnataka: Kumta to Gokarna – Part 1 – Serene train journey and start of the trek | कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग १ – रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात
मडगाव आलं तशी गाडी ऐंशी टक्के रिकामी झाली. मग काय, मी पळालो दारात. दारात उभं राहून धावत्या गाडीचा आनंद घेणं यासारखी दुसरी मजा नाही. तो झोंबणारा वारा, वळणावरून गाडी जाताना दिसणारे पुढचे-मागचे डबे, आजूबाजूच्या गावांतली उगाचच ट्रेनकडे बघून हात हलवणारी लहान मुले, गाडी अचानक बोगद्यात शिरली की दाटून येणारा अंधार, सारेच कसे गंमतीदार! वयाने कितीही आकडे ओलांडले तरी यातली गंमत कधी कमी झाली नाही. एकदा तिथे उभं राहिलं की गाडीच्या त्या बेसूर धडधडीतही लय सापडू लागते. पुलावरून गाडी जाताना घुमणारा आवाज एक्स्ट्रा बास सारखा वाटू लागतो.