कॅम्पसाईटवर परतलो तेव्हा दोन वाजत आले होते. जेवण तयारच होते. पारंपरिक पद्धतीचे भोजन अनुभवायला आम्ही फारच उत्सुक होतो. सगळेजण मनोऱ्याच्या गच्चीवर जमलो. स्थानिक आचारी पानांच्या द्रोणातून एक-एक पदार्थ वाढू लागले. बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी व्यर्ज नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. आजच्या मेनूमध्ये बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे त्यातल्या त्यात शहरी लोकांना खायला जमतील असे पदार्थ होते. शिवाय एक चिंचेची आंबट-गोड चटणीही होती. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला.