आभाळातले रेंगाळलेले ढग आता दूर पसार झाले होते. त्रिशूल शिखराच्या मागून वर आलेले सूर्यबिंब तेजाने तळपत होते. बुग्यालमधल्या गारव्यात त्या तेजाची ऊब हवीहवीशी वाटत होती. एक लहानशी चढण पार करून आम्ही कालच्याच डोंगरधारेवर येऊन पोहोचलो. तीच अजगर-वाट आणखी काही वेटोळे घेत अजून वर जात होती. आम्ही हळूहळू त्या वाटेने वर चढू लागलो. बॅगेचे ओझे नसल्याने तीच वाट आज अनेक पटींनी सोपी वाटत होती. चढण मंद होती. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम लागत होता. तासाभरात त्या डोंगरधारेच्या माथ्यावर पोहोचलो.
Unforgettable Roopkund – Part 4 – Never-ending trail of Ali Bugyal and Bedini Bugyal | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ४ – अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट
ट्रेकिंगमध्ये एक असतो शरीराचा गियर आणि एक असतो मनाचा गियर. पहिला गियर सुदृढ असावा लागतोच, पण दुसरा त्याहून मजबूत. दुसरा गियर जर ढासळू लागला तर ट्रेक संपलाच म्हणून समजा. त्या नागमोडी वाटेवर माझ्या शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर चालला होता. सगळी उर्जा संपल्यागत होती. पण मनाचा गियर मात्र अजून सुदृढ होता. त्या जागेवरून मागे वळणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. कारण डिडनापासून बरेच अंतर आम्ही पुढे आलो होतो. त्यामुळे मनाला कितीही वाटलं, इथेच थांबावं, तरी तो काही व्यवहार्य पर्याय नव्हता. त्यामुळे मी स्वतःला पुढे रेटायचा निर्णय घेतला. दहा पावले चालणे आणि दोन मिनिटे थांबणे अशा तालात मी पुढे चाललो होतो.
Unforgettable Roopkund – Part 3 – Lush greenery of Ali Bugyal | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ३ – अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण
पहाडी भाषेत बुग्याल म्हणजे कुरण. हिमालयात साधारण ३५०० मीटर उंचीवर वृक्षरेषा आणि ४००० मीटरच्या आसपास हिमरेषा दिसून येते. याच्या मधल्या टप्प्यात विस्तीर्ण कुरणे आढळून येतात. वेगवेगळ्या प्रदेशांत या भूभागास वेगवेगळी नावे आहेत. जसे काश्मीरमध्ये त्याला मर्ग म्हणतात. सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध ठिकाणे अशाच विस्तीर्ण कुरणांमध्ये वसलेली आहेत. उत्तराखंडमधली बुग्याल ही दुर्गमतेमुळे कायमस्वरूपी मानवी वस्तीसाठी अनुकूल नाहीत. आसपासच्या गावांतले लोक गुरेचराईसाठी या कुरणांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. थंडीच्या दिवसांत बर्फाखाली असलेली ही कुरणे वसंत ऋतूत ताजीतवानी होतात आणि नानाविध रानफुलांनी बहरून जातात. मग उन्हाळ्यात कुराणांना हिरवं तेज चढतं. उत्तराखंड मधले प्रसिद्ध ट्रेकिंगचे मार्ग या नयनरम्य बुग्यालमधून जातात. रूपकुंडच्या मार्गातील अली बुग्याल आणि बेदिनी बुग्याल ही कुरणे ट्रेकिंग समुदायात प्रचंड लोकप्रिय आहेत.