Unforgettable Roopkund – Part 2 – Lohajung to Didna: Curtain Raiser of Roopkund | अविस्मरणीय रूपकुंड – भाग २ – लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

हर हर महादेवची आरोळी ठोकली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. वाट मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने खाली उतरत होती. ट्रेकचा पहिला एक चतुर्थांश भाग उताराचा होता. एका अर्थाने चांगलंच होतं. Acclimatization साठी अशी सोपी सुरुवात असणं नेहमीच चांगलं. काही वेळातच गाव मागे पडलं आणि घनदाट अरण्य सुरु झालं. दूरवर नंदा घुंटी शिखर दिसत होतं. आम्हा ट्रेकर्सची लगबग मिश्कीलपणे पाहत होतं. मधेच एखाद्या सपाट जागी थोडीफार वस्ती आणि शेती दिसत होती. कधी गर्द झाडीतून मंद खळखळ करत वाहणारे झरे लागत होते. रानात अधेमध्ये ऱ्होडोडेंड्रॉन ची लालभडक फुले फुललेली दिसत होती. वाटेत एका वस्तीजवळ जरा वेळ विसावलो. त्या जागेवरून दूरवर डिडना गाव दिसत होते. लोहाजुंगवरून जेवढे खाली उतरलो होतो तेवढेच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वर चढायचे होते. आत्तापर्यंत रमत गमत चाललेला ट्रेक आता खरा इंगा दाखवणार होता. मनाची तयारी करून आम्ही चढणीच्या वाटेला लागलो.

Unforgettable Roopkund – Part 1 – Start of the Trek | अविस्मरणीय रूपकुंड – भाग १ – ट्रेकचा श्रीगणेशा

रूपकुंड म्हणजे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील सुमारे ५००० मीटर उंचीवरील एक लहानसे हिम-सरोवर. त्रिशूल आणि नंदा घुंटी या दोन शिखरांच्या मध्ये वसलेले हे सरोवर उत्तराखंड मधले एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ आहे. ट्रेकिंग चा बराचसा मार्ग अति उंचीवरील असल्याने तशी शारीरिक क्षमता असणे आवश्यक होते. त्यामुळे मी महिनाभर आधीपासून तयारी सुरु केली. जिम मध्ये पायांच्या व्यायामावर जास्त भर द्यायला सुरुवात केली. रोजच्या गडबडीत जिमला नियमित जाणे शक्य होत नव्हते. म्हणून ऑफिसमधून येताना किमान ५ किमी चालत यायला सुरुवात केली. मुंबईतला दमट उकाडा आणि चार पावलं चालल्यावर लागणाऱ्या घामाच्या धारा असह्य होत होत्या. कधी एकदा थंडगार जागी जातोय असं वाटत होतं.