दुसऱ्या दिवशी उठायला जरा उशीरच झाला. कोवळ्या सोनेरी उन्हाची वेळ निघून गेली होती. पण तरीही मी कॅमेरा घेऊन मंदिरांकडे निघालो. नशिबाने आज वातावरण स्वच्छ होते. हलका वारा सुटला होता. मी उत्साहाने मंदिरांचे फोटो काढू लागलो.
मैथुनशिल्पे साधारण मंदिरांच्या बाहेरील बाजूस घडवलेली आढळतात |
खजुराहोची मंदिरे जगभर प्रसिद्ध होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यांवर असलेली मैथुनशिल्पे. एकूण शिल्पाकृतींपैकी १०% शिल्पाकृती या मैथुन म्हणजेच कामक्रीडेशी संबंधित आहेत. जवळपास सर्वच मंदिरांवर ही शिल्पे आढळतात. भारतीय समाजात आजही सेक्स हा विषय फारसा मोकळेपणाने बोलला जात नाही. कामेच्छा म्हणजे वासना आणि ती हीनच असा सर्वसाधारण हेका दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वजांनी मंदिरांसारख्या वास्तूंवर केलेले मानवी कामजीवनाचे हे उत्कट चित्रण विशेष महत्त्वाचे ठरते. खरेच प्राचीन भारत सेक्सबाबत उदारमतवादी होता का? असे प्रसंग मंदिरांवर चितारण्यामागे नक्की काय प्रयोजन असेल? या विषयवारचे काही लेख शोधले तेव्हा कळलं की यामागे अनेक स्पष्टीकरणे आहेत. अभ्यासकांचे विविध मतप्रवाह आहेत.
कंडरीय महादेव मंदिरावरील मैथुनशिल्पे |
सर्व मंदिरांवरची मैथुनशिल्पे ही केवळ बाहेरील बाजूस आढळतात. आतमधल्या अंधाऱ्या भिंतींवर केवळ नक्षीकाम आणि देव-देवतांच्या शिल्पाकृती आढळतात. मंदिरात प्रवेश करताना विषयभावना बाहेर सोडून आत जावे व देवाची आराधना करताना मन निर्विकार असावे असे सांगण्याचा हा संकेत असावा असा एक मतप्रवाह मानतो. दुसरा एक मतप्रवाह असे सांगतो की हा तरुणांच्या प्रबोधनाचा मार्ग होता. त्या काळात तरुणांमध्ये बौद्ध धर्माने सांगितलेल्या श्रमण परंपरांचे आकर्षण होते. बहुतांश तरुण हे भिक्खू बनून सन्यस्त आयुष्य जगण्याचा मार्ग निवडत होते. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी सांसारिक आयुष्यातल्या अत्युच्च सुख देणाऱ्या क्षणांचे चित्रण या मंदिरांवर केले गेले. यातून हेही अधोरेखित होते की धर्म, अर्थ, आणि काम हे तीन पुरुषार्थ साध्य केल्याशिवाय मोक्षप्राप्ती असाध्य आहे.
काही अभ्यासकांच्या मते ही शिल्पे तंत्र परंपरेशी निगडीत आहेत. या परंपरेत कामाग्नीच्या उर्जेतून कुंडली जागृत करण्याचा प्रघात होता. मैथुन म्हणजे शिव आणि शक्ती यांचे मिलन, म्हणजेच रूपक-अर्थाने मन आणि शरीर यांचे संतुलन अशी या परंपरेची विचारधारा होती. या परंपरेचे साधक कधी एका तर कधी अनेक व्यक्तींसोबत, कधी समलिंगी तर कधी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत, तर कधी प्राण्यांसोबत कामक्रीडा करत. त्या कृतीमध्ये वासना नसे. तो त्यांच्या साधनेचा भाग असे. काही शिल्पाकृतींमध्ये मैथुन करणाऱ्या व्यक्तींसोबत एका मार्गदर्शकाची आकृती दिसते. हे मार्गदर्शक म्हणजे साधकांचे गुरु असावेत. तत्कालीन मध्य भारतात या तंत्र परंपरेचे मोठे प्राबल्य होते. दैनंदिन आयुष्यातली हीच गोष्ट मंदिरांवर चितारली गेली असावी.
इतर शृंगार व मैथुनशिल्पे |
मी मोठ्या औत्सुक्याने सगळी शिल्पे बघत होतो. मात्र त्याहीपेक्षा रंजक होते गाईड्सचे त्या शिल्पांबद्दलचे स्पष्टीकरण आणि पर्यटकांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया पाहणे. पर्यटक नक्की कोण आहेत त्यावर गाईड ठरवत मैथुनशिल्पांविषयी काय बोलायचे. एखादे नुकतेच लग्न झालेले जोडपे असले की गाईड खुलवून खुलवून शिल्पांमध्ये चितारलेल्या वेगवेगळ्या पोझेसचे वर्णन करत. मग ते जोडपे उगीच एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकी. त्यातली स्त्री मग उगीच पदरात तोंड दाबत हसून लाजल्यासारखं करी. जणू काही इथे कामसुत्राचे धडे गिरवायला आले आहेत. एखादे कुटुंब असेल तर गाईड काहीतरी थातुमातूर स्पष्टीकरण देई. पर्यटकही मग उगीच बघून न बघितल्यासारखं करत पुढे जात. एखादा तरुणांचा जथ्था असेल तर त्यावर काहीतरी चावट विनोद केले जात. मग सगळे फिदीफिदी हसत. जसे काही पॉर्न फिल्म बघत आहेत. एकंदरीत समाजाचे गेल्या हजार वर्षांतले स्थित्यंतरच तिथे दिसत होते.
तेवढ्यात एक तरुण शिल्पाकृतींचे स्केचिंग करताना दिसला. सहज म्हणून त्याच्या चित्राकडे नजर टाकली. पाषाणातल्या त्या कलाकृतीचं कागदावर अगदी सहज रुपांतर केलं होतं त्याने. मग थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारू लागलो. तिथल्या मानवी शिल्पांमधली प्रमाणबद्धता, चेहऱ्यांवरील हावभाव, आणि त्यांची आभूषणे हा त्याच्या खास अभ्यासाचा विषय होता. आणि बोटांमध्ये तर विलक्षण किमया होती. कोणीतरी अभ्यासू वृत्तीने त्या शिल्पांकडे पाहतो आहे हे बघून फार छान वाटले. त्याला त्याच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि मी माझ्या फोटोग्राफीकडे वळलो.
दुल्हादेव मंदिर |
एव्हाना दुपार होत आली होती. आज रात्रीपर्यंत ओरछाला पोहोचायचं होतं. मग मी तिथली फोटोग्राफी आवरली आणि होस्टेलवर आलो. चेक आउट करून मंदिरांच्या समोरच्या एका सुंदर कॅफेमध्ये जेवण केलं. अजून दक्षिण-पूर्व समुहातली काही मंदिरे बघायची राहिली होती. कालच्याच गाईडला फोन केला. तो बाईक घेऊन आला. मग दुल्हादेव मंदिर, चतुर्भुज मंदिर, आणि नुकतेच उत्खननात सापडलेले बीजमंडल ही मंदिरे बघितली आणि खजुराहो स्टेशनवर पोहोचलो. तिथून झांशीकडे जाणारी गाडी पकडली. रात्री आठच्या सुमारास ओरछाला पोहोचलो. रात्रीचं जेवण उरकलं आणि निद्राधीन झालो.
उत्खननात सापडलेले बीजमंडळ |