Unforgettable Roopkund – Part 5 – At the Base of Roopkund | अविस्मरणीय रूपकुंड – भाग ५ – रूपकुंडच्या पायथ्यावर

लेमन टी चा वास आणि रघूची हाक म्हणजे आमचा ट्रेकमधला घड्याळाचा गजरच होऊन गेला होता. चहाचे दोन घोट घेऊन आळोखे-पिळोखे देत मी तंबूमधून बाहेर आलो. कालचा थकवा आज कुठच्या कुठे पळून गेला होता. पहाटेची ती थंड, ओलसर हवा मनाला प्रफुल्लित करत होती. नुकताच सूर्योदय झाला होता. आजूबाजूच्या उंच शिखरांतून वाट काढत सोनेरी किरणे बेदिनी बुग्यालवरच्या गवताला हळूच गुदगुल्या करत होती. आभाळात विखुरलेले राखाडी ढग कळपामागे रेंगाळत चालणाऱ्या कोकरांसारखे दुडक्या चालीने पुढे सरकत होते. दूरवर दिसणारे त्रिशूल शिखर निस्तब्धपणे सूर्यकिरणांचा आणि ढगांचा खेळ निरखत होते. त्याने न जाणे असे कित्येक खेळ पाहिले असतील. अशी रम्य पहाट अनुभवायला मी कितीही अजगर-वाटा चढून यायला तयार आहे असे मनोमन वाटत होते.
एक-एक करत सगळे जण उठून आवरायला लागले तसा मी माझ्या निसर्ग-आराधनेतून बाहेर आलो. नाश्ता तयार होता. आन्हिकं उरकून आम्ही सगळे पुढच्या मुक्कामाकडे कूच करायला तयार झालो. आज कालच्यापेक्षा जास्त चढाई होती. कालच्या अनुभवातून शहाणा होत मी एका लहान बॅगेत केवळ पिण्याचे पाणी आणि इतर काही आवश्यक सामान घेतले आणि मोठी बॅग पोर्टर कडे दिली. कॅम्पमधल्या इतर सामानासोबत ती बॅग एका खेचराच्या पाठीवर विसावली तेव्हा मला अगदी हायसे वाटले. रघूने आवश्यक अशा सूचना दिल्या. आजच्या दिवशीची चढण ही ट्रेकमधली सगळ्यात खडतर अशी चढण होती. वाढती उंची, त्यानुसार घटत जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण, आणि लहरी हवामान यांच्याशी सामना करत आम्हाला पुढचा मुक्काम गाठायचा होता. हर हर महादेव म्हणून आम्ही ट्रेक सुरु केला. 
 
बेदिनी बुग्यालवरची रम्य पहाट
पाथार नचुनीच्या वाटेवर
आभाळातले रेंगाळलेले ढग आता दूर पसार झाले होते. त्रिशूल शिखराच्या मागून वर आलेले सूर्यबिंब तेजाने तळपत होते. बुग्यालमधल्या गारव्यात त्या तेजाची ऊब हवीहवीशी वाटत होती. एक लहानशी चढण पार करून आम्ही कालच्याच डोंगरधारेवर येऊन पोहोचलो. तीच अजगर-वाट आणखी काही वेटोळे घेत अजून वर जात होती. आम्ही हळूहळू त्या वाटेने वर चढू लागलो. बॅगेचे ओझे नसल्याने तीच वाट आज अनेक पटींनी सोपी वाटत होती. चढण मंद होती. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम लागत होता. तासाभरात त्या डोंगरधारेच्या माथ्यावर पोहोचलो.
बेदिनी बुग्यालची कॅम्पसाईट आता नजरेआड झाली होती. डोंगरधारेच्या पलीकडच्या बाजूची खोल दरी समोर आ वासून उभी होती. दरीतून घोंघावत वर येणारा वारा उन्हातून मिळणाऱ्या उबेला नेस्तनाबूत करत होता. शिखराच्या दिशेने पाहिले तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते. थोडे अंतर सपाट असणारी ती वाट एका झटक्यात समोरच्या अजस्र पर्वतावर चढताना दिसत होती. मुंगीएवढे दिसणारे ट्रेकर्स आणि त्यांचे सामान वाहणारे खेचरांचे कळप हळूहळू त्या वाटेने वर चढताना दिसत होते. आपल्याला जमेल की नाही या भीतीने पोटात गोळा आला. कालच्या वाटेवर झालेली अवस्था आठवू लागली. पण इथपर्यंत आलो आहोत तर असेच आल्यापावली परत जाणेही मनाला पटत नव्हते. फार त्रास झालाच तर मागे फिरू असे ठरवून मी पुढे निघालो. 
 
वाटेवरून दिसणारे त्रिशूल शिखर
पुढच्या तासाभरात आम्ही पाथार नचुनी या कॅम्पसाईटवर पोहोचलो. त्या अजस्र पर्वताच्या पायथ्याला बिलगून ही कॅम्पसाईट वसली आहे. चार-पाच हॉटेल्स, एक खेचरांचा निवारा, आणि आजूबाजूला लागलेले तंबू एवढीच काय ती कॅम्पसाईट. आम्ही तिथे दुपारच्या जेवणासाठी थांबलो. आमच्याआधीच वर गेलेल्या आचाऱ्यांनी खिचडी रांधून ठेवली होती. पण या वेळेस बेत काही जमला नव्हता. खिचडी व्यवस्थित शिजली नव्हती. शिवाय मसालेही प्रमाणात पडले नव्हते. त्यात अति उंचीमुळे थोडेसे गरगरल्यासारखे होत होते. त्यामुळे घशाखाली घास जात नव्हता. मात्र पुढचा पर्वत चढायचा तर थोडीफार उर्जा आवश्यक होती. अशा दुर्गम जागी काहीतरी गरम खायला मिळते आहे यातच समाधान मानून आम्ही उपचारापुरते थोडेफार खाऊन घेतले. अर्धकच्चे खाऊन पोट बिघडायची भीती होतीच. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे जायला निघालो. ग्रुपमधल्या दोघांचे समोरचा पर्वत बघून आधीच अवसान गळाले होते. त्यांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. पंचवीसपैकी आता वीस जण राहिले होतो. रघूचा उत्साह तरीही कायम होता. आपल्या हसतमुख चेहऱ्याने तो सगळ्यांना वर चढण्यास प्रोत्साहित करत होता. मी माझ्या गतीने पुढे चाललो होतो. थोड्याच वेळात ती सपाट डोंगरधार मागे पडली आणि खडी चढण सुरु झाली.  
     
हळूहळू वर चढत जाणारी अजगर-वाट
बेदिनी बुग्यालचे रम्य दृश्य
वाट जसजशी वर चढू लागली तसे आजूबाजूचे लुसलुशीत गवत कमी होऊ लागले. रुक्ष खडकाळ प्रदेश सुरु झाला. अधून मधून खडकांच्या खोबणीत पांढरे शुभ्र बर्फ साचलेले दिसू लागले. आतापर्यंत हिरवागार दिसणारा भूप्रदेश आता राखाडी दिसू लागला. आम्ही हळूहळू हिमरेषेच्या जवळ जात असल्याची ती खूण होती. आता वाट अगदी अरुंद झाली होती. एका बाजूला होती खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला त्या अजस्र पर्वताचे अंग. मधूनच येणारे खेचरांचे कळप वाट अडवत होते. खेचरे जवळ येऊ लागली की त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज तीव्र होऊ लागे. मग सगळ्यात पुढचा माणूस मागच्यांना सावध करी. मग आम्ही सगळे पर्वताच्या अंगाला बिलगून खेचरे जाईपर्यंत थांबून राहू. हे असे संपूर्ण वाटेत दर दहा-एक पावलांवर चालू होते. त्या पर्वताच्या अंगाला वाट अशी काही बिलगली होती की तिथून ना पायथा दिसत होता ना माथा. दिसत होती ती फक्त न संपणारी नागमोडी वळणे!
एवढ्यात ढगांचा एक मोठाला पुंजका एका बाजूने खाली उतरताना दिसला. बघता बघता त्याने सारी वाट व्यापून टाकली. आता तर चार पावलांवरचेही दिसेना! म्हणता म्हणता पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. थेंब कसले, त्या होत्या साबुदाण्याएवढ्या गारा! एरवी गारांचा पाऊस बघताच टुणकन उडी मारूबाहेर बाहेर पडणारा मी त्या क्षणी मात्र चिंताग्रस्त झालो. पाऊस झाला, वारा झाला, आता हेच काय ते पहायचं राहिलं होतं! हळूहळू गारांचा आकार आणि जोर वाढू लागला. गारांच्या सोबत आता वाराही बेभानपणे वाहू लागला. त्या वाटेला कसलाच आडोसा नव्हता. सतत चालणारी खेचरांची ये-जा बघता एका जागी थांबणेही सोईचे नव्हते. आम्ही पुढे जात राहिलो. रघू अगदी मागे राहिलेल्यांना वर आणत होता. विजयेंद्रजी सगळ्यात पुढे होते. ते मस्तपैकी गारांच्या पावसात एका गुहेसारख्या खोलगट जागी विडी शिलगावून बसले होते. “ऐसी बारीश तो आम बात है” असा काहीसा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. काही क्षण त्यांच्याविषयी असूया वाटली. अशा दुर्गम प्रदेशातले वातावरणाचे कदाचित याहून भयंकर प्रकार त्यांनी अनुभवले असतील. ठरलेली लोकल भलत्याच फलाटावर येणे म्हणजे किती मोठे संकट हे रंगवून सांगणारे आम्ही मुंबईकर हिमालयातल्या त्या गारपिटीपुढे हतबल झालो होतो. 
 
जोपर्यंत उन होते तोपर्यंत सेल्फी काढता येत होते
जवळपास तासभर गारपीट चालू राहिली. इवल्याशा साबुदाण्याएवढ्या बर्फकणांचा त्या वाटेवर खच जमा झाला होता. पाय पडताक्षणी ते नाजूक मणी विरघळून चिखलात समरसत होते. पांढऱ्या शुभ्र मोत्यांचा जमिनीवर पडताना होणारा नाजूक आवाज, पडताक्षणी बदलणारा रंग, क्षणार्धात विरघळत जाणारा आकार, सारे काही पहात रहावे असे होते. निसर्गाच्या त्या रुद्रावतारात मी उगीच कवित्व शोधण्याचा प्रयत्न करत होतो.  ती चढण काही संपता संपत नव्हती. उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रेकर्सना आम्ही उगीच किती चढायचे आहे असे विचारू लागलो होतो. उंचीमुळे डोकं प्रचंड ठणकत होतं. शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर कधीच येऊन पोहोचला होता. तितक्यात काळू विनायकाचे मंदिर नजरेच्या टप्प्यात आले. तिथून पुढे वाट सपाट होणार होती. मोठ्या जिकिरीने ती शेवटची चार वळणे पार केली आणि मंदिराजवळ पोहोचलो. मंदिर कसले, दगडांच्या चौथऱ्यावर बसवलेली एक मूर्ती आणि बाजूने दगडांचीच केलेली कळससदृश रचना, एवढेच काय ते बांधकाम त्या डोंगरमाथ्यावर होते. पोतडीतून गारा घेऊन आलेल्या त्या ढगोबाने आजूबाजूचा सारा आसमंत व्यापला होता. 
 
बाजूलाच एक हॉटेल होते. जसजशी उंची वाढत होती तसतसा हॉटेलांचा आकार कमी होत होता आणि “मेनूकार्ड” वरच्या किमती वाढत चालल्या होत्या. इथले हॉटेल म्हणजे दिव्यच होते. रचलेले काही दगड आणि बांबूच्या दोन काठ्या यांच्या आधाराने एक ताडपत्री अंथरलेली होती. त्यात एक स्टोव्ह पेटवून दोन-चार तरुण पोरं बसली होती. आजूबाजूला आलं-लिंबांपासून मॅगीच्या पाकीटांपर्यंत सारे काही विखुरलेले होते. स्टोव्हवर चहाचे आधण धगधगत होते. त्यात नुकत्याच टाकलेल्या आल्यामुळे तो उग्र-तिखट वास साऱ्या वातावरणात पसरला होता. कसेबसे तिथपर्यंत पोहोचलेले आम्ही आडोशासाठी त्या हॉटेलच्या ताडपत्रीखाली शिरलो. साचलेल्या गारांच्या वजनाने ती ताडपत्री पार खाली झुकली होती. आम्ही सात-आठ जण माना वाकवून कसेतरी आत सामावलो. न मागताच हातात चहाचा कप आला. चहा कसला, आल्याचा काढाच म्हणा हवं तर! पण ते दोन घोट घशाखाली गेले तेव्हा अक्षरशः अमृत प्यायल्यागत वाटले. भूक लागली होती पण डोकेदुखी आणि  मळमळ यांमुळे काही खावेसे वाटत नव्हते. थोडा वेळ आम्ही तिथे विसावलो. गारपीट आता सौम्य झाली होती.
  

गारपीट थांबली आणि काळ्या ढगांचा पुंजका क्षणार्धात दूर झाला

              

गारांचा आवाज थांबल्यासारखा वाटला तेव्हा तिथून बाहेर पडलो. एक वळण पार केले आणि दूरवर भग्वबासाचा कॅम्प नजरेस पडला. आजची लढाई तर जिंकलो असे म्हणून जीवात जीव आलेले आम्ही ते शेवटचे दीड किलोमीटर अंतर चालू लागलो.
क्रमशः

Leave a Reply