मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ६ – ओरछा – एक लपलेले स्थापत्यरत्न – उपभाग २

चतुर्भुज मंदिर हे राजा मधुकर शाह याने सोळाव्या शतकात बांधले. राम राजा मंदिरातली रामाची मूर्ती खरे तर इथे स्थापित व्हायची होती. मात्र ते काही होऊ शकले नाही. म्हणून आजमितीस इथे राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित केलेली आहे. या मंदिराची रचना काहीशी एखाद्या चर्चसारखी आहे. प्रचंड उंच दालन, चार बाजूंनी चार उंच मनोरे, त्यावर चढायला गोल जिने, मध्यवर्ती भागात उंच सुशोभित खिडक्या, अशी रचना भारतातल्या इतर मंदिरांत सहसा आढळत नाही. या मंदिराचे चार मनोरे म्हणजे विष्णूचे चार हात अशी संकल्पना होती. या चार मनोऱ्यांपैकी एक मनोरा अपूर्ण आहे. असे म्हणतात, या मनोऱ्याचे बांधकाम सुरु असताना महाराणीच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे बांधकाम अर्धवटच राहिले. एकंदरीत या मंदिराची रचना एकदमच वेगळी आहे. त्यामुळे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे एक विशेष औत्सुक्याचा विषय आहे. असो. 

चतुर्भुज मंदिराचे प्रवेशद्वार 
दमछाक करणाऱ्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. कमळाच्या आकृतींनी सजवलेल्या प्रचंड द्वारातून आम्ही आत शिरलो. इथल्या भिंती स्थानिकांनी विद्रूप केल्या होत्या. ते बघून विषण्ण वाटले. तेवढ्यात एक पुजारी वजा गाईड धावत आला. गळ्यात कॅमेरे लटकवलेले दोन तरुण म्हणजे त्याला चार पैसे कमवायची नामी संधी वाटली असावी. गोल जिन्यावरून गच्चीपर्यंत नेतो असे म्हणून त्याने आम्हाला पटवले. आधी पाचशे म्हणत होता. शेवटी शंभर रुपये द्यायचे ठरले. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मंदिराच्या उंच दालनांमुळे हलका आवाजही घुमत होता. न हलणाऱ्या रामाच्या मूर्तीची कथा या गाईडकडून पुन्हा एकदा ऐकली. आम्ही मुळात उत्सुक होतो गच्चीवर जाण्यात. एका मनोऱ्याच्या जिन्यावरून आम्ही वर चढू लागलो. हे सगळे खरेच एखाद्या चर्चसारखे वाटत होते. मधल्या सज्ज्यावर चार बाजूंना चार सुशोभित गवाक्षे बांधली होती. त्यांपैकी एक गवाक्ष थेट राधा-कृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घडवत होते. तिथून मग आम्ही गच्चीवर पोहोचलो. कुठलाच कठडा नसलेली ही गच्ची काहीशी असुरक्षितच होती. मात्र संपूर्ण शहराचा अप्रतिम देखावा इथून दिसत होता. विशेषतः समोरचा जहांगीर महाल अगदीच उठून दिसत होता. इथे एक मुख्य शिखर, एक उपशिखर, आणि त्याच्या पुढे मशीदीवर असतो तसा एक घुमट दिसत होता. मंदिराच्या स्थापत्यविशारदाने नक्की काय विचार करून अशी स्थापत्यघटकांची सरमिसळ केली असेल देव जाणे! पण त्यातून घडलेले स्थापत्यरत्न अद्भुत होते एवढे नक्की!

चतुर्भुज मंदिराच्या गच्चीवरील मनोरे 

चतुर्भुज मंदिराची गवाक्षे 
चतुर्भुज मंदिर पाहून आम्ही बाहेर पडलो तेव्हा दुपारचे दोन वाजत आले होते. मग आम्ही आधी जेवण करायचे ठरवले. विदेशी पर्यटकांच्या वर्दळीमुळे इथे काही उत्तम सेवा देणारी उपहारगृहे चालू झाली आहेत. आम्ही त्यांपैकीच एका ठिकाणी जेवण उरकले आणि लक्ष्मी-नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागापासून काहीसे दूरवर एका टेकडीवर होते. उन्हं बरीच तापली होती. हिवाळ्याचे दिवस असले तरी दुपारचं ऊन चांगलंच चटका देत होतं. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशैलीचा आणखीन एक वेगळा नमुना होतं. 


मंदिराची तटबंदी 
प्रथमदर्शनी तर ती वास्तू एक किल्लाच वाटत होती. चार बाजूंनी उंच संरक्षक भिंती, कोनांवर बुरुज, तटबंदीवर तोफांसाठी भोकं, असे एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखे मंदिराचे रूप होते. मध्यभागी एक उंच मनोरा होता. हा मनोरा म्हणजेच मुख्य शिखर. मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो. गाभाऱ्याच्या चारही बाजूंनी विस्तृत आयताकृती दालने होती. त्यांच्या भिंतींवर आणि छतांवर सुरेख चित्रे काढलेली होती. यातील बरीचशी चित्रे रामचरितमानस या साहित्यकृतीवर बेतलेली होती. काही चित्रे राजामहाराजांची होती. एका बाजूने मुख्य मनोऱ्यावर जाणारा जिना होता. इथेही वर चढताना एखाद्या चर्चचा आभास होत होता. गच्चीवरून थोडेफार फोटो काढून आम्ही शहराकडे परत निघालो. 

दालनामधील सुरेख चित्रकला 
राजामहाराजांची चित्रे 
मंदिराचे मुख्य शिखर/मनोरा 

प्रियांकची जायची वेळ झाली होती. त्याच्यासोबत फिरताना वेळ मस्त गेला होता. त्याला फेसबुकवर अॅड करून त्याचा निरोप घेतला. साधारण साडेतीन वाजले होते. अजून नदीकाठच्या छत्र्या बघायच्या राहिल्या होत्या. पण दिवसभर फिरून फिरून पाय थकले होते. मग गेस्ट हाउसवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि सूर्यास्ताच्या वेळी छत्र्या बघायला निघालो. या छत्र्या म्हणजे बुंदेला राजांच्या समाध्या होत. एकूण चौदा छत्र्या बेतवा नदीच्या काठाने बांधलेल्या आहेत. मी प्रवेशद्वारापाशी पोहोचलो तेव्हा पाच वाजत आले होते. सव्वापाचला तो परिसर बंद व्हायचा होता. तिथला सुरक्षारक्षक आत सोडायला तयारच होईना. मग गयावया करून फोटो काढून लगेच बाहेर येतो असे सांगून मी आत शिरलो. एक चौरसाकृती इमारत, चार कोनांवर चार लहान मनोरे, आणि मध्यभागी उंच असा मुख्य मनोरा, असे प्रत्येक छत्रीचे सर्वसाधारण स्वरूप होते. इथल्या स्थापत्यशैलीवर मुस्लीम शैलीचा जास्त प्रभाव जाणवत होता. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात त्या छत्र्या चमकत होत्या. छत्रीच्या आत किंवा गच्चीवर जायला परवानगी नव्हती. तिथे दोन-चार फोटो काढतोय ना काढतोय तेवढ्यात सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत आत येताना दिसला. माझा थोडासा हिरमोडच झाला. उगीच विश्रांती घ्यायला गेलो असं वाटलं. हिरमुसून मी बाहेर पडलो. बाजूलाच नदी वाहत होती. नदीवर सुंदर घाट बांधलेला होता. छत्र्यांचा परिसर आता बंद झालेला असला तरी बाहेरून सगळ्या छत्र्या पाहता येत होत्या. किंबहुना घाटावरूनच त्यांचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. मग काय, मी कॅमेरा काढला आणि सुटलो. अंधार पडेपर्यंत मनसोक्त फोटो काढले आणि शहराकडे यायला निघालो. येता येता रामराजाचे दर्शन घेतले आणि गेस्ट हाउसवर परतलो. 

ओरछा मधील छत्र्या 

सोनेरी उन्हात चमकणाऱ्या छत्र्या 

छत्र्यांच्या पार्श्वभूमीवरचा रम्य सूर्यास्त 

छत्री जितकी मोठी आणि सुशोभित तितके त्या राजाचे सामर्थ्य मोठे 

एकंदरीत आजचा दिवस मस्त गेला होता. ओरछा मधल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरत्नांचे दर्शन घडल्याने एक वेगळेच समाधान वाटत होते. आता पुढचा मुक्काम होता ग्वाल्हेर. सकाळी लवकरच निघायचे होते. म्हणून लवकर जेवण आटोपले आणि झोपी गेलो.   
क्रमशः 

Leave a Reply