मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग १ – मुंबई ते खजुराहो व्हाया दिल्ली

“चाचा थोडा तेज चलो प्लीझ…” मी अगदी हतबलपणे रिक्षावाल्या काकांना विनंती वजा आर्जव करत होतो. नवी दिल्लीच्या प्रशस्त पण वर्दळीच्या रस्त्यांवरून रिक्षा निजामुद्दीन स्टेशनकडे धावत होती. नेहमीप्रमाणे मी घाईत होतो. ट्रेन सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी होता. आणि गुगलबाई पोहोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ २५ मिनिटे दाखवत होती. माझा जीव वर-खाली होत होता. त्यात रिक्षा चालवणारे काका जरा वयस्करच दिसत होते. ते बिचारे मला वेळेत पोहोचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. मी मनोमन ईंडी-गो कंपनीला विमानाला उशीर केल्याबद्दल शिव्या घालत होतो. ट्रेन जर चुकलीच तर काय करायचे याची जुळवाजुळव एकीकडे चालली होती. फेब्रुवारी महिन्यातला दिल्लीतला गारठा अंगाला झोंबत होता. शेवटी एकदाची रिक्षा स्टेशनच्या परिसरात शिरली. काकांच्या हातात पाचशेची नोट कोंबून मी फलाटाकडे धावत सुटलो. सुदैवाने अजून ७ मिनिटे बाकी होती गाडी सुटायला. मी पुलावरून बघतो तर काय, फलाट तुडुंब गर्दीने भरलेला! यूपी संपर्क क्रांती नामक ही गाडी भलतीच लोकप्रिय होती तर. गाडीचे दरवाजे नुकतेच उघडलेले असावेत. सगळी गर्दी प्रचंड कोलाहल करत गाडीत घुसायचा प्रयत्न करत होती. क्षणभर मला धडकीच भरली. आता या गर्दीत मी एसी-२ चा डबा कसा काय शोधू?? आधीच उशीर झालेला. त्यात या गर्दीची भर! दुष्काळात तेरावा महिना! मी उगीच चरफडत फलाटावर डब्यांचे नंबर लावलेले दिसतायत का ते बघू लागलो. 

मध्य प्रदेश सहलीची रूपरेषा 

तेवढ्यात टीसी दिसला. शेवटी त्याच्या मदतीने मी योग्य डब्यापर्यंत पोहोचलो. इथे तर फलाट मोकळाच दिसत होता. अगदी जनरलच्या डब्यातही तुरळकच गर्दी दिसत होती. हा काय प्रकार आहे काही समजत नव्हतं. जाऊदे म्हणून मी बर्थवर सामान टाकलं आणि सुस्तावलो. पुढच्याच मिनिटात गाडी सुटली. मी एक सुटकेचा निश्वास टाकला. मनोमन त्या रिक्षावाल्या काकांना धन्यवाद दिले. मग सहप्रवाशाशी बोलता बोलता कळलं की ही एक गाडी नसून एकमेकाला जोडलेल्या दोन गाड्या आहेत. एक भाग उत्तर प्रदेशातल्या माणिकपूरकडे जाणार होता तर दुसरा खजुराहो कडे. आता कुठे त्या गर्दीच्या विषम विभाजनाचं रहस्य उलगडलं! मी पुन्हा एकदा आपण योग्य डब्यात बसलोय की नाही याची खातरजमा करून घेतली. प्रवास रात्रीचा असल्याने बाहेरचं काही दिसणार नव्हतं. मी मस्तपैकी कानात इयरफोन लावून गाणी ऐकत पहुडलो. खजुराहो शेवटचं स्थानक असल्याने मी निश्चिंत होतो. 

फलाटावरची गर्दी 

खजुराहो – दहाव्या शतकातल्या मंदिरांसाठी सुप्रसिद्ध असलेली जागा. त्याहून प्रसिद्ध म्हणजे इथली गूढ मैथुनशिल्पे! परदेशात असताना बरेच जण विचारायचे त्याबद्दल. किंबहुना खजुराहो पाहून आलेले लोक मला भारतापेक्षा परदेशातच जास्त भेटले असतील! तर अशी जगप्रसिद्ध जागा बऱ्याच वर्षांपासून बकेटलिस्ट वर होती. त्या जोडीने ओरछा आणि ग्वालियरविषयीही ऐकून होतो. शेवटी एकदा सुट्टीचा योग जुळवून आणला आणि खजुराहो – ओरछा – ग्वालियर अशी सहा दिवसांची सहल ठरवली. प्रत्येक जागेसाठी साधारण दीड ते दोन दिवस ठरवले. अंतर्गत फिरण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ ठेवला. सगळी रूपरेषा ठरवून तिकिटे बुक करायला वळलो. मुंबईहून खजुराहोला पोहोचणं म्हणजे एक दिव्य होतं. एकतर थेट ट्रेन उपलब्ध नाही. थेट विमानसेवाही नाही. सतना किंवा झांसी मार्गे जायचं तर कमीतकमी चोवीस तासांचा प्रवास. त्यात आरक्षित तिकीट मिळण्याची मारामार. थोडं अजून शोधल्यावर कळलं की दिल्लीहून खजुराहोसाठी थेट ट्रेन आहे, तीसुद्धा एका रात्रीत जाणारी. मग सरळ मुंबई ते दिल्ली विमानाचं तिकीट काढलं आणि दिल्लीहून खजुराहोपर्यंत ट्रेनचं. नाही म्हटलं तरी प्रवासाचे आठ-दहा तास वाचणार होते. आणि मुंबई-दिल्ली विमान काही फार महाग नव्हतं. असो.
मथुरा आलं तसं जेवण वगैरे उरकलं आणि बर्थवर पसरलो. गाडीची धडधड छान अंगाई म्हणत होती. दिवसभरच्या धावपळीत जीव थकला होता. झोप कधी लागली ते कळलंच नाही. 

क्रमशः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *