बर्फाळलेले आईसलँड – भाग २ – एस्या गिरीभ्रमण आणि मध्यरात्रीचा सूर्यास्त

जाग आली तेव्हा पावणेदहा वाजले होते. कालच्या विमानप्रवासाचा शीण जाणवत होता. होस्टेलच्या
खोलीतल्या जाड काळ्या पडद्यांमुळे बाहेरच्या वातावरणाचा अंदाज येत नव्हता. मुळात
सूर्यप्रकाश आणि घड्याळातली वेळ यांचा काही ताळमेळच नसल्याने हवी तेव्हा शांत झोप
काढता यावी म्हणून अशा पडद्यांची सोय केली असावी. मी आवरून खाली आलो. आजचा दिवस
रिकयाविक शहर पाहण्यासाठी ठरवला होता. हॉस्टेल शहराच्या मध्यवर्ती भागातच होतं.
रिकयाविक मधली मुख्य मार्गिका ‘लाउगावेगुर’ म्हणून ओळखली जाते. शहरातली मुख्य
खरेदीची केंद्रे, उपहारगृहे, वगैरे याच भागात आहेत. तशी युरोपातल्या प्रत्येक
शहरात अशी एक शॉपिंग स्ट्रीट असते. शहराच्या सामाजिक जीवनाचा तो केंद्रबिंदू असतो.
एकंदरीतच तिथलं दैनंदिन आयुष्य किती ‘हॅपनिंग’ आहे याचा अंदाज तिथल्या
वातावरणावरून बांधता येतो. लाउगावेगुर तशी काही फार मोठी नव्हती. त्यात गुरुवारची
सकाळ असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. तसं हे शहर राजधानीचं शहर वाटतच नव्हतं. युरोपातल्या
एखाद्या मध्यम आकाराच्या शहरासारखा
रिकयाविकचा तोंडवळा होता. पर्यटनाच्या हंगामाची नुकतीच सुरुवात असल्याने
पर्यटकांची गर्दीही फार दिसत नव्हती. आपण निवडलेली वेळ योग्य असल्याचे जाणवताच जरा
हायसं वाटलं. एका छानशा कॅफे मध्ये शिरलो,
एक गरमागरम कॉफी मागवली, आणि शहराचा आस्वाद घेत विसावलो. आज नक्की करायचं काय हेही
ठरवायचं होतंच. योगायोगाने त्या कॅफेच्या रिसेप्शनवर आसपासच्या ठिकाणांची माहिती देणारी
काही पत्रकं होती. ती उचलली आणि कॉफीचे घुटके घेत चाळत बसलो.     

ती सारी पत्रकं रिकयाविकमधल्या लहान-मोठ्या पर्यटन कंपन्यांची होती. तिथल्या
बंदरातून व्हेल वॉचिंग, पफिन वॉचिंग वगैरे सहली उपलब्ध होत्या. मात्र त्यांचे तिकीट
आणि व्हेल किंवा पफिन दिसण्याची अनिश्चितता पाहता मी त्या वाटेला न जायचे ठरवले.
तेवढ्यात माझी नजर स्थिरावली एस्या टेकड्यांच्या माहितीवर. शहरापासून तीसेक किमी
अंतरावर एस्या हिल्स आहेत. अर्ध्या दिवसात या टेकड्यांवर एक छोटासा ट्रेक सहज शक्य
होता. मी ताबडतोब बसचे वेळापत्रक बघितले, खाऊ-पिऊच्या गोष्टी खरेदी केल्या, आणि
निघालो. तासाभरात टेकड्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथल्या पार्किंगच्या जागेजवळच
एक टुमदार कॅफे होता. त्याच्या शेजारीच एस्या टेकड्या आणि परिसरातल्या ट्रेकिंग
मार्गांची माहिती देणारा फलक होता. नशिबाने माहिती स्थानिक भाषेसोबत इंग्रजीतूनही
दिली होती. बाकीचे युरोपियन देश पर्यटकांसाठी तेवढीही तसदी घेत नाहीत. २-३ तासांत
संपेल असा एक मार्ग मी निवडला आणि मोरया म्हणून चढायला सुरुवात केली.

ल्युपिनच्या फुलांनी खुलून दिसणारा एस्या टेकड्यांचा परिसर

हा मार्ग एका झऱ्याच्या बाजूने जात होता. आईसलँडचा बहुतांश प्रदेश लाव्हा
पठारे, हिमनद्या, ज्वालामुखी, आणि बर्फाची पठारे यांनी व्यापलेला असल्याने इथे
मोठे वृक्ष फारसे दिसत नाहीत. पुरातन काळात जहाजबांधणीसाठी बेसुमार वृक्षतोड
झाल्याने इथली वृक्षसंपदा आज फारच मर्यादित आहे. या टेकड्यांच्या पायथ्याशी
थोडीफार झाडे दिसत होती. मात्र बहुतांश भाग वैराणच होता. उन्हाळ्याची नुकतीच
सुरुवात झाल्याने हिरवंगार गवत सगळीकडे वाढलं होतं. झऱ्याच्या काठाकाठाने वाढलेली जांभळी
फुले लक्ष वेधून घेत होती. अगदी स्थानिक भासणारी ही फुले मुळची आईसलँडची नाहीत. ‘अलास्कन
ल्युपिन’ या नावाने ओळखली जाणारी ही फुले १९४५ च्या सुमारास अलास्काहून आईसलँड
मध्ये आणली गेली. इथल्या लाव्हा पठारांची सतत होणारी धूप रोखणे आणि जमिनीतील
सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढवणे असा रास्त हेतू त्यामागे होता. मात्र आजच्या
काळात ही ल्युपिनची फुले आक्रमक प्रजात ठरली आहेत. तिथल्या स्थानिक जैवविविधतेला
त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. ते काहीही असले तरी ती फुले नाहीतरी वैरण
असणाऱ्या प्रदेशात एक वेगळी रंगछटा निर्माण करीत होती. त्या फुलांचे काही फोटो
काढून मी पुढे निघालो.

टेकड्यांच्या माथ्यावरून दिसणारे रिकयाविक शहर

हळूहळू चढण तीव्र होऊ लागली. टेकड्यांच्या माथ्यावर दिसणारे बर्फ आता हाकेच्या
अंतरावर आल्यासारखे वाटत होते. एक वळण घेऊन वाट मधल्या एका छोट्या पठारावर येऊन पोहोचली.
इथे थोडं थांबू असा विचार करून एका दगडावर बसलो. मागे नजर टाकली तर समोरच्या
दृश्याने स्तंभितच झालो. समुद्रकिनारी वसलेले रिकयाविक शहर फारच मोहक दिसत होते.
अधूनमधून खाड्यांनी छेदलेला किनारा आणि शहरामागची डोंगररांग जणू काही शहराला कुशीत
घेऊन निवांत पहुडले होते. समुद्रावरचा वर इथे उंचावर बेभान सुटला होता. माझ्या
मार्गात येणारी तू कोण असंच जणू काही टेकडीला विचारत होता. तीव्र चढावावर थोडे सैल
केलेले मफलर इथे मी जरा जास्तच आवळून बांधले. या पठारावरून एक रस्ता थेट माथ्याकडे,
तर दुसरा टेकडीच्या दुसऱ्या धारेने खाली उतरत होता. माथ्याकडे जाणारा रस्ता थोडा
खडकाळ आणि तीव्र चढाचा होता. शिवाय त्या खडकांमध्ये थोडेफार बर्फही साठलेले होते.
बहुतेक लोक याच ठिकाणाहून खाली परत जात होते. मला वर जाण्याचा मोह होत होता. पण अपेक्षेपेक्षा
जास्त वेळ लागला तर शेवटची बस चुकेल या भीतीने मी सरळ खाली जाणारी वाट धरली. 
ही दुसरी वाट आधीच्या वाटेपेक्षा थोड्या कमी तीव्र उताराची होती. खाली खळाळत
वाहताना दिसणारा झरा इथे एका मंद लयीत वाहत होता. तो ओहोळ, आजूबाजूची ल्युपिनची
फुले, आणि दूरवर दिसणारे रिकयाविक शहर एखाद्या परीकथेसारखे भासत होते. ते सारे
दृश्य डोळ्यांत आणि कॅमेरात साठवून मी खाली उतरलो. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या
कॅफेमध्ये एक गरमागरम कॉफी घेतली आणि बस पकडून हॉस्टेलवर परतलो.

एस्या टेकड्यांचा रमणीय प्रदेश
होस्टेलच्या खोलीत शिरलो तेव्हा खोलीतले दोघे सहनिवासी गप्पा मारत बसले होते.
फिलीप नावाचा एक मेक्सिकन मुलगा आणि क्लारा म्हणून एक ब्रिटीश मुलगी संध्याकाळच्या
जेवणाला कुठे जायचं याचा बेत करत होते. मीही त्यांच्यात सामील झालो आणि तिघे
एकत्रच जेवायला बाहेर पडलो. आईसलँडमधलं स्थानिक खानपान हे मुख्यत्वे सी-फूड होतं. शाकाहारी
असल्याने मी सरळ एक वेज पिझ्झा मागवला. जेवणानंतर आम्ही तिघे सहज शहरांत फेरफटका
मारायला निघालो. एव्हाना रात्रीचे साडेदहा वाजत आले होते. लाउगावेगुर वर गर्दी
वाढू लागली होती. गुरुवारची संध्याकाळ असल्याने बार आणि पब मध्ये विशेष सवलती
होत्या. आईसलँडमध्ये एकंदरीतच सगळे महाग असल्याने ते सवलतीचे दरही महाग वाटत होते.
आम्ही सरळ समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघालो. दिवसभर स्वच्छ दिसणारे आकाश आता थोडे
ढगाळ वाटत होते. सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलला होता. त्या तिरप्या सोनेरी किरणांत
काळ्या ढगांच्या कडा झळाळत होत्या. किनाऱ्याच्या बाजूने जाणारा तो रस्ता मुंबईतल्या
मरीन ड्राइव्हची आठवण करून देत होता. सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेले रिकयाविक
त्या रस्त्यावरून फारच मोहक दिसत होते.

किनाऱ्यालागतचा हा रस्ता मरीन ड्राइव्ह सारखा भासत होता. 

तेवढ्यात समोर दिसले रिकयाविकमधले एक प्रमुख आकर्षण – सन वोयाजर (The Sun Voyager). १९८६ साली रिकयाविक च्या २०० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहराच्या
महापालिकेने एक बाह्यशिल्पाकृती स्पर्धा आयोजित केली होती. जॉन गुनार अर्नासन याने
घडवलेली सन वोयाजर ची शिल्पाकृती ही स्पर्धा जिंकली. ठरवल्याप्रमाणे या
शिल्पाकृतीचा स्टेनलेस स्टील मध्ये घडवलेला भव्य अवतार किनाऱ्यावरच्या मोक्याच्या
जागी स्थापित करण्यात आला. हे शिल्प म्हणजे एका नवे जग शोधण्यासाठी निघालेल्या जहाजाची
कलात्मक प्रतिकृती आहे. आईसलँडवर झालेली मानवी वस्ती ही अशाच शोधमोहिमांचे फलित
आहे. त्यामुळे आईसलँडच्या समाजजीवनावर त्या ऐतिहासिक कालखंडाचा मोठा प्रभाव आहे.
एखादा अज्ञात प्रदेश सापडावा, तो संपन्न असावा, तिथे आपण वस्ती करावी, आणि उत्कर्ष
साधावा अशा आशावादाचे प्रतिनिधित्व ही शिल्पाकृती करते. तर अशा या सन वोयाजरजवळ
आम्ही जरा वेळ विसावलो. रात्रीचे साडेअकरा वाजत आले होते. योगायोगाने पश्चिम
क्षितिजावरचे ढग दूर झाले होते आणि अस्ताला चाललेल्या सूर्यनारायणाचे यथोचित दर्शन
घडत होते. जवळपास मध्यरात्रीच्या वेळी सूर्यास्त पाहणे ही माझ्यासाठी फारच
उत्साहाची गोष्ट होती. मी एकामागोमाग एक फोटो काढत होतो. बाजूलाच एक स्ट्रीट
म्युझीशियन गिटार वाजवत सुरेख वातावरणनिर्मिती करत होता. जसजसे सूर्यबिंब
क्षितिजाखाली जाऊ लागले, तशा आसमंतातल्या छटाही बदलू लागल्या. काही वेळात
सूर्यास्त झाला आणि ती सोनेरी प्रभा नाहीशी झाली. तिची जागा आता अंधुकशा
संधिप्रकाशाने घेतली. पूर्ण अंधार तसाही होणार नव्हता. दिवसभराच्या भटकंतीने पाय
मी म्हणत होते. क्लारा आणि फिलीप मात्र बारमध्ये जायच्या मूडमध्ये  होते. मी त्यांचा निरोप घेतला आणि खोलीवर येऊन, काळे
पडदे ओढून झोपी गेलो. 

सन वोयाजर – रिकयाविक मधील एक प्रमुख आकर्षण 

मध्यरात्रीचा सूर्यास्त
क्रमशः 

Leave a Reply