फुटबॉल आणि मी

गेले काही महिने चालू असलेली २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकाची धामधूम अखेर संपली. फ्रान्सने चषक जिंकला आणि दर चार वर्षांनी येणारे एक आवर्तन संपले. त्यानिमित्ताने जर्मनीत असताना फुटबॉलबाबतच्या काही गमतीदार आठवणी जाग्या झाल्या. तसा माझा आणि फुटबॉलचा संबंध जवळपास नसल्यागत. माझं तसं कुठल्याच खेळाशी सख्य जमलं नाही. क्रिकेटशी तर छत्तीसचा आकडा. भारतात क्रिकेटच्या नावाखाली चाललेला हैदोस तर उबग आणतो अक्षरशः! भारतात असेपर्यंत फुटबॉलचे फारसे एक्स्पोजर नव्हते. २०११ मध्ये जर्मनीत आलो आणि अंगावर फुटबॉल जणू आदळू लागला. सतत कुठली ना कुठली स्पर्धा चालू असायची. खेळ असला की जर्मन लोक बारमध्ये मित्राचं कोंडाळं करून मोक्याची जागा पकडून बसणार, मोठा बियरचा टॉवर किंवा पिचर मागवणार, आणि मग खेळ बघत बियरचे घुटके घेत संपूर्ण संध्याकाळ घालवणार, हे नेहमीचं चित्र. आधीच फुटबॉलमध्ये रस नसणारा मी, ती गर्दी आणि वाढलेल्या बियरच्या किमती बघून खेळाच्या दिवशी कधी चुक्कूनसुद्धा बारमध्ये फिरकायचो नाही.

फोटो इंटरनेट वरून साभार (https://www.newyorker.com/culture/culture-desk/how-to-enjoy-soccer)


एके शनिवारी कुठल्याशा जर्मन संघाचा इतर कुठल्याशा लोकप्रिय संघाशी खेळ होता. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. सुपरमार्केट मधले बियरचे सेक्शन दुपारीच ओस पडलेले दिसत होते. बारवाल्यांची जय्यत तयारी सुरु होती. माझा तसा काहीच प्लॅन नव्हता. एखादा पिक्चर-बिक्चर बघायचा आणि झोपी जायचे असाच विचार चालू होता. तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. त्याच्या कोणा मित्राने एका जवळच्या बारमध्ये दोघांची जागा आरक्षित केली होती. पण तो मित्र काही कारणास्तव येऊ शकणार नव्हता. म्हणून हा मला बोलवत होता. हा गडी म्हणजे फुटबॉलचा निस्सीम भक्त. तो एकवेळ जेवणखाण सोडेल पण खेळ चुकवणार नाही! माझ्या फुटबॉल “प्रेमा”बद्दल त्याला थोडीफार कल्पना होती. पण तोही त्या शहरात नवीनच असल्याने त्याची फारशी कोणाची ओळख नव्हती. एकसे भले दो म्हणून तो मला चल म्हणत होता. मी तर सुरुवातीला नाहीच म्हटले. पण तो अगदीच आग्रह करू लागल्यावर मी शेवटी तयार झालो. आजूबाजूला काही का चालेना, आपल्याला बियर पिण्याशी मतलब! ते उत्साहाने भारलेलं वातावरण अनुभवायची सुप्त इच्छाही होतीच. शेवटी जर्मन संस्कृतीचा हाही एक भागच नाही का! जवळच जायचे आहे, अगदीच वैताग आला तर कधीही घरी निघून येऊ, असा विचार करून मी बाहेर पडलो.   

आयरिश हाउस ही बारची चेन खेळांच्या स्क्रीनिंगसाठी प्रसिद्ध. आम्हाला तशी कोपऱ्यातलीच जागा मिळाली होती. जेमतेम स्क्रीन दिसत होती. खेळ सुरु व्हायची वेळ झाली आणि सगळा बार तुडूंब भरला. मी नेहमीची बियर मागवली आणि शांतपणे घुटके घेत बसलो. स्क्रीनवर चाललेल्या खेळापेक्षा तिथे जमलेल्या लोकांचे आविर्भाव, त्यांचा प्रतिक्रिया, आरडाओरड हेच जास्त करमणुकीचं वाटत होतं. खेळाकडे माझं तसं लक्षच नव्हतं. स्क्रीनवर ०-० चा स्कोअर आणि राहिलेली पाचेक मिनिटे तेवढी दिसत होती. थोडक्यात, पुढच्या काही मिनिटात एखादा गोल झालाच तर तो निर्णायक ठरणार होता. आता गोल झालाच तर निदान तो कोणी केला हे माहित असावं म्हणून मी मित्राला विचारलं, हे लालवाले जर्मन आहेत की निळेवाले?? खेळाच्या या टप्प्यावर माझ्याकडून आलेला हा प्रश्न बघून मित्राने माझ्याकडे एक संमिश्र कटाक्ष टाकला. त्यात काहीसा विस्मय, थोडासा राग, आणि कुठेतरी तुच्छताही असावी कदाचित! मी फुटबॉल-अनभिज्ञ आहे हे त्याला माहित होते. पण माझी अनभिज्ञता, किंवा त्याहूनही बेपर्वाई, या पातळीची असेल असे कदाचित त्याला वाटले नसावे. तो काही बोलणार एवढ्यात समोर गोल झाला आणि सगळ्यांनी एकच चीत्कार केला. त्या काही सेकंदांत जर्मन खेळ जिंकले होते. तो ऐतिहासिक क्षण पहायचा चुकला म्हणून हा महाशय माझ्यावर असा काही भडकला की विचारू नका! आता त्या गोलचे सतराशे साठ रिप्ले का दाखवेना, त्याला त्या क्षणाची तोड नव्हती. मी तो भोळसट प्रश्न विचारून जणू त्याची संध्याकाळच खराब केली होती. शेवटी त्याच्यासाठी एक थंड बियर मागवली तेव्हाकुठे तो जरा शांत झाला. त्याच्यानंतर या मित्राने परत कधी मला फुटबॉल बघायला चल म्हणायची तसदी घेतलेली नाही! 

तर असे हे माझे फुटबॉल-प्रेम! २०१४ साल उजाडले आणि फुटबॉल विश्वचषकाचे पडघम वाजू लागले. जर्मनीत तर जणू काही दिवाळसणच होता. असाच एके संध्याकाळी मी लॅबमधून घरी परतत होतो. साडेसात-आठची वेळ असेल. पण रस्त्यावर अगदी शुकशुकाट होता. कुठलातरी महत्वाचा सामना असावा. मधूनच आजूबाजूच्या घरांतून चीत्कार ऐकू येत होते. एरवीपेक्षा हे ओरडण्याचे प्रमाण जरा जास्तच वाटत होते. भलताच रंजक सामना चाललेला दिसतोय असं म्हणून मी नेहमीच्या तंद्रीत घरी पोहोचलो. आणि पाहतो तर काय, सगळे सहवासी मित्र आणि त्यांचे काही मित्र ख्रिसच्या खोलीवर जमले होते. नुसता गोंगाट चालू होता. आज बुधवारची कसली यांची पार्टी? मी सहज आत डोकावले. आणि सगळे एकदम ओरडले, “अरे! तू आहेस कुठे? हे बघ काय चाललंय?” “मी.. मी तर आत्ता कुठे लॅबमधून येतोय. का? झालं काय एवढं?” “अरे, जर्मनीने ब्राझीलवर ७-१ अशी मात केलीये! आहेस कुठे तू? एकामागोमाग एक ७ गोल!!” आता कुठे त्या घराघरातून ऐकू येणाऱ्या चीत्कारांचं रहस्य उलगडलं! ७ गोल म्हणजे कमालच झाली की! मग मी उगाचच तिथली एक बियर उचलली आणि त्या ७ गोलांच्या कथा ऐकत बसलो. मला याच्यात रस नाही हे सांगून उगाच त्यांचा मूड कशाला खराब करावा? एक गोष्ट मात्र कळून चुकली. फुटबॉलचा सामना बघताना जर्मन लोक त्यांच्या बेस्ट मूडमध्ये असतात. आणि बियरच्या अमलाखाली तुम्ही नक्की खेळ बघताय की नाही, तुम्हाला खेळ समजतो की नाही, याच्याशी त्यांना काही-एक देणं-घेणं नसतं. क्रिकेट बघणाऱ्या भारतीय लोकांसारखी आपल्यालाच खेळ कसा जास्त समजतो हे दाखवण्याची अहमहमिका त्यांच्यात नसते. त्यामुळे पुढच्या वेळी नुसत्या पार्टी मूडसाठी का होईना, सामना बघायचा निर्णय मी घेतला. 

तशी संधी लवकरच आली. पुढच्याच आठवड्यात जर्मनी विरुद्ध अर्जेन्टिना असा अंतिम सामना होता. जर्मन लोकांत जणू उत्साहाचं वारं शिरलं होतं. सगळ्यांचे प्लॅन बनत होते. मीही एक भारतीय मित्र आणि त्याच्या ग्रुपसोबत जायचं ठरवलं. या वेळी बार माझ्या घरापासून तसा लांब होता. तसा मी कायम सायकलीने फिरायचो. पण आज अंतिम सामना म्हटल्यावर पोलीस बंदोबस्त असेल. मग बारमधून निघताना कोणी पकडलं तर? उगाच कशाला रिस्क? असा विचार करून मी सरळ ट्राममध्ये चढलो. यथावकाश सामना सुरु झाला. कितीतरी वेळ विशेष काही घडतच नव्हतं. नुसतीच टोलवाटोलवी चालू होती. वेळ संपत आली तरी एकही गोल नाही! लोकंही वैतागली होती. अखेर पेनल्टी शॉट मध्ये जर्मनीने एक गोल केला आणि एकच जल्लोष झाला! लोकं नक्की गात होती, ओरडत होती, की घोषणा देत होती, देव जाणे. पण जो काही गलका सुरु होता तसा गलका मी जर्मनीत आजतागायत कधी बघितला नव्हता. इथे फुटबॉलच्या सामन्यांच्या वेळी दंगली वगैरे होतात असं ऐकलं होतं. लोकं तोडफोड करतात, हाणामाऱ्या करतात, काय वाट्टेल ते करतात. आता कुठल्याही क्षणी यांचा हा हिस्टेरिया मर्यादेच्या माहेर जाऊ शकतो असं बघून आम्ही सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. ग्रुपमधले काही जण अजून पुढे सेलिब्रेट करायला जाणार होते. मला आधीच त्या गर्दीचं आणि कोलाहलाचं अजीर्ण झालं होतं. मी आपला त्यांना बाय करून ट्रामच्या थांब्याकडे निघालो.

तिथे तर वेगळंच चित्र होतं. बिस्मार्कप्लात्झचा सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. लोकं शेडवर, झाडांवर, पोलवर, कशाकशावर चढली होती. भर चौकात ट्राफिक रोखून धरलं होतं. जोरजोरात हॉर्न बडवणं चाललं होतं. मध्येच कोणी गर्दीतले १०-१२ लोक एकत्र येऊन गोल फेरा धरून नाचत होते. लोकांना जणू वेड लागलं होतं. एरवी अतिशय शांत आणि शिस्तप्रिय असणारे जर्मन आज तर अंगात आल्यासारखं वागत होते. आणि ट्राम किंवा बसचा काही पत्ताच नव्हता! रात्रीचे साडेबारा वाजत आले होते. नेहमीच्या वेळापत्रकानुसार इव्हाना एक ट्राम यायला हवी होती. इंडिकेटर वर तसं दिसतही होतं. पण सगळ्या ट्राम जागच्या जागीच थांबल्या होत्या. आता काय करावं? ज्या मित्रांसोबत सामना बघत होतो, ते अजून आसपासच असतील. एक-दोघांना फोन लावून पहिला. पण नेटवर्क व्यस्त! असंच मागे त्यांना शोधत जावं का? पण गर्दीने सगळे रस्ते चक्का-जाम झाले होते. हाऊप्टश्ट्रासंवर तर आत शिरायला सुद्धा वाव नव्हता. शिवाय ते कोणत्या बार मध्ये असतील याची काहीच कल्पना नव्हती. काश मी सायकल आणली असती. पोलीस तसेही सगळा नाच बघत उभे होते. असाच एक तास गेला. चालत घरी जावं का? साधारण साडेसहा किलोमीटर अंतर होतं. पण मधला एक रस्ता शेतातून जाणारा होता आणि त्यावर अजिबात दिवे नव्हते. आणि मधेच कुठे हुल्लडबाजी करणारे लोक असतील तर? अशा प्रसंगी रेसिस्ट हल्ले पण होत्तात म्हणे. कुठून बुद्धी झाली आणि फुटबॉलचा खेळ बघायला आलो! आपल्याला ना खेळात काही रस ना जर्मनीच्या विजयाचं काही कौतुक. आता ना धड खेळ बघणं होतंय ना घरी जाता येतंय! मी स्वतःवर कमालीचा वैतागलो होतो. सव्वा वाजत आला तरी ट्रामचा काही पत्ता नव्हता. आणि आता तर इंडिकेटरवर सकाळची पहिली ट्राम दिसत होती! मी आजूबाजूच्या काही लोकांना विचारलं. बरेच जण माझ्यासारखेच ट्रामची वाट बघत उभे होते. कोणालाच कसलीच कल्पना नव्हती. शेवटी एक ट्रामच्या कंपनीचा माणूस दिसला. तो म्हणाला, दोन वाजता ट्राम येईल. अधिकृत व्यक्तीकडून काहीतरी उत्तर मिळाल्याचे बघून मी जरा निर्धास्त झालो. आता एवढा वेळ थांबलोच आहे तर अजून अर्धा-पाउण तास थांबू. एव्हाना गर्दी जरा कमी झाली होती. मी जवळच्या मॅकडोनाल्डमधून एक गरमागरम कॉफी घेतली आणि गंमत बघत उभा राहिलो. जर्मन समाजाचं ते रूप बघून मी काहीसा चक्रावलो होतो. तसं भारतात गणपती विसर्जनाच्या दिवशी किंवा दहीहंडीच्या दिवशी असंच काहीसं वातावरण असतं. लोकं सभ्यतेची, शिस्तीची सगळी बंधनं झुगारून देत रस्त्यावर नाचत असतात. हुल्लडबाजी सुरु असते. दंगली किंवा तोडफोड होत नाही म्हणा. पण त्याची कसर भरून काढायला अधूनमधून मोर्चे आणि निदर्शनं होत असतातच की. पण आपल्याकडे सणवार सतत सुरु असतात. त्यामुळे लोकांच्या अशा वागण्यात वेगळं काही जाणवत नाही. जर्मन समाज तसा थंडच. इथली सणाची व्याख्या म्हणजे आदल्या दिवशी रात्री बियर ढोसणं आणि पुढचा दिवस घरी झोपून काढणं! नाही म्हणायला कार्निवल वगैरे असतो थोडाफार वेगळ्या पद्धतीने साजरा होणारा. पण तिथेही रात्रभर पिणं असतंच. त्यामुळे हा फुटबॉल विजयाचा जल्लोष जरा वेगळा वाटत होता. शेवटी काय, समाजाने आखून दिलेली चौकट मोडून स्वैराचार करण्याची एक सुप्त उर्मी प्रत्येक समाजात असते. खेळ, सणवार, किंवा राजकारण म्हणजे केवळ निमित्तं असतात. ही निमित्तं निव्वळ काही काळापुरती ती चौकट मोडण्याची मुभा देतात. समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यकच नाही का? असो. 

माझं कॉफी पिता-पिता चिंतन सुरु होतं. तेवढ्यात सव्वा-दोनला ट्राम आली आणि एकदाचा मी घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी कळलं की फुटबॉलच्या महत्वाच्या सामान्यांच्या वेळी सार्वजनिक वाहतूक मुद्दाम बंद ठेवली जाते. जर तोडफोड झालीच तर नुकसान कमी करायला! मला बापड्याला हे कसं माहित असेल? माझ्या दोन-तास-बिस्मार्कप्लात्झ कथेवर सगळे मनसोक्त हसत होते!                                           
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *