नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क Beautiful Bali – Part 2 – Garuda-Visnu-Kencana Park

माझं
हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे.
आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे
, गरुडाविष्णुकांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच.
स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला
प्लॅस्टिकचे कवरही होते
. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर
जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर
फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत
डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते. अर्ध्या तासातच जिंबरान बीच वर पोहोचलो. दक्षिण
बालीमधला हा एक महत्वाचा बीच. प्रशस्त अर्धवर्तुळाकृती किनारा
, एकापुढे एक उपहारगृहे आणि त्यांचा आडव्या खुर्च्या, त्यावर
बसून खान-पानाचा आनंद घेणारे पर्यटक
, आणि समोर पसरलेला विशाल
निळा-हिरवा समुद्र. इतकं स्वछ पाणी युरोपनंतर इथेच बघत होतो. लाटा बेभान उसळत होत्या.
भरतीची वेळ असावी. दूरवर लहान-मोठ्या टेकड्या दिसत होत्या. एका टेकडीवर गरुडावर स्वार
झालेली विष्णूची मूर्ती दिसत होती. ही मूर्ती नुकत्याच बांधलेल्या गरुडा-विष्णु-कांचना
पार्कमधली होती. आज बघायच्या ठरवलेल्या जागांमध्ये हे पार्क होतेच. इथून दिसत असलेली
ती सुंदर मूर्ती बघून माझी पार्क बद्दलची उत्सुकता अजूनच ताणली गेली. जिंबरानची भेट
आटोपती घेत मी गरुडा-विष्णु-कांचना पार्ककडे निघालो.

जिंबरानचा समुद्रकिनारा आणि दूरवर दिसणारी विष्णूची मूर्ती

 

विष्णूची पूजेत असलेली अर्धमूर्ती

हे
पार्क एका टेकडीवर असल्याने रस्ता तसा चढणीचा होता. एक मोठे वळण घेतले आणि पार्कच्या
भव्य प्रवेशद्वारातून आत शिरलो
. प्रशस्त पार्किंगची
जागा
, रुंद रस्ते, आजूबाजूला फुलवलेल्या
बागा
, असा रम्य परिसर होता. दुपारची उन्हाची
वेळ होती
. तरीही उष्मा फारसा जाणवत नव्हता. तिकीट जरा महागडेच होते. त्यासोबत एक सारोंग देण्यात
आले होते
. सारोंग म्हणजे इथली लुंगी. कोणत्याही
देवळात जाताना इथे कमरेभोवती वस्त्र गुंडाळायची पद्धत आहे
. त्यालाच
सारोंग म्हणतात
. दक्षिण भारतातल्या काही मंदिरांतही ही पद्धत
आढळते
. बालीमधल्या सगळ्या देवळांत असे सारोंग गुंडाळून जाणे अनिवार्य
आहे
. हे जरी पार्क असले तरी यातल्या काही मूर्ती प्रत्यक्ष पुजल्या
जात होत्या
. त्यामुळे केवळ त्या ठिकाणी सारोंग गुंडाळणे आवश्यक
होते
. कॅमेरा सरसावून मी आत शिरलो. सुरुवातीलाच
एक प्रशस्त मैदान दिसले
. त्याच्या चारी बाजूंनी ग्रॅनाइटचे उभे
कापलेले कडे होते
. या टेकडीवर असा खडक विपुल होता. त्यातूनच इथल्या प्रचंड मूर्ती घडवल्या होत्या. मैदानाच्या
वरच्या बाजूला गरुडची मूर्ती होती
. हा गरुड मोठ्या भक्तिभावाने
मुख्य मूर्तीकडे बघताना दिसत होता
. त्याच्याच दुसर्‍या बाजूला
विष्णूची अर्धमूर्ती होती
. ही मूर्ती प्रत्यक्ष पूजेत असल्याने
इथे सारोंग गुंडाळणे आवश्यक होते
. इथले वातावरण अगदी भारतातल्या
देवळांत असते तसे होते
. कलकलाट मात्र अजिबात नव्हता. उदबत्त्यांचा सुगंध प्रसन्न वाटत होता. दूरवर गरुडावर
स्वार झालेल्या विष्णूची महाकाय मूर्ती दिसत होती
. सगळी शिल्पे
अत्यंत सुबक आणि रेखीव होती
. निळ्याभोर आकाशाच्या पार्श्व्भूमीवर
ते शिल्पसौंदर्य फारच मोहक वाटत होते
. तिथे थोडेफार फोटो काढून
मी मुख्य मूर्तीकडे निघालो
. सुमारे 75 मीटर
उंच आणि
65 मीटर रुंद अशी ही मूर्ती इंडोनेशियामधली सगळ्यात उंच
मूर्ती आहे
. ज्या इमारतीवर ही मूर्ती उभारली आहे तिची ऊंची पकडली
तर एकूण ऊंची
122 मीटर भरते. समुद्र मंथनाच्या
वेळी अमृत बाहेर पडले आणि ते घ्यायला गरुडावर स्वार होऊन विष्णु निघाला असा प्रसंग
या मूर्तीतून साकारला गेला आहे
. मूर्ती निश्चितच सुंदर होती.
विष्णूच्या चेहर्‍यावरचे भाव, गरुडाचा आवेश, त्याच्या पंखांवरची पिसे, सारेच अप्रतिम होते. मूर्तीवर
बसवलेले सोन्याचे तुकडे उन्हात चमकत होते
. खालच्या इमारतीमध्ये
एक भव्य संग्रहालय होते
. त्याची गाइडेड टूर लवकरच निघणार होती.
पण त्याचे जास्तीचे तिकीट बघून मी माघारी वळलो.

गरुडा-विष्णु-काञ्चना पार्कमधले ताशीव कडे
मुख्य मूर्तीकडे बघणारी गरुडाची मूर्ती
गरुडावर स्वार असलेली विष्णूची मुख्य मूर्ती
पार्कच्या
दुसर्‍या टोकाला एक आलीशान उपहारगृह होते
. तिथून टेकडीखालचा
रम्य परिसर दिसत होता.
दूरवर निळा समुद्र शांत पहुडला होतापार्कच्या तिकीटावर इथे एक सरबत मोफत मिळणार होते. मी ते घेतले आणि जरा वेळ विसावलो. तेवढ्यात कुठूनतरी
तालवाद्यांचे स्वर कानावर पडले
. बाजूलाच एक लहानसे स्टेज होते
आणि त्यावर लोकनृत्याचा कार्यक्रम सुरू  होता
.
पंधरा मिनिटांचा एक कार्यक्रम दर अर्ध्या तासाने होत होता. उत्सुकतेने मी बघायला गेलो. वाद्यांचे स्वर ऐकायला छान
वाटत होते
. तेवढ्यात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या काही नर्तकी
अवतरल्या
. त्यांचे मुद्राविनेश थोडेफार भारतीय अभिजात नृत्यासारखे
वाटत होते
. मग काही प्राण्यांचे वेश घातलेले नर्तक अवतरले.
हा प्रकार थोडाफार पूर्व आशियाई देशांसारखा वाटत होता. एकंदरीत भारतीय आणि पूर्व आशियाई संस्कृतींचा उत्तम संगम त्या कार्यक्रमात
दिसून येत होता
. मी थोडेफार फोटो काढले आणि पार्कमधून बाहेर पडलो.
पार्कमधले
आलिशान उपहारगृह
बालिनीज लोकनृत्य
प्राण्यांचे पोशाख घातलेले नर्तक

क्रमशः 

0 thoughts on “नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क Beautiful Bali – Part 2 – Garuda-Visnu-Kencana Park

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *