जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ५ – मृत समुद्र

मदाबा आणि माउंट नेबो इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक
अनुभवानंतर आता आमची वारी एका भैगोलिक आश्चर्याकडे निघाली होती. ते आश्चर्य म्हणजे
मृत समुद्र (
Dead Sea). शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची
क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे
आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन
आणि इस्रायल यांच्या सीमारेषेवर मृत समुद्र स्थित आहे. या समुद्राला मिळणारा
गोड्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत म्हणजे जॉर्डन नदी. त्याशिवाय आसपासचे अनेक
लहान-मोठे झरे या समुद्रात मिसळतात. मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने
त्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा नगण्य असतो. जवळपास वर्षभर असणारे उष्ण हवामान व सूर्याची प्रखर किरणे यांमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त. या सर्व कारणांमुळे मृत
समुद्राची क्षारता सुमारे ३५% आहे. हे प्रमाण सरासरी समुद्रक्षारतेच्या ९ पट आहे! इतक्या
प्रचंड क्षारतेमुळे या समुद्रात कोणतेच जीव जगू शकत नाहीत. म्हणूनच यास मृत समुद्र
असे म्हणतात.

मृत समुद्राचे स्थान
गॅलिलीचा समुद्र, जॉर्डन
नदी आणि मृत समुद्र हे सारे जलस्रोत एकाच रिफ्ट व्हॅलीमध्ये येतात. भूगर्भशास्त्रज्ञांच्या
मते लक्षावधी वर्षांपूर्वी ही सारी रिफ्ट व्हॅली पाण्याने भरलेली होती. यातून
भूमध्य समुद्रातले पाणी अकाबाच्या आखाताद्वारे लाल समुद्रात मिसळत असे. कालांतराने क्षार-निक्षेपण व
भूगर्भीय हालचाल यांमुळे रिफ्ट व्हॅलीतील पाण्याचा समुद्राशी असलेला संबंध तुटला.
उरलेले पाणी बाष्पीभवनाने आक्रसत गेले व त्याचाच मृत समुद्र निर्माण झाला. असा हा
मृत समुद्र म्हणजे निश्चितच एक भौगोलिक आश्चर्य आहे.

साधारण साडेतीनच्या
सुमारास आम्ही मृत समुद्राच्या अम्मान बीचवर पोहोचलो. मृत समुद्राच्या किनाऱ्यावरची
बहुतांश जागा मोठमोठ्या हॉटेल मालकांनी विकत घेऊन त्यांच्या ग्राहकांकरता बंदिस्त बीच
बनवले आहेत. समुद्रकिनाऱ्यासारखी जागा ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता कशी होऊ शकते
असा प्रश्न मला पडला. पण बहुतेक सगळ्याच पश्चिम आशियाई देशांत हा प्रकार सर्रास
दिसतो. थोडक्यात, अम्मान बीच ही एकच जागा सामान्य पर्यटकांना उपलब्ध होती. असो.
गाडीतून उतरलो आणि जाणवलं की अम्मानमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी आता कुठच्या कुठे
पळून गेली होती. तिची जागा ऊबदार व दमट हवेने घेतली होती. अम्मान बीच हा अनेक सोई-सुविधांनी
युक्त होता. पर्यटकांसाठी वैयक्तिक लॉकर, स्नानगृहे, खाण्या-पिण्याची दुकाने वगैरे
सुविधा तेथे नाममात्र दरात उपलब्ध होत्या. तिकीट काढून आत शिरलो आणि निळ्याशार
पाण्याचा मृत समुद्र दृष्टीस पडला. मृत समुद्र म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र
उभं राहतं त्याला समोरचं दृश्य बेचिराख करत होतं. बीचवर फारशी गर्दी नव्हती. किनाऱ्यावर
काही लोक अंगाला चिखल फासून बसले होते. इथल्या पाण्यात आणि मातीत औषधी गुणधर्म
आहेत म्हणे. भरतीरेषेच्या आसपास शुभ्र मिठाचे
थर जमले होते. आजू-बाजूच्या
शुष्क टेकड्या समुद्रात पडलेल्या प्रतिबिंबात आपलं
रुपडं न्याहाळत होत्या. हिरवळीचे लोभस दागिने
आपल्या कधी नशिबातच नाहीत अशी तक्रार करत असाव्या. बीचवरची पिवळसर काळी माती, त्यावरचे
मिठाचे लहान-मोठे डोंगर आणि त्यांना हळूच गुदगुल्या करणारी एखादी लाट, सारे काही
कलत्या उन्हात चकाकत होते.

अम्मान बीचवरून दिसणारा निळाशार मृत समुद्र 

किनाऱ्यावर जमलेले मिठाचे थर 
मला पाण्यात उतरण्याचा मोह अनावर होत होता. पण त्यासाठीचे
काहीच साहित्य मी सोबत आणले नव्हते. पण तेवढ्यासाठी मृत समुद्रात उतरायची संधी का
सोडावी? शेवटी मी जवळच्याच एका दुकानातून टॉवेल आणि पोहायची चड्डी विकत घेतली आणि पाण्यात
उतरलो. इथले वैशिष्ट्य म्हणजे मृत समुद्रात माणूस कधीच बुडत नाही. या पाण्याची
घनता मानवी शरीराच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने आपण पाण्यावर सहज तरंगू शकतो.
अनेक पर्यटक पाण्यावर तरंगण्याच्या अद्भुत प्रकाराचा आनंद घेत होते. मी साधारण
कमरेएवढ्या पाण्यात शिरलो आणि गादीवर पडावे तसे स्वतःला झोकून दिले. त्या जडशील
पाण्याने मला सहज तोलून धरले व मी पाण्यावर तरंगू लागलो. फारच मजा येत होती. 
इथे घ्यायची विशेष काळजी म्हणजे उताणे न होणे.
आपल्या शरीराच्या वरच्या भागाचे वजन जास्त असते. त्यामुळे पाठीवर तरंगताना वरचा भाग
काहीसा पाण्याच्या खाली राहतो व पाय वर राहतात. उताणे झाले तर डोके पाण्याखाली
जाऊन नाका-तोंडात पाणी जायची शक्यता असते. शिवाय त्या जड पाण्यात हातपाय मारून
स्वतःला सावरणेही कठीण असते. त्यामुळे अगदी पट्टीचा पोहणारा सुद्धा इथे पाण्यात ‘बुडू’
शकतो. त्यासंदर्भातल्या सूचना तिथे स्पष्टपणे लिहल्या होत्या. एक सुरक्षारक्षकही
तैनात होता. इथला अजून एक धोका म्हणजे तळाशी जमलेले क्षारांचे स्फटिक. काही स्फटिकांना
तीव्र धार असते. त्यावर पाय पडला तर कापला जायची भीती असते. ३५% क्षारता असलेल्या
पाण्यात एखादी जखम होणे किती वेदनादायक असेल! या सगळ्या धोक्यांचा विचार करून मी
अतिशय सावधपणे तरंगत होतो.

मृत समुद्रात तरंगणारे पर्यटक
थोड्याच वेळात अंग चरचरू लागले. अतिक्षारयुक्त पाणी
त्वचेतली आर्द्रता शोषून घेत होते. सहज म्हणून मी पाण्याची चव घेण्याचा प्रयत्न
केला. पाण्याची चव खारट कमी नि कडवट जास्त होती. त्या भयंकर चवीने मला मळमळल्यासारखे
वाटू लागले. योगायोगाने मी त्या दिवशी सकाळीच दाढी केली होती. त्यामुळे चेहऱ्याला पाण्याचा
स्पर्श होताच अशी काही आग आग झाली की विचारू नका. जखमेवर मीठ चोळणे या
वाक्प्रचाराचा मी शब्दशः अनुभव घेत होतो. तेवढ्यात पाण्याचा एक थेंब डोळ्यात गेला.
आता तर तिथे थांबणे अशक्यच होते. मी ताबडतोब बाहेर पडलो आणि गोड्या पाण्याच्या
शॉवरखाली उभा राहिलो. तिथली शॉवरची सुविधा म्हणजे त्या क्षणी जगातली सर्वोत्तम
सुविधा वाटत होती. माझी ती गम्मत पाहून दास कुटुंबीय हसत होते. पण एकंदरीतच मृत
समुद्रात तरंगण्याचा अनुभव भारी होता.

मृत समुद्रावरचा रम्य सूर्यास्त 
आता सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. मी कपडे
वगैरे आवरून एक मस्त कॉफी मागवली. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या केशरी प्रकाशात
थोडेफार छायाचित्रण केले आणि गाडीकडे निघालो. एक आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव
मिळाल्याच्या आनंदात मी होतो. पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरवून आम्ही अम्मानला हॉटेल
वर परतलो.

क्रमशः

Leave a Reply