अद्भुतरम्य टेनेरीफं – भाग ५ – ऐतिहासिक ला लगुना

आजचा
दिवस टेनेरीफं मधला शेवटचा दिवस होता. पुढच्या दिवशी पहाटे ६ च्या सुमारास परतीचं
विमान होतं. त्यामुळे आज काही फारसं दमछाक करणारं स्थलदर्शन न करता फक्त
हॉस्टेलच्या आसपास भटकंती आणि थोडीफार खरेदी असा बेत केला. योगायोगाने हॉस्टेल मधला
एक मुलगाही अशाच विचारात होता. मग दोघांनी मिळून ला लगुना (La Laguna) शहर पाहायचे
ठरवले. टेनेरीफं मधील एकमेव ऐतिहासिक शहर असल्याने या शहराला विशेष महत्व आहे. ला
लगुना हे टेनेरीफं मधले दुसरे मोठे शहर. थोडसं उंचीवर आणि बेटाच्या उत्तर भागात
असल्यामुळे या शहरात वातावरण जरा थंडच होते. शिवाय मधूनच झाकोळून येणं, भुरभूर
पाऊस पडणं वगैरे गोष्टी नित्याच्याच. जर्मनीतल्या काही वर्षांच्या मुक्कामात अशा
वातावरणाची सवयच झाली होती. पण नशिबाने आम्ही बाहेर पडलो त्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश
होता. 

ला लगुना चा मध्यवर्ती भाग 
शहरातल्या पर्यटन माहिती केंद्रातून निघणारी चालत स्थलदर्शन करवणारी सहल निवडली
आणि मार्गदर्शक सांगत होता ती मनोरंजक माहिती ऐकू लागलो.
कॅनरी
बेटांवर अनादी काळापासून गुआन्ची (Guanche) नामक लोकांची वस्ती होती. अनागा
टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशाला अगुएरे (Aguere) असे नाव होते. या
ठिकाणी स्थानिकांसाठी पवित्र असलेला असा एक तलाव होता. १५ व्या शतकात स्पॅनिश
लोकांच्या अतिक्रमणानंतर या जागी एक शहर वसवले गेले आणि नाव दिले गेले ला लगुना (the
lake). हे शहर कालांतराने कॅनरी बेटांच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर बनले. स्पॅनिश दर्यावार्दींच्या
मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील सागर सफरींच्या काळात कॅनरी बेटे ही एक महत्वाचा थांबा
असे. त्यामुळे उत्तरोत्तर येथे स्पॅनिश वस्ती वाढत गेली. येथील मूळ निवासी स्पॅनिश
लोकांमध्ये मिसळून गेले. आजही त्यांच्या काही रूढी-परंपरा, खाद्यप्रकार, भाषेतील
काही वाक्प्रचार कॅनरीयन समाजात आढळतात. म्हणूनच कॅनरी बेटांवरील व्यक्ती राजकीय
दृष्ट्या जरी स्पेन ची नागरिक असली तरी स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख अधोरेखित करते. ला लगुना मधील प्रमुख चर्च 
ला लगुना या शहराचा आराखडा प्रमाण मानून दक्षिण आणि मध्य अमेरिकेतली अनेक शहरे
वसवली गेली. जसे क्युबा मधील ओल्ड हवाना, परू मधील लिमा, प्युर्तो रिको मधील सान
हुआन इत्यादी. त्यामुळे या शहराला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. १९९९ मध्ये ला लगुनाचा
मध्यवर्ती भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला. या मध्यवर्ती भागात
काही महत्त्वाचे चर्च, मुख्य वस्तुसंग्रहालय, छोटीमोठी दुकाने, आणि उपहारगृहे
आहेत. तिथे थोडीफार खरेदी आणि पेटपूजा करून आम्ही हॉस्टेलवर परतलो. 
  
आता
परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली होती. एवढेसे बेट असले तरी बघण्यासारख्या जागा
अफाट आहेत. स्वतःचे वाहन नसल्यामुळे सगळ्या जागा बघता येणे शक्यही नव्हते. त्यामुळे
पुढच्या वेळी येताना युरोपात चालणारा परवाना आणि गाडी चालवण्याचा आवश्यक अनुभव यांची
तजवीज करूनच यायचं असं मनोमन ठरवलं आणि विमानतळाकडे जाणारी बस पकडली.

ला लगुना शहर आणि अनागा टेकड्या
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *