जॉर्डनच्या वाळवंटात – भाग ६ – अद्भुतनगरी पेट्रा

जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे
पेट्रा. जॉर्डनच्या नैऋत्य भागातील जाबाल-अल-मदबाह या डोंगररांगेत स्थित असलेले हे
प्राचीन शहर
rock-cut
architecture
चा
उत्तम नमुना आहे. अखंड वालुकाश्माच्या पहाडात कोरून बनवलेल्या गुहा, मंदिरे, आणि
थडगी म्हणजे एक अद्भुत विश्व आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात नबातिअन साम्राज्याच्या
काळात हे शहर वसवले गेले. नबातिअन लोक म्हणजे एक भटकी जमात होती. दमास्कस ते गिझा या
व्यापारी मार्गावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून होती. पेट्राचे स्थान या मार्गावर
अतिशय मोक्याच्या ठिकाणी होते. तेथील वालुकाश्मात पाणी साठवण्याची अभिनव पद्धत
विकसित करून नबातिअन लोकांनी पेट्रा शहर नावारूपास आणले. नबातिअन साम्राज्याच्या पाडावानंतर हे शहर ग्रीक व कालांतराने रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. ईसवी
सन ३६३ मध्ये एका मोठ्या भूकंपात या शहराची बरीच पडझड झाली. त्यात जलसंधारणाच्या महत्त्वाच्या
सोई नष्ट झाल्याने इथली लोकवस्ती उत्तरोत्तर कमी होत गेली. दुर्गम वाळवंटात दडून
राहिलेले या शहराचे अवशेष १८१२ साली एका स्विस अभ्यासकाला सापडले. त्यानंतर झालेल्या
संशोधनात पेट्रा विषयी बरीच उपयुक्त माहिती जगाला ज्ञात झाली. या जागेचे एकूण
ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन १९८५ साली युनेस्कोने त्यास जागतिक वारसा स्थळाचा
दर्जा बहाल केला. ‘मानवाच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण
जागांपैकी एक’ असे युनेस्कोने पेट्राचे वर्णन केले आहे.

पेट्रामधील भग्नावशेष 
अम्मान ते पेट्रा अंतर आहे सुमारे ३०० किमी. पहाटे
सहालाच आम्ही अम्मान सोडले. दिवस उजाडायच्या आत आमची गाडी शहराच्या बाहेर पडली
होती. फारशी वळणे नसलेला तो हायवे विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशातून जात होता. मधेच
एखादे गाव लागे. तेवढ्यापुरती हिरवळ आणि लोकवस्ती. पुढे पुन्हा वाळवंट सुरु. इतक्या
रुक्ष प्रदेशात हे लोक कसे आणि का राहत असतील याचा प्रश्न मला पडला होता. जसजसे
पेट्रा जवळ येऊ लागले तसतसे आजूबाजूला लाल वालुकाश्माचे पहाड दिसू लागले. गाडी आता
घाट चढू लागली. वाळवंटाची जागा आता ओबडधोबड पहाड आणि खोल दऱ्या यांनी घेतली होती.
साधारण १० च्या सुमारास आम्ही पेट्रा ला पोहोचलो. प्राचीन शहराच्या बाहेरच वादी
मुसा हे आधुनिक शहर आहे. जागोजागी हॉटेल्स, स्मरणिका विक्रेते, उपहारगृहे, आणि
उत्साही पर्यटक असे वादी मुसाचे रूप होते. हॉटेलवर सामान टाकून आम्ही पेट्राच्या
दिशेने निघालो.

‘सिक’ 
प्रवेशद्वारातून आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत
आल्याची जाणीव झाली. पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी कमी-अधिक उंचीचे पहाड दिसत होते.
काही पहाडांत अर्धवट खोदलेल्या गुहा दिसत होत्या. काही अंतर पुढे जाताच ती पायवाट
एका अरुंद खिंडारात शिरली. या वाटेस ‘सिक’ असे म्हणतात. सुरुवातीला प्रशस्त
वाटणारे ते खिंडार हळूहळू आक्रसताना दिसू लागले. घराच्या भिंतीसारख्या वाटणाऱ्या
त्या सरळसोट उभ्या कड्यांवर काही पडझड झालेली शिल्पे दिसत होती. काही ठिकाणी पाणी
साठवण्याची व्यवस्था दिसत होती. बाहेर तळपते उन असले तरी आतमध्ये मात्र सुखद गारवा
होता. एका ठिकाणी पायवाट जरा अधिकच अरुंद झाली. जणू एखाद्या बोगद्यात असावे तसे
वाटत होते. काही पावले पुढे जाताच त्या खिंडीच्या कपारीतून ‘अल खजनेह’ (
the treasury) या पेट्रामधील सर्वात विलक्षण अशा
वास्तूचे एक अंग दृष्टीस पडले. जसजसे पुढे जाऊ तसतसा त्या भव्य वस्तूचा आवाका
लक्षात येऊ लागला. एखाद्या रंगमंचावरचा पडदा अलगद उलगडत जावा आणि व्यासपीठावरच्या
नेपथ्याने डोळे दिपून जावेत असे वाटत होते. ‘सिक’ मधून बाहेर पडून आम्ही आता ‘अल खजनेह’
च्या समोरील लहानशा मैदानात उभे राहून त्या वस्तूच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होतो.
‘अल खजनेह’ म्हणजे अखंड वालुकाश्मात कोरलेला एक मकबरा आहे. त्याचे प्रवेशद्वार सुंदर
कोरीवकामाने सजवलेले आहे. ग्रीकांच्या अमलाखाली ईसवी सनाच्या पहिल्या शतकात या
वस्तूची निर्मिती झाली. नबातिअन लोकांचे वालुकाश्म खोदून स्थापत्यशिल्पे घडवण्याचे
कौशल्य आणि ग्रीक लोकांची सौंदर्यदृष्टी यांचा सुरेख संगम या वास्तूमध्ये दिसून
येतो. तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले स्थान असल्याने ‘अल खजनेह’ अजूनही बऱ्यापैकी
सुस्थितीत आहे. ‘अल खजनेह’ च्या प्रवेशद्वारावरील दुसऱ्या स्तराच्या मधोमध एक कलशसदृश
रचना दिसते. प्राचीन काळातले चोर लुटारू त्या कलशात आपली लूट लपवत असत अशी
आख्यायिका बराच काळ प्रचलित होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्थानिक लोकांनी बंदुकीच्या
गोळ्या झाडून तो कलश फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कलश भरीव असल्याचे लक्षात
येताच सगळ्यांची निराशा झाली. त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आजही त्या कलशावर
दिसतात.

‘सिक’ च्या कपारीतून दिसलेले दृश्य 
‘अल खजनेह’ च्या भव्य वास्तूचे छायाचित्रण करून
आम्ही पुढे निघालो. नीलादी आणि त्यांचा कॅमेरा हे उत्साही सोबती होतेच. भारतातली ऐतिहासिक
स्मारके आणि त्यांची अवस्था यावर आमची चर्चा सुरु होती. इतक्यात एक तरुण दक्षिण
भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत फोटो काढण्याची विनंती करत आमच्यासमोर आला. फोटो
काढता-काढता ओळख-पाळख झाली. मूळचा बंगलोरचा असलेला, मात्र सध्या दुबईत स्थायिक असलेला
मुथू क्रिष्णा त्याचा भलामोठा कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन पेट्राच्या अवशेषांत छायाचित्रण
करायला आला होता. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या मुथूसोबत माझी चांगली मैत्री
झाली. नीलादीसुद्धा आणखी एक फोटोग्राफर भेटल्याने खुश झाल्या. मग मी, नीलादी, आणि
मुथू असे तीन वेगवेगळ्या कौशल्यपातळीवरचे, मात्र एकसमान उत्सुकता-पातळीवरचे भारतीय
फोटोग्राफर पेट्राच्या अद्भुतनगरीत फिरू लागलो.
‘अल खजनेह’ च्या प्रवेशद्वारावरील कोरीवकाम   
पेट्रामधले पुढचे महत्त्वाचे स्थान म्हणजे ग्रीक
शैलीत बांधलेले मंदिर. या मंदिराचे खांब जेराशमध्ये सापडलेल्या खांबांसारखे दिसत
होते. मंदिराची मात्र बरीच पडझड झाली होती. मंदिराच्या जवळच उताराचा उपयोग करून
घेत रोमन शैलीत बांधलेले सभागृहही दिसत होते. त्याच्या समोरच वालुकाश्मात कोरलेल्या
असंख्य गुहा दिसत होत्या. त्यांची प्रवेशद्वारे ‘अल खजनेह’ च्या प्रवेशद्वाराचा
लहान अवतार वाटत होती. या गुहा म्हणजे काही कमी श्रीमंत अशा लोकांची थडगी होती.
त्यांपैकी काही गुहांमध्ये जाऊन आही थोडेफार छायाचित्रण केले. आता सूर्य मावळतीकडे
झुकू लागला होता. त्याच्या सोनेरी किरणांत पेट्रा मधला वालुकाश्म फारच मोहक दिसत
होता. तिथे किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस तिथल्या सुरक्षारक्षकाने
हाकलायला सुरुवात केल्यावर आम्ही छायाचित्रण आटोपते घेतले व हॉटेलवर परतलो.

ग्रीक मंदिराचे भग्नावशेष 
क्रमशः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *