विविधरंगी बस्तर – भाग ५ – तीरथगढ धबधब्यावरील रम्य पहाट

पहाटे साडेसहाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. उठून बाहेर पाहतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली गर्द हिरवाई! रात्री इथे पोहोचलो तेव्हा अंधारात काहीच कळले नव्हते. आता दिवसाउजेडी लक्षात येत होते की आम्ही कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाच्या आत आलो आहोत. नुकताच सूर्योदय झाला होता. कोवळ्या उन्हात गवतावरचे दवबिंदू चकाकत होते. वातावरण आल्हाददायक होते. तीरथगढ धबधबा तिथून अगदी हाकेच्या अंतरावर होता. जीत म्हणाला, चला सगळे धबधब्यावर जाऊ. आत्ता गर्दी अजिबात नसेल आणि मनसोक्त फोटो काढता येतील. काही जण अजून साखरझोपेत होते. ते उठायची वाट न पाहता आम्ही सात-आठ जण कॅमेरा घेऊन लगेचच जीतसोबत निघालो. पाचेक मिनिटांतच धबधब्याचा ध्रोंकार ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने जणू वातावरणातच काहीशी उर्जा निर्माण केली होती. पर्यटन विभागाने धबधब्याच्या परिसराबाहेर एक तिकीट खिडकी आणि गेट उभारले होते. बाजूलाच वाहनतळ होता. आत्ता पहाटेच्या वेळी तिथे शुकशुकाट होता. आजूबाजूच्या लहान-सहान दुकानांतले लोक नुकतेच उठून धंद्याची तयारी करायला लागले होते. गेट उघडेच होते आणि तिकीट खिडकीवरही कोणीच नव्हते. आम्ही सरळ आत शिरलो. आता पाण्याचा आवाज चांगलाच तीव्र झाला होता. समोर खोल दरी असावी असे भासत होते. आम्ही धबधबा वरच्या अंगाने बघणार आहोत हे तेव्हा उमजले. 
आवेगात कोसळणारा तीरथगढ धबधबा 



थोडं पुढे गेलो आणि डाव्या अंगाने जोमात वाहत येणारा एक प्रवाह दिसला. त्याच्या पाण्याने आजूबाजूला बरीच डबकी तयार झाली होती. ती पार करून आम्ही दरीच्या जवळ गेलो. एकेका पावलागणिक धबधब्याचे टप्पे नजरेस पडू लागले. डावीकडून येणारा प्रवाह वेड्या आवेगात कड्यावरून खाली झेपावत होता. पांढऱ्या शुभ्र धुमाळांना कोवळ्या उन्हाने सोनेरी छटा बहाल केली होती. काही मिनिटांपुरती मिळालेली ती छटा वाहणारे पाणी मोठ्या दिमाखात मिरवत होते. पाण्याच्या वेगाने त्या उभ्या कड्याला पायऱ्या पडल्या होत्या. त्यांच्यावरून खेळत आणि उड्या मारत ते पाणी समोरच्या निमुळत्या दरीत कोसळत होते. तिथून पुढे वाटवळणे घेत तो प्रवाह दरीला चिरत पुढे जात होता. हीच कांगेर नदी आणि समोर दिसणारी दरी म्हणजे तिचे खोरे. दरीवर हलकेसे धुके पसरले होते. उगवत्या सूर्याची केशरी किरणे त्या धुक्याच्या दुलईला घालवण्याचा आटापिटा करीत होती. पण गजर बंद करून पाच मिनिटे अजून असं म्हणत झोपणाऱ्या आपल्या सगळ्यांसारखी ती दरीही जणू धुक्याची दुलई ओढून घेत होती. नदीच्या दोन्ही काठांनी गच्च रान भरले होते. धुक्याची दुलई धरून ठेवण्यात त्या वनराईचा हातखंडा होता. धबधबा वाहतच होता. दिवस असो वा रात्र, उन्हाळा असो वा हिवाळा, जोपर्यंत अंगात जोम आहे तोपर्यंत वाहायचे हा त्याचा स्थायीभाव. त्या निवांत भूदृश्यात खळखळणारा धबधबाच तेवढा गतिमान होता.

दरीवर पसरलेली धुक्याची दुलई 



मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. थोडा वेळ कॅमेऱ्यासोबत खेळून मी बाजूच्या एका दगडावर विसावलो. समोरचे दृश्य नुसते निरखत राहिलो. उंचावरची जागा, वाहते पाणी, उगवता किंवा मावळता सूर्य, गर्द वनराई, या गोष्टींकडे मी साहजिकच आकर्षित होतो. मनाला एक वेगळीच शांतता मिळते. नेहमीच्या धकाधकीतला कोलाहल कुठेतरी गुडूप होतो. काहीशी वेगळीच उर्जा मिळाल्यासारखं वाटतं. माझी जणू ब्रह्मानंदी टाळी लागली होती. तेवढ्यात जीतने हाक मारली आणि माझी तंद्री भंगली. पावणेआठ वाजत आले होते. धबधबा अजून खालच्या बाजूने पहायचा बाकी होता. वरून इतके मोहक दिसलेले ते दृश्य आता खालच्या बाजूने कसे दिसेल याची उत्सुकता मनात दाटली होती. लगबगीने आम्ही तिथून निघालो. 



पायऱ्यांवरून दिसणारा धबधबा 

आम्ही आत शिरलो त्या गेटच्या उजव्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. आम्ही तिथून खाली उतरू लागलो. उजव्या हाताला डोंगरकडा आणि डाव्या हाताला गर्द झाडीने व्यापलेली दरी अशी ती वाट होती. थोड्या अंतरातच पायऱ्या लागल्या. दरीत घुमणारा धबधब्याचा आवाज आता अजूनच तीव्र झाला होता. काही अंतरातच पायऱ्यांची ती वाट एका मोकळ्या बिंदूवर आली. इथून ती वाट यू-टर्न घेऊन आणखी खाली उतरत होती. त्या बिंदूवर येऊन पोहोचलो आणि धबधब्याचा तो प्रचंड ओघ नजरेच्या टप्प्यात आला. वरून दिसलेला पाण्याचा तो प्रवाह हाच का असा प्रश्न थोडा वेळ पडला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाने त्या प्रवाहाचा आवेग कैक पटींनी वाढला होता. त्या चुनखडी खडकाला पडलेल्या पायऱ्या जणू त्या शुभ्र धुमाळांना खेळवत होत्या. तिथून काही फोटो काढून आम्ही अजून खाली उतरलो. 

आता आम्ही धबधब्याच्या बरोबर समोर आलो होतो. इथला खडकाळ परिसर अगदीच निसरडा झाला होता. लहान-मोठी पाण्याची डबकी तयार झाली होती. एक-दोन ठिकाणी दगडी पूल बांधून सरकारने पर्यटकांचे चालणे थोडे सोयीस्कर केले होते. आम्ही त्यावरून वाट काढून पुढे गेलो. इथे काही तुरळक गर्दी होती. काही लोक पाण्याच्या प्रवाहात बसून मस्त डुंबत होते. काही जण नुसतेच फोटो काढत होते. उजव्या हाताला एक लहानसा उंचवटा दिसत होता. धबधब्याचे पाणी त्याच्या दोन बाजूंनी वाहत होते. तिथून फोटो छान येईल म्हणून मी त्यावर चढलो. तशा वर जायला पायऱ्या वगैरे होत्या. पण सगळीच वाट फार निसरडी झाली होती. काळजीपूर्वक वर गेलो. वर एक लहानसे शिवमंदिर होते. त्याच लालसर दगडात बांधलेले ते मंदिर त्या भूदृश्यावर फारच उठून दिसत होते. समोरून वाहणारा धबधबा, आजूबाजूची गर्द वनराई, पाण्याच्या आवाजाने भारलेला आसमंत, अशा वातावरणात कोणाच्या मनात अध्यात्मिक भावना येणार नाहीत? मंदिर अगदी लहानसेच होते. नित्यपूजेत नव्हते तरी पिंडीवर दोन-चार फुले वाहिलेली दिसत होती. मंदिराच्या प्रांगणातून धबधब्याचा तो प्रवाह एखाद्या पांढऱ्या चादरीसारखा दिसत होता. दूरवर उजव्या कोपऱ्यात प्रवाहाची आणखी एक लपलेली धार दिसत होती. अगदी वरच्या टोकाला मुंगीएवढी माणसे खाली डोकावताना दिसत होती. हा तोच बिंदू जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो. थोडा वेळ तिथे फोटोग्राफी करून मी खाली उतरलो. 

शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर तीरथगढ धबधबा  



पाण्यात डुंबायचा मोह काही आवरत नव्हता. ग्रुपमधल्या न भिजणाऱ्या लोकांकडे कॅमेरा सुपूर्द करून मी आणखी ३-४ जणांसोबत सरळ एका दगडावर जाऊन बसलो. थंड पाणी अंगावरून गेले आणि एक सुखद शिरशिरी जाणवली. यासम अनुभूती जगात कोणती नसेल. सुरुवातीला कुडकुडणारे शरीर एकदा त्या तापमानाला सरावले की तिथून उठणे मुश्कील होऊन जाते. काही क्षण असाच पडून राहिलो. उगाच सोबतच्या लोकांसोबत मस्ती करायची बिलकुल इच्छा होत नव्हती. ते केवळ माझे आणि निसर्गाचे कनेक्शन होते! तेवढ्यात हातवारे करत बाहेर बोलावणारा जीत दिसला. पाण्याच्या आवाजापुढे त्याचा आवाज काय ऐकू येणार? रानातल्या ट्रेकला निघायचे होते म्हणून तो घाई करत होता. मी बापुडा काहीशा अनिच्छेनेच उठलो आणि सगळ्यांसोबत परत जायला निघालो. त्या दरीतल्या गर्द वनराईतून फिरण्याची ओढही मनाला लागली होती. नुकत्याच उघडलेल्या बाहेरच्या टपरीवर गरमागरम चहा घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. तीरथगढ धबधब्याने त्या दिवशीची सकाळ मनपटलावर कायमची कोरून ठेवली होती. 

पांढऱ्या भिंतीसम वाटणारा धबधबा 

       

        क्रमशः 

Leave a Reply