ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग १ – ऱ्हाईन नदीची तोंडओळख

जर्मनीतल्या माझ्या साडेचार वर्षांच्या मुक्कामात युरोपातील अनेक देश-प्रदेश बघायचा योग आला. एकीकडे ही भटकंती सुरु असताना सायकलवरून जवळपासच्या प्रदेशात मुशाफिरी चालूच होती. सायकलींसाठी असलेली वेगळी मार्गिका, वेगळे वाहतूक मार्गदर्शक, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतर वाहनचालकांकडून मिळणारी सन्मानाची वागणूक या गोष्टींमुळे जर्मनीत सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव ठरतो. शिवाय, ट्रेन, बस, किंवा ट्राम मधून सायकल घेऊन जायची सोय असल्यामुळे कधी दमछाक झालीच तर सायकल उचलून ट्रेनने घरी पोहोचायचा पर्याय कायम उपलब्ध असतो. अशी अनुकूल परिस्थिती असल्याने जर्मनीत सायकल हे अतिशय लोकप्रिय वाहन आहे. मीही एक मजबूत mountain bike खरेदी केली. त्याच्या जोडीला हेल्मेट, वेगमापक, सायकलीचा दिवा, इत्यादी साधनांची जुळवाजुळव केली आणि मोकळ्या वेळात मुशाफिरी सुरु केली. सुरुवातीला जवळपासची ठिकाणं, मग साधारण तीसेक किलोमीटरवरची शहरं आणि इतर प्रेक्षणीय स्थळं, असं करत करत मी माझ्या सायकल-भटकंतीचा परीघ वाढवत नेला.

थोडा आत्मविश्वास येताच लांबच्या सफारींचे नियोजन करू लागलो. ऱ्हाईन नदीचे मध्य खोरे (middle Rhine valley, mittlerhinetal in German) या जागेबद्दल बरेच ऐकले होते. ऱ्हाईन नदी ही युरोपातली दुसरी सर्वात मोठी नदी. स्वित्झर्लंडमधील आग्नेय भागात, आल्प्स पर्वतराजीमध्ये ती उगम पावते आणि जर्मनी, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या देशांच्या मध्यात स्थित असलेल्या कोन्स्टान्स सरोवराला (Lake of Constance, or Bodensee) येऊन मिळते. या सरोवरातून कोन्स्टान्स शहराजवळ नदीचा प्रवाह पुन्हा बाहेर पडतो. सुरुवातीला पश्चिमवाहिनी असलेली ऱ्हाईन बाझल (Basel)शहराजवळ उत्तरेकडे वळते. इथून पुढे फ्रान्स-जर्मनीच्या सीमेवरून वाहत पुढे कार्लसृहं(Karlsruhe) शहराजवळ जर्मनीमध्ये प्रवेश करते. जर्मनीमधले ऱ्हाईन नदीचे खोरे हे अत्यंत सुपीक जमीन आणि तुलनेने ऊबदार हवामान यांमुळे दाट लोकवस्तीचे आहे. अखेरीस हॉलंडमधील रोतरदाम (Rotterdam) शहराजवळ ही नदी उत्तर समुद्रात विसर्जित होते. अशी ही भलीमोठी ऱ्हाईन म्हणजे पश्चिम युरोपातली जीवन वाहिनीच.
ऱ्हाईन नदीचा नकाशा – आंतरजालावरून साभार

मध्ययुगीन काळात ऱ्हाईन नदी ही पवित्र रोमन साम्राज्याची (The holy Roman empire) उत्तर आणि पूर्व सीमारेषा होती. या नदीच्या काठावर रोमन सैनिक आणि जर्मन टोळ्या यांच्यात सतत खटके उडत. त्यामुळे या नदीवर जागता पहारा ठेवला जाई. दक्षिण युरोपला उत्तर युरोपशी जोडणारा हा एक महत्त्वाचा जलमार्ग होता. आजही ऱ्हाईन नदी युरोपमधील सर्वाधिक दळणवळण असणारा जलमार्ग आहे. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहात (Treaty of Versailles) ऱ्हाईन नदीकाठचा सुपीक प्रदेश जर्मनीकडून हिरावून घेण्यात आला. तहातल्या इतर अनेक अपमानकारक बाबींबरोबर ही गोष्टही जर्मन लोकांच्या मनातील असंतोषास कारणीभूत ठरली. त्याच्या पुढचा इतिहास तर सर्वज्ञात आहे. अशा काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची ऱ्हाईन नदी मूक साक्षीदार आहे.

ऱ्हाईन नदीच्या संपूर्ण प्रवाहापैकी सर्वात विलोभनीय प्रदेश म्हणजे मध्य खोरे. जर्मनीतल्या बिंगेन (Bingen) शहराजवळ ऱ्हाईन नदी एका दरीत प्रवेश करते. तिथपासून कोब्लेन्झ शहरापर्यंत साधारण ६५ किमी अंतर नदीचा प्रवाह या दरीतून वाहतो. वर्षानुवर्षांच्या धुपीमुळे या दरीत वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्ये निर्माण झाली आहेत. कधी ताशीव कडे, तर कधी हळुवार नदीला स्पर्श करणाऱ्या टेकड्या नदीच्या प्रवाहाची सोबत करतात. जलमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी नदीच्या काठाने असलेल्या डोंगरांवर अनेक किल्ले बांधले गेले. मध्य खोऱ्यात असे ४० किल्ले आहेत. ऊबदार हवामानामुळे या खोऱ्यातील जमीन द्राक्षांच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे डोंगर उतारावर द्राक्षांचे मळे जागोजागी दिसतात. इथली वाईनही सुप्रसिद्ध आहे. अशा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे हे खोरे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. 


मध्य ऱ्हाईन खोरे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *