ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर – भाग २ – चुकलेली ट्रेन आणि सफरीचा श्रीगणेशा

अशा या मध्य ऱ्हाईन खोऱ्यात सायकलवरून भटकंती करण्यास मी फारच उत्सुक होतो. ऑगस्ट महिन्यातला सूर्यनारायणाची दिवसभर कृपादृष्टी असेल अशी शक्यता असलेला एक रविवार निवडला आणि ऱ्हाईन खोऱ्याला भेट द्यायचा बेत निश्चित केला. माझा मुक्काम तेव्हा हायडलबर्ग (Heidelberg) शहरात होता. तिथून बिंगेन साधारण १०० किमी वर. मात्र पोहोचायला सकाळच्या वेळेत थेट ट्रेन उपलब्ध नव्हती. त्यामुळे इंटरसिटी ट्रेनने कोब्लेन्झ (Koblenz) ला जायचे, तिथून नदीच्या काठाने सायकल चालवत बिंगेन पर्यंत यायचे, आणि बिंगेन हून संध्याकाळी हायडलबर्गला परतायचे अशी रूपरेषा मी ठरवली. ट्रेनच्या वेळेनुसार सायकल, कॅमेरा, आणि इतर सामुग्री घेऊन  मी स्टेशनवर पोहोचलो. यथावकाश गाडी आली. ट्रेनला सायकलींसाठी एक वेगळा डबा असतो. मी सायकल घेऊन आत चढताना दिसताच तिकीट तपासनीस वैतागलेल्या चेहऱ्याने बाहेर आला. माझ्याकडे सायकलीचे रिझर्वेशन आहे का म्हणून विचारू लागला. माझ्याकडे तसे काही वेगळे रिझर्वेशन नव्हते. Geht nicht! (चालणार नाही) असे ठामपणे सांगत त्याने मला सायकल चढवायला मनाई केली. म्हणाला, हा डबा मुळातच क्षमतेपेक्षा जास्त भरलेला आहे. आतमध्ये डोकावून पाहिले तर खरंच आत सायकलस्वारांची गर्दी होती. मी निराश होऊन खाली उतरलो. त्याच्याशी वाद घालणे म्हणजे वेळेचा अपव्यय होता. वेळ होताच गाडी निघून गेली. मी बापडा हताशपणे धडाडत जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभा होतो. आता काय करायचे? सर्वसाधारणपणे आगाऊ रिझर्वेशन न करताही सायकल चढवायला जागा मिळून जाते. त्यामुळे मी काही तसे रिझर्वेशन करायची तसदी घेतली नव्हती. त्या दिवशीची गर्दी एकदमच अनपेक्षित होती. आता काय करायचे याचा विचार करत मी फलाटावर उभा होतो. एवढी तयारी करून बाहेर पडलो होतो. असेच माघारी फिरायची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळे आता ऱ्हाईन मातेचे दर्शन घेऊनच घरी जायचे असा चंग बांधला आणि तिथे पोहोचायचे इतर पर्याय शोधू लागलो. 

कोब्लेन्झ कडे जाणारी पुढची गाडी दुपारी दोन वाजता होती. त्याने फारच उशीर झाला असता. मग रिजनल ट्रेनचे वेळापत्रक पाहिले. पुढच्या अर्ध्या तासात निघून दुपारी २ पर्यंत बिंगेन ला पोहोचवणारे एक कनेक्शन मला मिळाले. लगेच गुगल नकाशा काढून बिंगेन ते सांक्त गोआर (Sankt Goar) आणि परत अशी पर्यायी रूपरेषा मी आखली. या बेतानुसार घरी पोहोचायला रात्रीचे अकरा वाजणार होते. पण आज हे करायचंच असा दृढनिश्चय करून मी मार्गस्थ झालो. हायडलबर्ग ते मानहाईम (Mannheim), मानहाईम ते कैसरस्लॉटर्न(Kaiserslautern), आणि तिथून पुढे बिंगेन अशी वाटवळणं घेत तीनेक तासांत मी बिंगेन ला पोहोचलो. नशिबाने या रिजनल ट्रेनने अगदी वेळेत पोहोचवलं होतं. बिंगेन स्टेशनच्या बाहेर पडताच ऱ्हाईन नदीचा रम्य किनारा दृष्टीस पडला. मातकट हिरव्या रंगाचा प्रवाह तसा संथच होता. नदीकाठच्या उद्यानात दुपारची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसातली एक आळसावलेली दुपार तिथल्या वातावरणात जाणवत होती. मी मात्र ऱ्हाईन नदीच्या स्वल्प प्रदक्षिणेसाठी उत्साहाच्या भरात होतो. नदीच्या काठाने सायकल चालवायला मी सुरुवात केली. तेवढ्यात नदीकाठाने जाणाऱ्या त्या सायकल मार्गिके बद्दल माहिती देणारा एक फलक दिसला. तिथून सांक्त गोआर २९ किमी अंतरावर होते. म्हणजे मजल-दरमजल करत दोन तासांत सहज पोहोचता येणार होते. तिथून परत बिंगेनला सूर्यास्तापूर्वी पोहोचणे सहज शक्य होते. मात्र अपेक्षेप्रमाणे ही सफर वेळेत पूर्ण होईल की नाही अशी थोडीशी शंकाही वाटत होती. मी गणपती बाप्पा मोरया म्हटले आणि माझी सफर सुरु केली.


ऱ्हाईन नदी, द्राक्षांचे मळे, आणि माझी सायकल

ओबरविझेल गाव आणि शुनबुर्ग   


नदीचे पात्र बरेच रुंद होते. मोठ-मोठ्या बोटीही ये-जा करत होत्या. दोन्ही बाजूंच्या डोंगर उतारांवर द्राक्षांचे मळे दिसत होते. द्राक्षवेलींच्या ओळींमुळे डोंगर विंचरल्यासारखे दिसत होते. डोंगर आणि नदी यांच्या मधून रस्ता आणि रेल्वेमार्ग जात होता. सायकल मार्गिका रस्त्याच्या कडेने आणि नदीच्या काठाने होती. वाटेत एखादे विस्तीर्ण उद्यान, एखादे बिअरगार्डन, एखादी कॅम्पसाईट, तर मधेच बोटींमध्ये चढण्या-उतरण्यासाठीची जेट्टी लागत होती. थोड्याच वेळात डोंगरमाथ्यावरचे सुप्रसिद्ध किल्ले दिसू लागले. काही एखाद्या राजवाड्यासारखे विशाल तर काही एखाद्या हवेलीसारखे टुमदार. १२व्या ते १४व्या शतकांच्या दरम्यान बांधले गेलेले हे किल्ले तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. या किल्ल्यांचे आणि नदीचे फोटो घेत माझी सफर सुरु होती. इतक्यात ओबरविझेल (Oberwiesel) नावाचे गाव लागले. गावाच्या वेशीवरच एक मध्ययुगीन निगराणी मनोरा होता. गावामागच्या डोंगरावर एक टुमदार किल्ला दिमाखात उभा होता. हाच तो शुनबुर्ग किल्ला (Schünburg). या खोऱ्यातल्या अनेक किल्ल्यांपैकी हा किल्ला आणि ओबरविझेल गाव पर्यटकांमध्ये जास्तच लोकप्रिय आहेत. या गावाजवळ ऱ्हाईन नदी एक शानदार वळण घेते. त्यामुळे इथल्या सौंदर्यात अजूनच भर पडली आहे. इथे थोडे छायाचित्रण करून मी पुढे निघालो. 


मध्य ऱ्हाईन खोऱ्यातून जाणारा रेल्वे मार्ग, रस्ता, आणि सायकल मार्गिका  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *