मध्य प्रदेशातली मुशाफिरी – भाग ८ – ग्वाल्हेर – सास बहु मंदिर आणि इतर वास्तू

गोपाचाल पर्वत म्हणजे ग्वाल्हेर शहराच्या मधोमध स्थित असलेला एक खडकाळ डोंगर. ग्वाल्हेरचा सुप्रसिद्ध किल्ला, त्यातले प्रेक्षणीय महाल, काही मंदिरे, आणि जैन शिल्पे याच डोंगरावर आहेत. मन मंदिर महाल आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहून आम्ही आलो सास-बहु मंदिराकडे. नावावरून वाटेल हे मंदिर सासू-सुनेचे आहे की काय. पण प्रत्यक्षात हे नाव म्हणजे सहस्रबाहूचा अपभ्रंश आहे. मंदिराचा बराचसा भाग नष्ट झालेला आहे. शिल्लक अवशेष म्हणजे मंडपाचा भाग असावा. बाहेरून इतक्या सुबक दिसणाऱ्या मंदिराची आतली कलाकुसर किती विलक्षण असेल या उत्सुकतेने आम्ही आत शिरलो. मंदिराची शैली थोडीफार खजुराहोच्या शैलीशी मिळती-जुळती होती. खांबांवरचे नाजूक कोरीवकाम, मुखमंडपाची द्विस्तरीय रचना, आणि गोलाकार छत अगदीच अचंबित करणरे होते. कलत्या उन्हाची एक तिरीप कुठल्याशा झरोक्यातून आत रेंगाळत होती. पिवळ्या वालुकाश्मावरून परावर्तित झाल्याने तिथे छाया-प्रकाशाचा एक अद्भुत परिणाम घडून येत होता. मला तर कुठल्याशा वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. गाभाऱ्याच्या द्वारावर अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले होते. तिथे बरेच फोटो काढले आणि बाहेर पडलो. शेजारीच दुसरे एक लहान मंदिर होते. हे मंदिर म्हणजे एका मोठ्या मंदिराचा मुखमंडप असावा. ग्वाल्हेर शहराच्या पार्श्वभूमीवर हे लहानसे सुबक मंदिर उठून दिसत होते. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिथे फार वेळ न घालवता आम्ही पुढे निघालो. 

सहस्रबाहू मंदिर 

सहस्रबाहू मंदिराच्या शेजारील लहान मंदिर 
मंदिरात रेंगाळणारी उन्हाची तिरीप 
तिथून पुढे आम्ही पोहोचलो ‘तेली का मंदिर’ या मंदिराकडे. हे मंदिर म्हणजे असाधारण वास्तुकलेचा नमुना आहे. उत्तर भारतीय नागरी आणि दक्षिण भारतीय द्राविडी वास्तुकलेचे मिश्रण यात मंदिरात दिसते. मंदिराची रचना इतर मंदिरांसारखी चौरसाकृती नसून आयताकृती आहे. मंदिराचे शिखर जवळपास ८० फूट उंच असून एखाद्या दाक्षिणात्य मंदिराच्या गोपुरासमान भासते. मंदिराचा बराचसा भाग ढासळलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते इसवी सनाच्या आठव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर म्हणजे गुप्तोत्तर कालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिर बंद व्हायची वेळ आली होती. दहा मिनिटात बाहेर येतो असे म्हणून आम्ही आत शिरलो. एकसलग उभट रचना असलेले हे मंदिर उत्तर भारतातल्या इतर मंदिरांपेक्षा निश्चितच वेगेळे भासत होते. मुखमंडप, अर्धमंडप गाभारा, असे कोणतेच भाग ओळखू येत नव्हते. भिंतींवर निव्वळ भौमितिक आकार आणि पानाफुलांची नक्षी होती. प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूंना काही मूर्ती होत्या, पण त्यासुद्धा गंगा-जमुना किंवा जय-विजय यांच्या वाटत नव्हत्या. मंदिर नियमित पूजेत नसल्याने आतमध्ये फारशी स्वच्छता नव्हती. मग आम्ही बाहेरूनच एक प्रदक्षिणा घातली. कलत्या उन्हाच्या सोनेरी प्रकाशात मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. थोडेफार फोटो काढून आम्ही तिथून बाहेर पडलो. 

तेली का मंदिर चा उत्तुंग कळस 
तेली का मंदिर ची असाधारण उभट रचना 

आशिषला किल्ल्यावरची एक खास जागा माहित होती जिथून सुंदर सूर्यास्त पाहता येतो. आम्ही लगेचच तिथे निघालो. ही जागा म्हणजे किल्याचा एक पडका बुरुज होता. आसपास फारसं कुणी नव्हतं. समोर अथांग पसरलेलं शहर दिसत होतं. बुरजाच्या दोन्ही बाजूंनी किल्ल्याची तटबंदी दिसत होती. इथून डोंगरकडा इतका तीव्र होता की या बाजूने कोणी चढाई करणं निव्वळ अशक्य. एका बाजूने सहस्ररश्मी लालबुंद होऊन डोंगराआड चालला होता. सारा आसमंत त्याच्या केशरी प्रभेने उजळला होता. नेमकी कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली! मग फोनच्या कॅमेऱ्यावरच थोडेफार फोटो काढले. तसं म्हणायला सूर्यास्त ही तर रोजचीच बाब. पण तरीही प्रत्येक सूर्यास्त वेगळा असतो. सूर्याची छटा वेगळी असते. ढगांचे आकार वेगळे असतात. आकाशाचा रंग वेगळा असतो. त्यात विशिष्ट पार्श्वभूमीची सोबत असली की त्या सूर्यास्ताला एक वेगळेच रुपडे मिळते. मग कच्छच्या रणातला सूर्यास्त वेगळा नि कन्याकुमारीच्या भूशिरावरचा सूर्यास्त वेगळा. दिवस आणि रात्रीतले हे स्थित्यंतर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून पहावे. त्याला तिथल्या भूगोलाचे आणि संकृतीचे अलंकार जडलेले असतात. ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरचा तो सूर्यास्तही असाच तिथल्या मातीत मळलेला होता. तिथल्या जाज्वल्य इतिहासाची गाथा मोठ्या आस्थेने सांगत होता. आम्ही शांतपणे आसमंताचे हळूहळू बदलत जाणारे रंग न्याहाळत बसलो होतो. आता हवेतला गारठा वाढू लागला होता. पूर्ण अंधार व्हायच्या आत शहर गाठावे म्हणून आम्ही तिथून निघालो. 

डोंगराआड जाणारा सूर्य 

अथांग पसरलेले ग्वाल्हेर शहर 

अजानबाहू तीर्थंकर 
आमचा पुढचा थांबा होता सिद्धाचल गुंफा. उर्वाई गेटच्या रस्त्यावर डोंगरकड्यात कोरलेल्या जैन लेण्यांचा हा एक समूह आहे. सातव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान घडवल्या गेलेल्या या लेण्या म्हणजे २४ जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. काही मूर्ती पद्मासनातल्या तर काही उभ्या आहेत. लेण्यांचा परिसर बराच मोठा होता. सूर्यास्त होऊन गेल्याने बहुतांश गुंफा बंद झालेल्या होत्या. सुरक्षारक्षकाला विनंती करून मी समोरच्याच मुख्य लेण्यांकडे निघालो. संधीप्रकाशात तीर्थंकरांच्या भावमुद्रा अजूनच गंभीर भासत होत्या. बऱ्याचशा मूर्तींचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. मुघल सत्तेचा परिपाक, दुसरे काय! चेहरा विद्रूप झालेला असला तरी ते अनावृत्त अजानबाहू शरीर शांततेचा संदेश देत तसेच अनासक्त उभे होते. अशाच खडकाळ लेण्यांतून या तीर्थंकरांच्या अनुयायांनी त्यांचा संदेश देशभर नेला. कितीही वार झाले तरी नष्ट न होण्याचे सामर्थ्य त्या विचाराला या लेण्यांनी दिले. लेण्या पाहता पाहता इतिहासरंजनात गुंग झालेला मी आशिषच्या हाकेने भानावर आलो. अंधार आणि गारठा दोन्ही वाढत चालले होते. 

सिद्धाचल गुंफा 

पद्मासनस्थित तीर्थंकर 

आम्ही शहरात परत येऊन छान गरमागरम चहा घेतला. जरा तरतरी आली. आशिषला आता काही कामासाठी जायचे होते. त्याला अनेक धन्यवाद देऊन मी त्याचा निरोप घेतला. ग्वाल्हेरच्या मध्यवर्ती भागात गजक खरेदी करून मी हॉटेलवर परतलो. ग्वाल्हेरच्या वैभवशाली इतिहासाचे ओझरते दर्शन आणि आशिषची सोबत यांमुळे दिवस मस्त गेला होता. लवकरच जेवण आटोपले आणि झोपी गेलो.       

क्रमशः 

Leave a Reply