बर्फाळलेले आईसलँड – भाग ४ – स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क

आजचा दिवस ठरवला होता आईसलँडच्या दक्षिण
भागातील प्रेक्षणीय स्थळांसाठी. कालच्यासारखीच सकाळी आठ वाजता रिकयाविकच्या मुख्य
स्थानकातून सुटणारी बस पकडली. ही बस मार्गातल्या स्कोगाफोस धबधब्यापाशी काही वेळ
थांबून पुढे थोर्समोर्कला जाणार होती. आईसलँडचा हा दक्षिण भाग तुलनेने सपाट मैदानी
असून इथली जमीन उपजाऊ आहे. आईसलँडची बहुतांश लोकसंख्या याच भागात एकवटलेली आहे. समुद्राच्या
सान्निध्यामुळे इथे हवामानही उबदार असते. बस रिकयाविकच्या बाहेर पडली आणि आजूबाजूला
हिरवी कुरणे, त्यात धावणारे घोडे, ल्युपिनची जांभळी फुले असे मनोहारी दृश्य दिसू
लागले. साधारण साडेदहाच्या आसपास बस स्कोगाफोसला पोहोचली.

स्कोगाफोस धबधबा

धबधब्याच्या मागील गुहेकडे जाणारी अरुंद वाट 
स्कोगाफोस हा आईसलँडमधला एक सुप्रसिद्ध धबधबा. जवळपास ६० फूट उंच कड्यावरून खाली
कोसळणारे पाणी आणि त्यामागची नैसर्गिक गुहा पाहण्यासाठी इथे पर्यटक गर्दी करतात.
या जागेचे नयनरम्य फोटो पाहून मी तिथे जाण्यास फारच उत्सुक होतो. बस थांबली त्या
पार्किंगच्या जागेवरून दूरवर तो मनोहारी धबधबा दिसत होता. अगदी बघता क्षणी तिथे जाण्याची
अनिवार ओढ लागावी असे ते दृश्य होते. मी जवळच्या कॅफेमधून गरमागरम कॉफी घेतली आणि धबधब्याकडे
जायला निघालो. वातावरण काहीसे ढगाळलेले होते. कोसळणाऱ्या पाण्याचा तालबद्ध आवाज
सगळीकडे घुमत होता. त्या डोंगरकड्यातून घुमणारा वारा आपला वेग कमीजास्त करत जणू
काही पाण्याच्या सुरात आपला सूर मिळवू पहात होता. धबधब्यातून खाली कोसळणारे पाणी
असंख्य ओहोळांतून दूरवर वाहत जात होते. मी एक मोक्याची जागा निवडली आणि कॅमेरा
बाहेर काढला. शटरस्पीडशी खेळ करत वाहत्या पाण्याचे फोटो काढणे हा माझा आवडता छंद. धबधब्याच्या
आजूबाजूची हिरवळ आणि आकाशात विखुरलेले ढग त्या जागेचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. कॉफीचे
घुटके घेत तिथे थोडा वेळ फोटोग्राफी करून मी परिसर हुडकायला आजूबाजूला फेरफटका
मारू लागलो. धबधब्याच्या उजव्या अंगाने एक अरुंद वाट मागच्या गुहेकडे जात होती.
माझ्या अपेक्षेपेक्षा ती गुहा बरीच मोठी दिसत होती. एका दंतकथेनुसार या गावात सर्वप्रथम
स्थायिक झालेल्या वायकिंग सरदाराने आपला खजिना या गुहेत लपवून ठेवला होता. काही
वर्षांनी स्थानिक गावकऱ्यांनी त्या खजिन्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना
ती पेटी सापडली देखील. मात्र त्या पेटीच्या कडीला हात लावताच ती पेटी अदृश्य झाली!
गावकऱ्यांनी हाती लागलेली ती कडी स्थानिक चर्चकडे सुपूर्द केली. आजही जवळच्या एका
वस्तुसंग्रहालयात ती कडी पहायला मिळते. अर्थातच, त्या कडीचे अस्तित्व या कथेच्या सत्यासत्यतेचा
पुरावा नाही. असो.

आवेग!
काही पर्यटक त्या अरुंद वाटेने गुहेकडे जात होते. मलाही उत्सुकता होतीच. मी
तिथे जाण्यास निघालो. जसजसे धबधब्याच्या जवळ जाऊ लागलो तसा पाण्याचा प्रचंड आवाज कानांवर
आदळू लागला. वाऱ्यामुळे उडणारे पाण्याचे तुषार अंगावर उडू लागले. त्या थंडगार
पाण्याचा अंगाला स्पर्श होताच हुडहुडी भरू लागली. मध्यात एक चौथरा बांधलेला होता.
तिथून धबधबा नव्वद अंशाच्या कोनात दिसत होता. त्या जागेची अनुभूतीच विलक्षण होती.
मी एका जागी होतो. पण माझ्या आजूबाजूला केवळ आवेग होता. खोल दरीच्या गर्तेत स्वतःला
झोकून देणाऱ्या पाण्याचा आवेग, दरीत पोहोचायच्या आधीच हवेतल्या आर्द्रतेत लुप्त
होणाऱ्या तुषारांचा आवेग, त्या जलकणांशी स्पर्धा करणाऱ्या वाऱ्याचा आवेग. मी
काहीसा स्तब्ध झालो. हाच आवेग मला त्या गुहेत जाऊन अनुभवायचा होता. आता ती पायवाट
अजूनच अरुंद झाली होती. सतत उडणाऱ्या पाण्यामुळे सगळी वाट निसरडी झाली होती.
इतक्यात काही लोक तिथून परतताना दिसले. त्यांचा ओलाचिंब अवतार बघून मी गारठलोच.
गुहेत जाऊन एवढं भिजायला होतंय की यांनी उड्या मारल्या पाण्यात? मी सहज एका ओल्या
चायनीज काकांना विचारलं. “
Ya ya, it’s very wet and cold!!” असं उत्तर
मिळाल्यावर मी तिथूनच मागे परतायचा निर्णय घेतला. एकतर बदलायला कपडे नव्हते. शिवाय
हातात कॅमेरा! त्यामुळे, तसाही तिथे काही खजिना सापडणार नाहीये असा विचार करून मी
मागे फिरलो. अशा लहानसहान गोष्टी त्या विमुक्त निसर्गाला काही थोपवू शकत नाहीत.
त्याचा आवेग कायम तसाच असतो. कुठेतरी आपल्या आयुष्याच्या क्षुद्रतेची जाणीव मनाला
चाटून गेली. तेवढ्यात बसमधला एक सहप्रवासी लगबगीने पुढे जाताना दिसला. कदाचित बस
सुटायची वेळ झाली असावी. त्याला पाहून मी माझ्या तत्त्वचिंतनातून बाहेर आलो आणि
बसकडे जायला निघालो.    

या धबधब्याच्या जवळच स्कोगार नामक गाव आहे. तिथूनच आईसलँडमधला दुसरा
सुप्रसिद्ध ट्रेक – फिमवुर्लाउस (
Fimmvörðuháls) सुरु होतो. साधारण ३० किमी लांबीचा
हा ट्रेक नयनरम्य धबधब्यांच्या संगतीने थोर्समोर्कपर्यंत जातो. वाटेत एका ठिकाणी
रात्रीच्या मुक्कामाची सोयही आहे. लाउगावेगुर नाही तर निदान हा ट्रेक करायची माझी
फार इच्छा होती. पण सगळ्या गोष्टी जुळून येत नसल्याने मी मनाला मुरड घातली.
थोड्याच वेळात बस मार्गस्थ झाली. मुख्य रस्ता सोडून बस आता कच्च्या रस्त्यावरून
धावू लागली. आजूबाजूला बर्फाच्या टोप्या घातलेले डोंगर आणि त्यांच्या मधल्या
मैदानांतून वाहणाऱ्या प्रचंड नद्या असे दृश्य दिसू लागले. दक्षिणेकडच्या सपाट
प्रदेशातून बस थोर्समोर्कच्या डोंगराळ प्रदेशात जात असल्याचे जाणवत होते.  

काळ्या मातीने भरलेली दरी 
अचानक मातीचा रंग बदलल्यासारखा वाटू लागला. आत्तापर्यंत लहानमोठ्या दगडगोट्यांची
रेलचेल असलेली राखाडी रंगाची माती आता काळपट आणि भुसभुशीत वाटू लागली. एका टेकडावर
बस  थांबली. खाली उतरून पाहतो तर काय
समोरची अवघी दरी काळ्या भुसभुशीत मातीने भरलेली होती. बसचा ड्रायव्हर माहिती देऊ लागला.
कधी काळी या दरीच्या जागी एक सुंदर तळे होते. २०१० मध्ये
Eyjafjallajökull या ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान या तळ्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर
भूस्खलन झाले व सारे तळे चिखलाने भरले. आज त्या जागी नुसत्या काळ्या मातीने भरलेली
खोलगट जागा दिसते. तिथले तळे जेव्हा अस्तित्वात होते तेव्हा कसे दिसत असेल याची कल्पना
मी करू लागलो. तेवढ्यात ड्रायव्हरने आमचे लक्ष वेधले समोरच्या डोंगररांगेकडे. त्या
रांगेतच होता
Eyjafjallajökull. मी हे नाव देवनागरीत लिहण्याचा
प्रयत्न केला खरा. पण उच्चारातली गुंतागुंत पाहता मी तो प्रयत्न सोडून दिला. अमेरिकन
माध्यमांनी तर २०१० मधल्या उद्रेकाचे वर्णन करताना या नावाचे
E15 असे लघुकरण करून टाकले. आईसलँडच्या तमाम जनतेसाठी हा मोठ्या गमतीचा विषय
होता. एप्रिल २०१० मध्ये झालेला हा उद्रेक तसा लहानसाच असला तरी त्यातून मोठ्या प्रमाणावर
धूर आणि राख यांचा उत्सर्ग झाला. वाऱ्याने ते सारे अवघ्या उत्तर युरोपभर पसरले आणि
१० देशांना तब्बल ६ दिवसांसाठी आपली विमान वाहतूक बंद ठेवावी लागली. यात विमान कंपन्यांचे
आणि प्रवाशांचे प्रचंड नुकसान झाले. एका इवल्याशा बेटावरचा एक कुठलासा ज्वालामुखी
अर्ध्या जगाला जेरीस आणतो ही बाब म्हणजे निसर्गापुढच्या मानवाच्या हतबलतेचे उत्तम उदाहरण
आहे!

ज्वालामुखी असलेली डोंगररांग 
ज्वालामुखी उद्रेकाच्या खुणा पाहून आम्ही पुढे निघालो. ओबडधोबड रस्त्यावरून मार्ग
काढत आमची बस थोर्समोर्कला पोहोचली. इथले डोंगर तुलनेने जरा जास्त हिरवेगार दिसत
होते. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका कॅम्पसाईटजवळ बस थांबली. लाउगावेगुर ट्रेकचे
हे दुसरे टोक असल्याने इथेही ट्रेकर्सची लगबग सुरु होती. माझ्याकडे साधारण ३ तास
होते. लांडमानालोगरसारखाच इथेही एक छोटा ट्रेकिंग मार्ग जवळच्याच दुसऱ्या कॅम्पसाईटकडे
घेऊन जात होता. त्या ठिकाणाहूनही परतीची बस पकडायची सोय असल्याने मी तिथपर्यंत
चालत जायचे ठरवले. सुरुवातीची वाट सपाट होती. आजूबाजूला लहान-मोठी झुडूपं उगवली
होती. त्यांतल्या फुलांमध्ये मधमाशा घोंघावत होत्या. लांडमानालोगरच्या तुलनेत इथे
उन्हाळ्याचे आगमन लवकर झाले होते. मी रमत गमत, फोटो काढत पुढे निघालो. थोड्या
वेळातच वाट एका टेकाडावर चढू लागली. तीव्र चढाच्या ठिकाणी चक्क लाकडाच्या पायऱ्या
बांधल्या होत्या. थोडक्यात, ही वाट ट्रेकर्सची नाही तर पिकनिकला येणाऱ्या पर्यटकांची
होती. असो. ते टेकाड चढून मी माथ्यावर पोहोचलो. तिथून पलीकडच्या बाजूचा विस्तीर्ण
भूप्रदेश दिसत होता. नदीच्या काठावरची इवलीशी कॅम्पसाईट तर फारच गोंडस दिसत होती.
वाटेत काही ट्रेकर्स भेटले. ते त्यांच्या लाउगावेगुर ट्रेकच्या अंतिम टप्प्यात
होते. त्यांच्यासोबत ट्रेकविषयी गप्पा मारत मारत मी कॅम्पसाईट वर पोहोचलो.

थोर्समोर्क मधील फुले 
कॅम्पसाईट आणि आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग 
हा पिकनिक मार्ग जेमतेम पाउण तासाचा होता. बस यायला अजून दोन तास होते. कॅम्पसाईटच्या
ऑफिसात लवकरच्या बसविषयी चौकशी करायला गेलो असता कळले की इथून तासाभराच्या अंतरावर
अजून एक कॅम्पसाईट आहे आणि इथे येणारी बस तिथूनच येते. मग काय, मी निघालो. ही वाट
नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यातून जात होती. दगडधोंडे, चिखल, पाण्याची डबकी, आणि मधेच
वाहणारे ओहोळ अशा भूप्रदेशातून वाट काढत मी पुढे निघालो. तशा मार्गदर्शक खुणा
होत्याच. पण त्यांचा उपयोग केवळ दिशेचा अंदाज चुकू नये यासाठी. पायाखालचा रस्ता
शोधणे ही तुमचीच जबाबदारी! निदान लांडमानालोगरसारखी बर्फात रस्ता चुकण्याची शक्यता
इथे नव्हती. थोड्याच वेळात नदीच्या मुख्य प्रवाहापर्यंत येऊन पोहोचलो. इथे
प्रवाहाचा वेग आणि खोली जास्त असल्याने त्यावर एक चाकं लावलेला जुगाड लोखंडी पूल ‘ठेवला’
होता. बदलत्या प्रवाहानुसार कुठेही हलवता येईल अशी पुलाची रचना मला अगदीच
नावीन्यपूर्ण वाटली. मात्र पुलाचे एकूण स्वरूप पाहता पाण्याचा जोर वाढला तर तो
कोणत्याही क्षणी वाहून जाईल अशी परिस्थिती होती. मी जरा दबकतच पुलावर चढलो.
पुलावरून नदीचे विशाल खोरे, आसपासचे डोंगर, आणि वनश्री यांचे अप्रतिम दृश्य दिसत
होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी पुढे निघालो. पुढचा रस्ता नदीच्या काठाने जात
होता. काही वेळातच मी कॅम्पसाईटवर पोहोचलो. ही कॅम्पसाईट आत्तापर्यंत पाहिलेल्या
कॅम्पसाईट्सपेक्षा बरीच मोठी होती. तिथल्या कॅफेमध्ये थोडा वेळ विसावलो. एक
छानपैकी पिझ्झा मागवला आणि निवांतपणे खात बसलो. यथावकाश बस आली.

हलवता येणारा जुगाड पूल 
रिकयाविकला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे आठ वाजले होते. हॉस्टेलवर पोहोचलो
तेव्हा फिलीप बाहेर पडत होता. तो आणि हॉस्टेलमधले अजून काही लोक बार मध्ये जात
आहेत असं कळल्यावर मीही लगेच आवरून त्यांच्यासोबत बाहेर पडलो. थोड्या वेळाने क्लारा
आणि तिची मैत्रीण मार्गारेट (उर्फ मॅगी) आमच्यात सामील झाले. तिथे गप्पा मारता
मारता आम्ही पुढच्या दिवशीच्या कार्यक्रमाचा विषय निघाला. मॅगीकडे युरोपात गाडी
चालवायचा परवाना असल्याने ती गाडी भाड्याने घेऊ शकत होती. मग आम्ही चौघांनी गाडी भाड्याने
घेऊन रिकयाविकच्या आजूबाजूच्या काही जागा पहायचे ठरवले. सगळी रूपरेषा ठरवून आम्ही रिकयाविकमधले
रात्रजीवन पहायला बाहेर पडलो.
   

थोर्समोर्क मधील प्रचंड नदी आणि विस्तीर्ण खोरे 

Leave a Reply