बर्फाळलेले आईसलँड – भाग ३ – धुक्यात हरवलेली वाट

आईसलँडमध्ये फिरण्यासाठी स्वतःचे वाहन भाड्याने घेणे सर्वोत्तम. इथली
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नाही. रिकयाविक आणि परिसरात फिरण्यासाठी बसची
व्यवस्था आहे. मात्र लांबवरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सार्वजनिक
वाहतूक अगदीच मर्यादित आहे. स्वतःचे वाहन नसल्यास एखाद्या कंपनीसोबत गाइडेड टूरने
जाणे अधिक सोयीचे. मात्र अशा टूर्स काही मला हव्या असलेल्या ठिकाणी जात नव्हत्या.
शिवाय त्यांचे तिकीटही अवाजवी महाग होते. शेवटी रिकयाविक एक्सकर्जन्स (
Reykjavik Excursions) या कंपनीचा hiking on your own नामक तीन दिवसांचा
पास विकत घेतला. या पासवर आईसलँडच्या दक्षिण भागातील ठराविक मार्गांवर कोणत्याही
बसमधून, कोणत्याही वेळी जाता येत होते. आपल्या सोयीनुसार फिरण्याची इच्छा
असलेल्यांसाठी ही सहलयोजना फारच संयुक्तिक होती.

लाउगावेगुर ट्रेकचा नकाशा
(फोटो आंतरजालावरून साभार)  
मी पहिला दिवस ठरवला लांडमानालोगर (Landmannalaugar) या निसर्गसुंदर जागेसाठी.
गरम पाण्याचे झरे आणि लाव्हाजन्य खडकांपासून बनलेला भूप्रदेश यांसाठी ही जागा प्रसिद्ध
आहे. इथूनच आईसलँडमधला जगप्रसिद्ध लाउगावेगुर
(Lugavegur) ट्रेकिंग
मार्ग सुरु होतो. आईसलँडमधल्या अतिशय दुर्गम अशा हायलँड मधून जाणारा हा ट्रेकिंग
मार्ग दक्षिणेकडील थोर्समोर्क
(Thorsmork) या जागी संपतो.
हिमनद्या, लाव्हा पठारे, आणि जागृत ज्वालामुखी यांच्या सान्निध्यातून  जाणारा हा ५५ किमी लांबीचा ट्रेक ३  ते  ५
दिवसांत पूर्ण करता येतो. मार्गात काही कॅम्पिंगच्या जागा आहेत, जिथे रात्रीच्या
मुक्कामाची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी आगाऊ आरक्षण आवश्यक असते. उन्हाळ्याच्या
दिवसांत या ट्रेक ला जाणाऱ्या लोकांची संख्या भरपूर असल्याने कॅम्पिंगचे दरही गगनाला
भिडलेले असतात. जुलै २०१५ मध्ये एका रात्रीचे जवळजवळ १०० युरो एवढा दर होता.
एवढ्या किमतीत युरोपातल्या एखाद्या शहरात ३ दिवसांची राहण्याची सोय होऊ शकते! असो.
लाउगावेगुर ट्रेक करायची फार इच्छा होती. पण वेळ, पैसे, सामुग्री, आगाऊ आरक्षण यांपैकी
काहीच नव्हते. मात्र त्या ट्रेकिंग मार्गावर एक तासभर जाऊन परत यायचे असे मी ठरवले.
दुधाची तहान ताकावर!

सकाळी आठ वाजता लांडमानालोगरकडे जाणारी बस पकडली. बसमध्ये मुख्यत्वे ट्रेकर्स
होते. उगीच पोराटोरांना घेऊन नुसते फोटो काढण्यासाठी फिरणाऱ्या उथळ पर्यटकांचा
भरणा इथे नाही हे बघून बरे वाटले. बसमध्ये आईसलँडविषयी माहिती देणारी ध्वनिफीत
लावली होती. त्यात देशाविषयी अनेक रंजक बाबी सांगितल्या जात होत्या. त्यातली एक गमतीची
गोष्ट म्हणजे आईसलँड आणि ग्रीनलँड यांची तुलना.
“Iceland is greener than Greenland and Greenland
is icier than Iceland” असे ते गमतीचे वाक्य होते. काही सहप्रवाशांशी ओळख झाली. त्यांच्याशी गप्पा मारता मारता वेळ चांगला
जात होता. एव्हाना हायवेवरून धावणारी बस आता एका खडकाळ रस्त्यावर आली होती.
नुसत्या दगड मातीचा खडबडीत रस्ता युरोपात पहिल्यांदाच पाहत होतो. आईसलँडच्या या
भागात रस्ते बांधूनही काही फायदा नाही. सतत होणारे भूकंप, त्यामुळे होणारे
भूस्खलन, हिमस्खलन, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक परिस्थितीमुळे रस्ते टिकण्याची
काहीच शक्यता नाही. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बर्फ वितळल्यानंतर एकदा सर्वेक्षण
करून मार्गदर्शक खुणा लावल्या जातात. त्यांचा माग ठेवत पुढे जायचे. कधी रस्त्यात ओढे लागतात. त्यातच गाडी
घालायची आणि पुढे जायचं. साधे रस्ते जिथे टिकत नाहीत तिथे पूल काय टिकणार? मला तर
हिमालयातल्या एखाद्या दुर्गम ठिकाणी आल्यासारखे वाटत होते.

ओढ्यात अडकलेली बस बाहेर  काढताना
वातावरण ढगाळ होते. पाऊस पडेल की काय असे वाटत होते. पहिले तीन-चार ओढे तर
बसने लीलया पार केले. पुढचा ओढा म्हणजे जरा अवघड प्रकरण होते. विरुद्ध दिशेने येणारी
एक बस ओढ्याच्या मध्येच चिखलात रुतून बसली होती. त्यामुळे मागच्या सगळ्या गाड्या
अडकल्या होत्या. काही सुरक्षा अधिकारीही तिथवर पोहोचले होते. आमचा चालक खाली उतरला.
तिथल्या अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा झाली आणि थोड्याच वेळात त्याने गाडीच्या सामानकक्षातून
एक भलामोठा दोरखंड बाहेर काढला. त्याचं एक टोक आमच्या बसला आणि दुसरं अडकलेल्या
बसला बांधलं. मग याने आमची गाडी हळूहळू मागे घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या बसच्या
चालकानेही इंजिन सुरु करून गाडी पुढे रेटायचा प्रयत्न सुरु केला. अखेरीस मोठ्या
मुश्किलीने ती बस बाहेर पडली. सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. ती बस तिथून
निघाली नसती तर आम्हाला तिथूनच परत जावे लागले असते.

यथावकाश लांडमानालोगरला पोहोचलो. ती जागा सगळ्या बाजूंनी टेकड्यांनी वेढलेली
होती. एका बाजूला एक लहानसं उपहारगृह आणि कॅम्पसाईट होती. त्याच्या मागच्या बाजूलाच
‘लाउगावेगुर ट्रेकचे आरंभस्थान’ असा फलक लावलेला होता. त्यावर संपूर्ण मार्गाचा
नकाशा होता. मुख्य मार्गासोबत इतरही काही छोटे मार्ग त्यात दर्शवले होते. त्यातलाच
एक दोनेक तासात पूर्ण होईल असा वर्तुळाकार मार्ग मी निवडला आणि चालायला सुरुवात
केली. मार्गदर्शक खुणांची सोबत होतीच. थोड्याच वेळात वाट कॅम्पसाईटच्या मागच्या
टेकडीवर चढू लागली. चढण फार तीव्र नव्हती. काही मिनिटांतच वरच्या पठारावर पोहोचलो.
इथून काही अंतर पुढे जाताच लांडमानालोगरची प्रसिद्ध दरी दृष्टीस पडली. सुमारे
तीनशे वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून ही दरी निर्माण झाली.
इथल्या खडकात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने लाल-पिवळ्या-किरमिजी अशा असंख्य छटा त्यांत
दिसतात. सूर्यप्रकाश योग्य दिशेने असेल तर इथले भूदृष्य अप्रतिम दिसते.
दुर्भाग्याने त्या दिवशी फारच ढगाळ वातावरण होते. ती दरी तर धुक्याने भरलेली होती.
माझी थोडी निराशाच झाली. उगाच काढायचे म्हणून दोन-चार फोटो काढून मी पुढे निघालो.

धुक्याने भरलेली लांडमानालोगरची दरी  
मी निवडलेला ट्रेक रूट दरीच्या वरच्या अंगाने गोल फिरून पुन्हा मागे कॅम्पसाईटच्या
दुसऱ्या बाजूला खाली उतरत होता. बसमधले काही सहप्रवासीही त्याच मार्गाने जात होते.
त्यांच्यासोबत मी पुढे जाऊ लागलो. थोड्या अंतरावरच बर्फाने भरलेले पठार लागले.
जुलैच्या पहिल्या आठवड्यातही एवढा बर्फ बघून मी जरा चकितच झालो. बर्फ वितळायला
सुरुवात झाल्याने सारी वाट निसरडी झाली होती. सोबतचे काही लोक तिथूनच मागे वळले. मला
मात्र लाउगावेगुरचा ‘रियल फील’ घ्यायचा होता. उरलेल्या काही तरुण उत्साही
लोकांसोबत मी पुढे निघालो. त्यांपैकी काही जण संपूर्ण लाउगावेगुर चालायला निघाले
होते. त्यांच्यासाठी हे बर्फ म्हणजे रंगीत तालीम होती. म्हणता म्हणता ते बर्फाळ
पठार संपले. आता काहीशी खडकाळ अशी चढण सुरु झाली. इथे एका ठिकाणी खडकांच्या खालून वाफा
येताना दिसत होत्या. सहज एका दगडाला हात लावला तर चटकाच बसला. खडकाच्या खालून गरम पाण्याचे
झरे वाहत असावेत कदाचित. आईसलँडमध्ये भू-औष्णिक उर्जास्थाने प्रचंड प्रमाणात आहेत.
अशा एखाद्या दगडाखालून वाफा येताना दिसणे म्हणजे भारतातल्या रस्त्यावर गाय
दिसण्यासारखे आहे. एका खोलगट भागातून जरा जास्तच वाफा येत होत्या. तिथे डोकावून
पाहिले तर पिवळ्या रंगाची भुकटी सर्वत्र पसरलेली दिसली. पाण्यातले गंधक निक्षेपित
होऊन इथे सर्वत्र पसरले होते. त्याची मातीतल्या इतर पदार्थांसोबत अभिक्रिया घडून
विविध रंगांचे लहानमोठे पुंजके तयार झाले होते. सारेच दृश्य अद्भुत होते. थोडा
सूर्यप्रकाश असता तर अजून मजा आली असती असे राहून राहून वाटत होते.

गंधकाची विहीर 
तेवढ्यात गडद धुक्याचा एक प्रचंड लोट तिथे अवतरला. धुकं एवढं दाट कि ४-५ फुटांवरचेही
काही दिसेना. लोकांच्या येण्या-जाण्याने पायाखालची वाट बुटांच्या ठशांनी भरलेली
होती. आपण योग्य मार्गावर आहोत याचा तो एक भक्कम पुरावा होता. मी पुढे जात राहिलो.
एव्हाना बसमधले सहप्रवासी पुढे-मागे विखुरले गेले होते. त्या दाट धुक्यात कोणीच नजरेच्या
टप्प्यात नव्हतं. आता पुन्हा बर्फ लागलं. या बर्फात बुटांचे ठसे अधिकच ठळक दिसत
होते. जवळपास अर्धा तास पुढे गेल्यावर लक्षात आलं की मार्गदर्शक खुणा कुठे दिसत
नाहीयेत! जरासा गोंधळलो. शेवटची मार्गदर्शक खूण कुठे पाहिली होती ते आठवू लागलो. आता
ती खूण शोधत मागे जावं का या विचारात असतानाच बसमधल्या दोन डच बायका मागे येताना
दिसल्या. कदाचित त्याही रस्ता चुकून खुणेच्या शोधात मागे येत असाव्यात.
त्यांच्याशी बोलताना कळलं की तो रस्ता थेट एका दरीच्या तोंडाशी घेऊन जात होता! पण
मग हे बुटांचे ठसे? कदाचित दरीचे फोटो काढायला गेलेल्या लोकांचे असावेत. अर्धवट
वितळलेल्या बर्फात काहीशा अस्पष्ट झालेल्या ठशांनी चांगलीच दिशाभूल केली होती.
शेवटी आम्ही तिघे शेवटची पाहिलेली खूण शोधत मागे चालू लागलो. तेवढ्यात एका डावीकडच्या
दरडीमागून एक माणूस वर येताना दिसला. हा इथून कसा काय वर आला या संभ्रमात आम्ही
असतानाच दरडीच्या तळाशी एक मार्गदर्शक खूण आम्हाला दिसली. ही काही आम्ही शेवटची
पाहिलेली खूण नव्हती. थोडक्यात त्या धुक्यात आम्हा तिघांनाही ती खूण दिसली नव्हती.
रस्ता सापडल्याचं दिसताच आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. 

मधेच बर्फ आणि मधेच खडक अशा प्रदेशातून जाणारी लाउगावेगुरची वाट  
त्या दरडीमागून वाट खाली उतरत होती. त्या दोघीजणी तिथेच जरा वेळ थांबू
म्हणाल्या. मी मात्र पुढे निघालो. भल्यामोठ्या खडकांच्या मधून जाणारी ती वाट तीव्र
उताराची होती. उजवीकडच्या दरीतून एक ओहोळ वाहत होता. मार्गातल्या शिळांना नि त्यांत
साचलेल्या बर्फाला चिरत तो प्रवाह रोंरावत पुढे जात होता. धुक्याचा तो दाट पडदा
आता काहीसा सौम्य झाला होता. हलक्या धुक्याच्या पुंजक्यांतून दिसणारा तो दरीतला
ओहोळ एक गूढ साद घालत होता. निसर्गाच्या सान्निध्यातला असा एकांत म्हणजे एक प्रकारची
ध्यानसाधनाच. तिथल्याच एका खडकावर क्षणभर विश्रांती घेऊन मी पुढे निघालो. काही
अंतरातच ती वाट खालच्या पठारावर पोहोचली. कॅम्पसाईट आता नजरेच्या टप्प्यात दिसत
होती. यथावकाश तिथे पोहोचलो. एक गरमागरम कॉफी घेतली आणि बसमधल्या सहप्रवाशांशी गप्पा
मारत बसलो.

दरीतून रोंरावत जाणारा ओहोळ
कॅम्पसाईटच्या पलीकडच्या बाजूला गरम पाण्याची कुंडं होती. बस निघायला अजून वेळ
होता. काही सहप्रवासी कुंडांत डुंबायला निघाले होते. त्यांच्यासोबत मीही निघालो.
वाट चुकलेल्या एका बर्फाळ ट्रेकनंतर त्या गरम पाण्यात डुंबणे म्हणजे अगदी स्वर्गीय
आनंद होता. तिथून बाहेर निघावेसेच वाटत नव्हते. बसची वेळ होताच आम्ही डुंबणे आवरते
घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

गरम पाण्याची कुंडे 

                                     क्रमशः 

Leave a Reply