नितांतसुंदर क्रोएशिया भाग २ – झदार आणि कोर्नाती द्वीपसमूह

माझा क्रोएशिया सहलीतला पुढचा मुक्काम होता झदार.
हे शहर एड्रीयाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोमन साम्राज्यकालीन अवशेषांसाठी
प्रसिद्ध असलेले हे शहर क्रोएशियातील आजतागायत लोकवस्ती असलेले सर्वात प्राचीन शहर
आहे. प्लिटवित्से नॅशनल पार्कवरून बसने मी झदारच्या दिशेने निघालो. रस्ता डोंगराळ
भागातून नागमोडी वळणे घेत पुढे जात होता. डोंगरमाथ्यावर अजूनही बर्फ दिसत होता.
आसपासची झाडे वसंत ऋतूच्या आगमनासाठी सज्ज झालेली दिसत होती. तेवढ्यात एक बोगदा
लागला. बोगद्यातून बाहेर पडताच आजूबाजूचे दृश्य एकदम पालटून गेल्यासारखे वाटू
लागले. गर्द वनराईच्या जागी आता खोल दऱ्या दिसत होत्या. डोंगरकड्यांच्या फटींमधून समुद्र
हळूच डोकावत होता. पश्चिमेकडे कललेल्या सूर्याची सोनेरी किरणे डोंगरांवरून काढता
पाय घेत होती. वेलेबीट डोंगररांगांचा किनाऱ्याजवळचा तीव्र उताराचा हा प्रदेश होता.
ते अनोखे सौंदर्य दिवसभराच्या थकव्यावर नाजूक फुंकर घालत होते. हळूहळू बस घाट
उतरून सपाट किनारी प्रदेशात पोहोचली. शहर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. मी हॉस्टेलवर
पोहोचेपर्यंत गुडूप अंधार झाला होता.

थोडावेळ विश्रांती घेऊन मी शहरात फेरफटका मारायला
बाहेर पडलो. रात्रीच्या भोजनाची सोयही करायची होती. झदार हे समुद्रकिनारी असल्याने
इथे उष्ण व कोरडा उन्हाळा आणि ऊबदार पण पावसाळी हिवाळा असे भूमध्य सागरी प्रकारचे
हवामान अनुभवास येते. यंदाचा वसंत जरा लवकरच सुरु झाला होता. तापमान साधारण १५ अंश
सेल्सियस होते. मात्र समुद्रावरच्या वाऱ्यामुळे हुडहुडी भारत होती. थोडक्यात, हिवाळी
कोट पासून सुटका नव्हतीच.
सेंट डोनाटसचे चर्च
(फोटो आंतरजाला वरून साभार)
 

झदार चा मध्यवर्ती भाग एका लहानशा भूशिरावर वसला आहे.
येथे अनेक ऐतिहासिक अवशेष दिसतात. सेंट डोनाटसचे चर्च 
(Church of St.
Donatus
)
ही इथली विशेष
महत्त्वाची वास्तू.
 ईसवी सनाच्या नवव्या शतकात बांधले गेलेले हे चर्च प्री-रोमानेस्क
(pre-Romanesque) स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. झदार कॅथेड्रल (Zadar Cathedral) या नावाने ओळखले
जाणारे सेंट अॅनास्टेशियाचे कॅथेड्रल
 येथील प्रमुख आकर्षण आहे. हे जरी मूलतः ईसवी सनाच्या
चौथ्या शतकात बांधले गेले असले तरी पुढच्या काळात झालेल्या अनेक रचनात्मक बदलांनी आणि
वाढीव बांधकामांनी याचे मूळ स्वरूप पूर्णतः बदलले आहे. वेगवेगळ्या कालखंडांतील
स्थापत्यशैलींचा प्रभाव या वास्तूवर दिसतो. संध्याकाळी उशिराची वेळ असल्याने
दोन्ही चर्च बंदच होते. आसपास फेरफटका मारून मी जवळच्याच उपहारगृहात रात्रीचे भोजन
उरकले आणि हॉस्टेलवर पोहोचलो.




झदार कॅथेड्रल
(फोटो आंतरजालावरून साभार) 
पुढचा दिवस ठरवला होता कोर्नाती कोर्नाती नॅशनल
पार्कसाठी
(Kornati  National Park) . झदारच्या नैऋत्येकडे एड्रीयाटिक
समुद्रात स्तोमोर्स्की नामक द्वीपसमूह
(Stomorski islands) आहे. यातील दक्षिणेकडची ८९ बेटे आणि
त्याभोवतालचा सागरी प्रदेश नॅशनल पार्क म्हणून संरक्षित केला आहे. हा द्वीपसमूह त्यातील
बेटांच्या रमणीय भूप्रदेशासाठी, पारदर्शक पाण्यासाठी, आणि सागरी जैव-विविधतेसाठी सुप्रसिद्ध
आहे.
झदारमधल्या अनेक बोट-कंपन्या पर्यटकांसाठी
कोर्नातीची सहल आयोजित करतात. इस्टर च्या सुट्टीमुळे जवळपास सगळ्या कंपन्या बंद
होत्या.
Kornat Excusrions नामक एकमेव कंपनी त्या
दिवशी ही सहल आयोजित करत होती. या सहलीचे आरक्षणही आगाऊ केल्याने मिळाले होते.
नाहीतर तो दिवस नुसता हरी-हरी करण्यात गेला असता. ठरलेल्या वेळी झदारच्या धक्क्यावरून
बोट सुटली. साधारण शंभर-एक लोक बसतील एवढी मोठी बोट होती. आतमध्ये खानपान, संगीत,
पोहण्यासाठी लागणाऱ्या वस्तू वगैरे सुविधा होत्या. आजूबाजूच्या प्रदेशाची माहिती
देणारी एक टेप चालू होती. सगळ्या वतावरणात एक उत्साह जाणवत होता. मी छानपैकी डेक
वरची जागा पकडली आणि कॉफीचे घुटके घेत बाहेरचे दृश्य न्याहाळू लागलो. आकाशात तसे
मळभ आले होते. गार वारा सुटला होता. तशा वातावरणात ती गरमागरम कॉफी वेगळाच आनंद देत
होती.
हळूहळू झदारचा किनारा मागे पडला आणि दूरवर लहानमोठ्या
बेटांचे समुद्रातून डोकावणारे आकार दिसू लागले. समुद्रपक्ष्यांचे थवे बोटीच्या
बाजूने उडत होते. जसजसे बेटांच्या जवळ पोहोचू लागलो तसा समुद्र उथळ होऊ लागला. काचेसारख्या
पारदर्शक पाण्यातून तळ दिसत होता. कोर्नाती द्वीपसमूहातली बेटे आता अगदी समोर दिसत
होती. बहुतांश बेटे खडकाळ होती. काही बेटांवर तुरळक हिरवळ आणि लहान-मोठी झुडुपे
दिसत होती. निळ्या-हिरव्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर या बेटांचा कार्स्ट भूप्रदेश
(
karstसातत्याने होत असलेल्या धुपीमुळे खडकांना
प्राप्त झालेला विशिष्ट आकार) फारच सुंदर दिसत होता. या बेटांवर प्राचीन काळापासून
अगदी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मनुष्यवस्ती होती. काही बेटांवर रोमन
साम्राज्यकाळातले बांधकामांचे अवशेषही दिसत होते. मध्ययुगीन व्हेनिस
साम्राज्याच्या
(Republic of Venice) अधिपत्याखाली असताना झालेली बेसुमार
वृक्षतोड, अनिर्बंध चराई आणि जमिनीची धूप यांमुळे या बेटांवरची लोकसंख्या
उत्तरोत्तर कमी होत गेली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही धनाढ्य लोकांनी
या बेटांवरचे भूखंड विकत घेतले. ते आजही त्यांच्या वंशजांच्या मालकीचे आहेत.
आजच्या काळात गोड्या पाण्याची कमतरता आणि नापीक जमीन यांमुळे ही बेटे मनुष्य
वस्तीसाठी अनुकूल नाहीत.

कोर्नाती द्वीप समूहातील एक बेट
व त्यावरचे रोमन कालीन अवशेष
 

बेटाच्या सर्वोच्च जागेवरून दिसणारे दृश्य 
अशाच एका बेटाच्या किनाऱ्यावर आमची बोट थांबली.
इथे २ तास मुक्काम आहे असे सांगण्यात आले. बेटावर उतरताच काही जणांनी पोहण्यासाठीची
तयारी करायला सुरुवात केली. बेटाच्या किनाऱ्याजवळ उथळ पाण्याची डबकी तयार झाली
होती. त्या अतिपारदर्शक पाण्यात उतरण्याचा मोह कुणालाही होईल. मी सहज पाण्यात हात घालून
बघितला आणि पोहण्याचा विचार तिथेच सोडून दिला! त्या थंडगार पाण्यात उड्या
मारणाऱ्या लोकांच्या धाडसाला मनोमन सलाम करत मी बेटावर फिरायला निघालो. इतर बेटांसारखे
हेही बेट खडकाळ होते. बेटाच्या सर्वोच्च जागी काही बांधकामाचे अवशेष दिसत होते.
एखादा रोमन काळातला निरीक्षण मनोरा असावा. मी इतर लोकांसोबत तिथे पोहोचलो. ती जागा
भन्नाटच होती. कोर्नाती मधल्या अनेक बेटांचा नयनरम्य परिसर तिथून न्याहाळता येत
होता. तीनही बाजूंनी खोल कडे समुद्रात उतरत होते. समुद्रावरचा वारा अंगाला झोंबत
होता. मधेच एखादा समुद्रपक्षी वाऱ्याच्या झोतावर गिरक्या मारत पाण्यात सूर मारत होता.
इथे थोडेफार छायाचित्रण करून मी किनाऱ्यावर परतलो. किनाऱ्यावर एक लहानसे उपहारगृह
बांधले होते. तिथेच आमची जेवणाची सोय केली होती. जेवण उरकून थोडावेळ किनाऱ्यावर
फेरफटका मारला आणि बोटीवर परतलो. आसपासच्या आणखी काही बेटांना प्रदक्षिणा घालून
आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आजच्या दिवशी कोर्नाती मध्ये आमची एकाच बोट असल्याने
कुठेच पर्यटकांची गर्दी नव्हती. शांतता सोबतीला असल्याने तिथले सौंदर्य अधिकच
खुलून येत होते.
रोमन काळातील निरीक्षण मनोरा 
काचेसारखा पारदर्शक समुद्र 

संध्याकाळी सहाच्या सुमारास बोट झदारला परतली. सह-प्रवाशांना
अलविदा करून मी झदारच्या किनाऱ्याकडे वळलो. इथला किनारा निसर्गतः खडकाळ असल्याने इथे
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सारखा बंधारा बांधला आहे. बाजूने फिरण्याची किंवा
बसण्याची सोयही आहे. एव्हाना तिथे पर्यटकांची आणि स्थानिक रहिवाशांची लगबग सुरु
झाली होती. या किनाऱ्यावरचे मुख्य आकर्षण म्हणजे
सी-ऑर्गन. किनाऱ्यावरील
बंधाऱ्याखाली ठराविक लांबी-रुंदीचे पाईप बसवलेले आहेत. या पाईपमधून लाटांचे पाणी
जाते तेव्हा विशिष्ट तरंगलांबीचा आवाज निर्माण होतो. लाटांच्या वेगानुसार या
आवाजाचे एक वेगळेच कर्णमधुर संगीत तयार होते. ते ऐकण्यास इथे पर्यटकांची कायम
गर्दी असते. अशा समुद्र-संगीताचा आस्वाद घेत मी तिथच विसावलो. सूर्यास्ताची वेळ
जवळ येत होती. मात्र पश्चिम क्षितिजावर दाटलेल्या मेघाराजांनी सूर्याला बंदिस्त
करून ठेवले होते. तेवढ्यात दोन ढगांच्या फटीतून सूर्यबिंब बाहेर डोकावले. त्याच्या
सोनेरी किरणांनी सारा आसमंत उजळून गेला. एखाद्या चित्रकाराने आपल्या चित्रावर एक
शेवटचा कुंचला फिरवावा आणि निस्तेज वाटणारे ते चित्र अचानक सजीव व्हावे तसेच
काहीसे त्या किनाऱ्यावर घडत होते. एखादा फोटो काढून होतोय तेवढ्यात दुसऱ्या एका
बलदंड मेघराजाने बळेबळे त्या सूर्यबिंबास पुन्हा झाकून टाकले. अवघा आसमंत
व्यापणारी ती सोनेरी प्रभा क्षणात नाहीशी झाली. मीही हताशपणे कॅमेरा बॅगेत ठेवला
आणि हॉस्टेलवर परतलो. 
क्षणभरासाठी ढगांमागून बाहेर पडलेले सूर्यबिंब   
अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा.               

0 thoughts on “नितांतसुंदर क्रोएशिया भाग २ – झदार आणि कोर्नाती द्वीपसमूह

Leave a Reply