नयनरम्य बाली – भाग ७ – बालीतील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य Beautiful Bali – Part 7 – Architectural beauty of Balinese temples

रिज  वॉक आणि राइस टेरेस यांनी माझ्या ऊबुदच्या स्थलदर्शनाची
सुरुवात झाली होती. पैकी राइस टेरेसने काहीसा अपेक्षाभंगच केला होता. आता आसपासची काही
मंदिरे बघायची होती. एव्हाना दुपारचा एक वाजत आला होता. चांगलीच भूक लागली होती. वाटेत
कुठेतरी थांबू असा विचार करत हळू हळू स्कूटर चालवत होतो. एवढ्यात एक भलेमोठे भाताचे
शेत दृष्टीस पडले. इथे काही उतारावरची खाचा पाडलेली जमीन नव्हती. पण तरीही सर्वदूर
पसरलेला पोपटी रंग फारच आल्हाददायक वाटत होता. फोटो काढूया असं म्हणून मी स्कूटर जरा
बाजूला घेतली. तेवढ्यात बाजूच्या उपहारगृहातली तरुणी आत चला असा आग्रह करत बाहेर आली.
एकंदरीत बरं दिसत होतं हॉटेल. मग मी थेट आत शिरलो. भाताचे शेत दिसेल अशी मोक्याची जागा
निवडली आणि निवांत बसलो. दुर्भाग्याने इथल्या मेनूकार्डवर फार काही शाकाहारी पदार्थ
नव्हते. मग तिथल्या वेटरलाच विचारलं
, लगेच काय मिळेल.
गाडो-गाडो हा इंडोनेशियन पदार्थ जवळपास तयारच होता. हा पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये
, तोफू, सलाडची पाने, आणि उकडलेल्या
भाजांचे मिश्रण असते. इंडोनेशियन शाकाहारी जेवणात हा पदार्थ लोकप्रिय आहे. समोरचे
हिरवेगार शेत बघत बघत जेवण केले आणि पुढच्या जागेचा रस्ता नकाशावर शोधू लागलो.  

हिरवीगार भातशेती 

गाडो-गाडो 

आता
वेळ आली होती मंदिरदर्शनाची. बाली जितकं समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे तितकंच
इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरे भारतातल्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी
असतात. मंडप
, गाभारा, कळस, मूर्ती असं काहीच त्यांत नसतं. असते ते एक मोठे प्रांगण. हे प्रांगण तीन भागांत
विभागलेले असते
, ज्यांना मंडल म्हणतात. त्यांपैकी बाहेरचा भाग
म्हणजे निष्टा मंडल किंवा जाबा. हा भाग कमी पवित्र मानला जातो. या भागात बाले कुलकुल
म्हटले जाणारे ढोल लटकवलेले मनोरे असतात. हा ढोल वाजवून गावकर्‍यांना घोषणा करण्यासाठी
एकत्र बोलावले जाते. या भागाचे प्रवेशद्वार हे कमान असलेले असते आणि बाहेर दोन द्वारपाल
असतात. त्यापुढे असते मद्य मंडल किंवा जाबा तेंगाह. या भागाचे प्रवेशद्वार विभाजित
असते आणि त्यावर कमान नसते. याला कांडी बेंतार असे म्हटले जाते. बालीमध्ये सर्वत्र
दिसणारा हा स्थापत्यघटक म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आहे. स्थानिक पुराणानुसार शंकराने
मेरू पर्वत भारतातून बालीमध्ये आणला आणि दोन भागांत विभागला. हे दोन भाग सकारात्मक
आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात कायम संतुलन असावे असा संदेश
देतात. मद्य मंडलात काही ढोल असलेले मनोरे तर काही मंडप असतात. सगळ्यात आतमध्ये असते
उतमा मंडल किंवा जेरोअन. हे सगळ्यात पवित्र मंडल समजले जाते. यात पूर्वजांचे प्रतिनिधित्व
करणारे मनोरे असतात. मंदिरात सर्वत्र आढळणारा स्थापत्यघटक म्हणजे पद्मासन. बहुतेक सगळ्या
हिंदू देवता इथल्या धर्मात पूजनीय असल्या तरी हा धर्म एकेश्वरवादी आहे. यांचा ईश्वर
, ज्याला सांग हयांग विधी वासा म्हटले जाते, तो निर्गुण
व निराकार आहे. त्याला कोणत्याही मूर्तीतून व्यक्त करता येत नाही. म्हणून दगडातून घडवलेले
एक आसन
, ज्याला पद्मासन म्हणतात, सर्वत्र
उभारले जाते. असे मानले जाते की प्रार्थनेच्या वेळी विधी वासा या आसनावर अवतरतो व स्थानापन्न
होतो. सोळाव्या शतकातील एक धर्मगुरू दांग हयांग निरर्था यांनी मांडलेल्या तत्वज्ञानावर
ही मंदिर रचना आधारित आहे. एकंदरीत भारतातील हिंदू घटकांचा प्रभाव असलेली पण स्थानिक
श्रद्धास्थानांचा अंतर्भाव करणारी इथली मंदिररचना फारच इंट्रेस्टिंग आहे.

माझ्या
रूपरेषेतले पहिले मंदिर होते गुनुंग कावी सेबतू. हे मंदिर एका लहानशा टेकडीच्या बाजूला
होते. फारसे प्रसिद्ध नसल्याने इथे गर्दी नव्हती. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता.
सारोंग गुंडाळून मी आत गेलो. एका बाजूला एका तळ्याच्या मध्यात वीणावादन करणार्‍या सरस्वतीची
शुभ्र पांढरी मूर्ती होती. मूर्तीची प्रमाणबद्धता
, अलंकार, चेहर्‍यावरचे पवित्र भाव, सारेच अद्भुत होते. त्या रम्य
वातावरणात ती सुंदर मूर्ती इतकी लोभस वाटत होती की मी तिथेच बराच वेळ फोटो काढत बसलो.
मग मंदिराचे इतर काही भाग बघितले. दुसर्‍या टोकाला अजून एक तळे होते. त्याच्या काठाशी
सजवलेले पद्मासन होते. मागे असलेल्या हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर ते पद्मासन
फारच विलोभनीय वाटत होते. मंदिराच्या उतमा मंडलात पर्यटकांना प्रवेश नव्हता. मग मी
तिथे थोडेफार अजून फोटो काढून पुढच्या मंदिराकडे वळलो.

तळ्याच्या मध्यात असलेली सरस्वतीची मूर्ती 

मंदिरातील कुंड 

मंदिराचा रम्य परिसर 

पद्मासन 

सरस्वतीच्या चेहऱ्यावरचे भाव 

पुढचे
मंदिर होते पुरा तीर्था एमपुल.
Holy Spring Water Temple या नावाने हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. अपेक्षेप्रमाणे इथे बर्‍यापैकी
गर्दी होती. जवळच्या एका झर्‍याचे पाणी इथे एका कुंडातून सदासर्वकाळ वाहत असते. त्याखाली
आंघोळ करून मग आत प्रार्थनेसाठी जायचे असा रिवाज आहे. बघतो तर कुंडात आंघोळ करायला
ही मोठी रांग. शिवाय स्वतःच्या वस्तू ठेवायला लॉकरची वेगळी रक्कम. मी तो विचार सोडून
दिला आणि सारोंग गुंडाळून थेट मंदिरात शिरलो. हे मंदिर तसे प्रशस्त होते. पाण्याचे
कुंड अपेक्षेपेक्षा फारच स्वछ दिसत होते. लोकही शिस्तीत उभे होते. काश भारतात कधी असे
चित्र बघायला मिळेल. मंदिरातले एक द्वार फारच सुंदररित्या सुशोभित केले होते. इथे सेलफी
काढायला लोकांची रांग लागली होती. उतमा मंडलात प्रवेश नव्हताच. पण आतमध्ये पारंपरिक
पोषाखातील काही स्थानिक लोक प्रार्थना करत होते. एक पुजारी त्यांना संबोधित करत होता.
उदबत्त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. प्रत्येकाने आपापले कनांग सारी पूजेकरता आणले
होते. कुठलाही गोंगाट नाही
, घंटांचा खणखणाट नाही, ढकलाढकली नाही. केवळ शांतपणे केली जाणारी प्रार्थना. त्यांचे विधी आणि रिवाज
बघत मी थोडा वेळ थांबलो. फार छान वाटलं.  

कुंडात आंघोळ करणारे पर्यटक 

जवळचे दुसरे कुंड 

प्रार्थना करणारे स्थानिक लोक 

पुढचं
मंदिर होतं पुरा गुनुंग कावी. हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेल्या छेदाष्म थडग्यांसाठी
प्रसिद्ध आहे. उदयान साम्राज्यातील राजा अनक वांगसु याच्या राण्या आणि संतती यांच्यासाठी
असलेली ही थडगी पेरकसान नदीच्या दोन बाजूंनी असलेल्या डोंगरांत कोरलेली आहेत. मंदिराच्या
बाहेर स्कूटर लावली तेव्हा ढग दाटून आले होते. मंदिर नदीच्या खोर्‍यात होते. बर्‍याच
पायर्‍या खाली उतरून जायचे होते. मी खाली उतरु लागलो आणि तेवढ्यात बारीक पावसाला सुरुवात
झाली. पायर्‍या संपल्या आणि समोर एक भाताचे शेत दिसू लागले. दाटून आलेले ढग
, भुभुरणारा पाऊस, लांबून येणारा नदीच्या प्रवाहाचा
आवाज
, हिरवीगार भातशेती, सारेच
विलोभनीय होते. तिथून पुढे अजून काही पायर्‍या उतरून थडग्यांच्या परिसरात पोहोचलो.
उंच ताशीव कड्यांमध्ये गुहा कोरून त्यात मंदिराच्या कळसासारखी शिल्पे कोरली होती.
ते बघून मला अजिंठा-वेरूळची लेणी आठवली. किंबहुना जॉर्डन मधील पेट्रा येथील थडगी
या थडग्यांशी अधिक मिळतीजुळती होती. समोर नदीचा प्रवाह खळाळत होता. काठाने उंच आणि
दाट झाडं होती. एखाद्या घनदाट अरण्यात यावं आणि समोर एखाद्या पुरातन स्मारकाचे अवशेष
सापडावेत तसं वाटत होतं. तिथे थोडेफार फोटो काढले आणि मागे वळलो.

दरीतली भातशेती 

दाट झाडीतून वाहणारी नदी आणि मागची मंदिरे 

छेदाष्म थडगी 

पावसाळी वातावरणात तिथे गूढ वाटत होते 

हिरवीगार दरी 


आता
आजचे शेवटचे मंदिर होते गोवा गजह मंदिर. उघडं तोंड असलेल्या आकाराच्या गुहेसाठी हे
मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा होता. तिकीट काढून आणि सारोंग
गुंडाळून मी आत शिरलो. डाव्या हाताला गुहा होती. फोटोत दिसते त्यापेक्षा ही गुहा लहानच
होती. वाकून मी आत शिरलो. उदबत्त्यांचा धूर पसरला होता. आतली उष्णता
, आर्द्रता, आणि धूर यांमुळे घुसमटायला होत होतं. गुहेत
एका बाजूला गणपतीची मूर्ती होती तर एका बाजूला शिवलिंग होते. आत काही फार वेळ थांबता
येत नव्हतं. मी लगेचच बाहेर आलो. बाहेरचे मंदिर काहीसे इतर मंदिरांसारखेच होते. वेगवेगळ्या
प्रकारचे मनोरे आणि पद्मासन दिसत होते. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भलेमोठे पाण्याचे
कुंड. यात सात देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती गंगा
, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी
अशा भारतातल्या सात नद्यांचे प्रतिनिधित्व करतात. पलीकडे एक वाट एका दरीत उतरताना दिसत
होती. तिथे काही बौद्ध स्तूप आणि लहान मंदिरे होती. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी
बाहेर पडलो.

आज दिवसभर चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे आता जीव थकला होता. मी लगेच होमस्टेवर परतलो. एव्हाना सात वाजलेच होते. थोडा वेळ विश्रांती घेऊन जेवायला बाहेर पडलो. ऊबुद मधला मुख्य बाजार रस्ता हाकेच्या अंतरावर होता. तिथे थोडा वेळ फेरफटका मारून मोक्षा कॅफे नावच्या प्रसिद्ध उपहारगृहात जेवायला गेलो. आतला अॅम्बियन्स छानच होता. बसायला बैठक आणि चौरंगासारखे टेबल होते. मुख्य म्हणजे हे उपहारगृह संपूर्ण वीगन होते. भारताबाहेर अशी जागा सापडणे आधीच मुश्किल. इथे तर स्थानिक आणि पाश्चात्त्य अशा वेगवेगळ्या संपूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल होती. मग त्यातला बालीनीज करी हा पदार्थ मागवला. ही करी तशी थाई करीसारखीच होती. पण मसाले काहीसे वेगळे होते. मनसोक्त जेवून मग मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. उद्या चेक आऊट करायचे होते. मग सामान बांधून ठेवून झोपी गेलो.

गोवा गजह मंदिरातील कुंड आणि नद्यांच्या मूर्ती 

मंदिरातील प्रसिद्ध गुहा 

गुहेतील गणपतीची मूर्ती 

गुहेतील शिवलिंगे 

दरीत उतरणारी वाट 

क्रमशः 

Leave a Reply