नयनरम्य बाली – भाग ६ – मुक्काम पोस्ट ऊबुद Beautiful Bali – Part 6 – In Ubud

नुसा लेंबोंगानची सहल आटोपून मी सनूर पोर्टवर पोहोचलो तेव्हा साधारण सहा वाजले होते. आता कुटामधल्या हॉस्टेलवर जाऊन बॅग घ्यायची होती आणि ऊबुदला जायचे होते. मग लगेचच स्कूटर चालू केली आणि हॉस्टेलच्या दिशेने निघालो. सकाळी मोकळा दिसलेला हा रस्ता आता मात्र वाहनांनी खचाखच भरला होता. अक्षरशः बंगलोर किंवा मुंबईची आठवण व्हावी एवढं ट्रॅफिक होतं. आधीच स्नोर्केलिंगमुळे थकलो होतो. त्यात या ट्रॅफिकने जीव नकोसा केला होता. अखेरीस इंच इंच लढवत दीड तासाने मी हॉस्टेलवर पोहोचलो. रिसेप्शनवर विक्टरच होता. मला इथून ऊबुदला जायचे आहे असं समजताच त्याने मला अजून एका तासाने निघण्याचा सल्ला दिला. बाहेर ट्रॅफिक किती होतं ते मी अनुभवलं होतंच. तशीही मला थोडी विश्रांती हवी होती. मग मी तिथून बॅग उचलली आणि जवळच्या उपहारगृहात जेवायला गेलो. आज परत भात आणि भाज्या खायची इच्छा नव्हती. मग एक पिझ्झा मागवला. जेवण होईपर्यंत नऊ वाजलेच. गुगलवर ट्रॅफिक बघितले. विक्टर म्हणाला तसे एव्हाना ट्रॅफिक कमी झाले होते. मग सुसाट निघालो ऊबुदच्या दिशेने. खरे तर ऊबुदचा रस्ता सनूर पोर्टवरूनच जात होता. किंबहुना सनूर पोर्ट ऊबुद आणि कुटाच्या बरोब्बर अर्ध्या अंतरावर होते. सकाळीच बॅग घेऊन निघालो असतो तर एवढा हेलपाटा पडला नसता. आणि पोर्टवर बोट कंपनीच्या ऑफिसमध्ये बॅग पण ठेवता आली असती. थोडा प्लॅन चुकलाच. असो. 

ऊबुद मधील वैशिष्ट्यपूर्ण राईस टेरेस 
ऊबुद म्हणजे बालीची सांस्कृतिक राजधानी. बालीच्या मध्यवर्ती भागात काहीशा डोंगराळ भागात वसलेले हे शहर इथल्या योग प्रशिक्षण केंद्रांसाठी आणि वीगन खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही प्रसिद्ध मंदिरे, भातशेती, पुरातन राजवाडे आणि वस्तुसंग्रहालये या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. या जागेचा इतिहास अगदी आठव्या शतकापर्यंत जातो. त्या काळी जावा बेटावरून ऋषि मार्कंडेय इथे आले आणि इथल्या दोन नद्यांच्या संगमाजवळ त्यांनी ध्यानधारणा केली. पुढे त्यांनी त्या जागी गुनुंग लेबाह या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. इथल्या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडत. स्थानिक भाषेत उबद म्हणजे औषध. म्हणूनच या जागेला ऊबुद असे नाव मिळाले. पुढच्या चारशे वर्षांत इथे अनेक मंदिरे आणि धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्था बांधल्या गेल्या. त्यामुळे या जागेचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले. चौदाव्या शतकात माजापहीत साम्राज्याखाली आल्यानंतर इथली संस्कृती बहरत गेली. त्या काळात रूढ झालेल्या चालीरीती आजही इथल्या समाजात दिसतात. साधारण विसाव्या शतकात बालीमधले पर्यटन वाढू लागले. ऊबुदचे सांस्कृतिक महत्त्व आणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य यांमुळे ही जागा लवकरच एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनली. 
ऊबुदमध्ये माझा दोन रात्री मुक्काम होता. इथे एक होमस्टे बुक केला होता. पोहोचेपर्यंत साडेदहा वाजले होते. होमस्टेचे यजमान कुटुंब झोपायच्या तयारीत होते. यजमान बाई अगदीच प्रेमळ होत्या. एवढा उशीर झाला होता तरी त्यांनी यथोचित आगत-स्वागत केले. दिवसभरच्या दगदगीने मी पार थकलो होतो. चेक इन करून लगेच झोपी गेलो. सकाळी जरा उशीराच उठलो. आज तसेही इथले आसपासचे स्थलदर्शन करायचे होते. यजमान बाई नाश्ता बनवत होत्या तोपर्यंत मी जरा घर आणि आजूबाजूचा परिसर पहायला निघालो. अगदी टिपिकल बालीनीज पद्धतीचे घर होते. घराच्या प्रांगणातच एक लहानसे मंदिर होते. आपल्याकडे जुन्या वाड्यांत जसे मोठे देव्हारे असतात तसाच काहीसा प्रकार वाटत होता. बालीमधल्या प्रत्येक घरात असे एक मंदिर असते. असे म्हणतात की बालीमध्ये घरे कमी आणि मंदिरे जास्त आहेत. मंदिराच्या पायरीवरच एका पानांच्या परडीवर फुले आणि उदबत्या ठेवलेल्या होत्या. याला कानांग सारी असे म्हणतात. आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो तसे इथे मंदिराच्या किंवा घराच्या बाहेर कानांग सारी ठेवायची पद्धत आहे. घरातले मंदिर अगदी सुबक होते. प्रवेशद्वारावरच एक सुंदर गणपतीची मूर्ती होती. आतमध्ये बरेच मनोरे होते. प्रत्येकावर उतरती छपरे होती. मध्यभागी पद्मासन होते. सगळी रचना अत्यंत सुबक आणि नीटनेटकी होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात नाश्ता तयार असल्याचे बाईंनी सांगितले. काळा भात आणि त्यावर नारळ आणि गुळाचा पाक असा बेत होता. सोबत काही फळे होती. काळा भात बघून माझे जर्मनीत असतानाचे त्याबाबतीतले फसलेले प्रयोग आठवले. नक्की घशाखाली जाईल की नाही याची चिंता वाटू लागली. शेवटी सगळे विचार बाजूला सारून मी पहिला घास खाल्ला. आणि काय चव होती! काळ्या भाताचा सुगंध काहीसा वेगळाच होता. नारळ आणि गुळाच्या पाकामुळे थोडीफार नारळीभातासारखी चव वाटत होती. सगळा बेत मस्तच जमला होता. पोटभर नाश्ता करून मी स्थलदर्शनाला निघालो. 
घरासमोर ठेवलेले कनांग सारी 

यजमानांच्या घरात असलेले मंदिर आणि त्यातले मनोरे 

मंदिराच्या बाहेर असलेली गणपतीची मूर्ती 
ऊबुद म्हणजे निसर्ग आणि संस्कृती यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. माझा पहिला थांबा होता कांपुहान रिज वॉक. हा एक जवळच्या टेकडीवर जाणारा छोटासा ट्रेल होता. चढून जायचे असल्याने ही जागा मी पहिली निवडली होती. टेकडीच्या पायथ्याशी मी स्कूटर लावली आणि वर चढू लागलो. तितक्यात एक सुंदरसे मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूची हिरवळ, खालून वाहणारा नदीचा प्रवाह, आणि मंदिरातली गूढ शांतता, सारेच रम्य वाटत होते. ट्रेल तसा सोपाच होता. अनेक पर्यटक तिथून जात होते. नशीबाने फार गर्दी नव्हती. थोड्याच वेळात टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. इथून शहराचा सुदूर परिसर दिसत होता. आजूबाजूची हिरवाई प्रसन्न वाटत होती. साधारण दोनेक किमी लांबीचा ट्रेल असेल. मी दुसर्‍या टोकापर्यंत पोहचलो. तिथे एक छोटासा कॅफे होता. तिथे बसून एक मस्त कॉफी मागवली. बरेच पर्यटक तिथूनच शहराच्या दुसर्‍या भागात जात होते. मी मात्र स्कूटर टेकडीच्या पायथ्याशी लावलेली असल्याने तिथून परत मागे वळलो. थोडेफार फोटो काढून खाली उतरलो. पुढचा थांबा होता तेगालांग राईस टेरेस. डोंगरउताराला चरे पाडून सपाट जमीन बनवून त्यावर केलेली भातशेती म्हणजे राईस टेरेस. आपल्याकडे उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश या राज्यांत हा प्रकार आढळतो. बालीमधली ही अशा प्रकारची शेती कमालीची प्रसिद्ध आहे. नक्की त्यात काय विशेष आहे ते बघण्यास मी उत्सुक होतो. तिथवर पोहोचलो तर ही तोबा गर्दी! किती तरी वेळ पार्किंगला जागाच मिळेना. शेवटी एका दुकानदाराला जास्तीचे पैसे देऊन त्याच्या दुकानासमोर स्कूटर पार्क केली. राईस टेरेसचेही वेगळे तिकीट होते. एकदाचा आत शिरलो. समोर बघतो तर काय, एक लहानशी दरी होती आणि त्यात अधेमधे चरे पाडून भाताची रोपे लावली होती. मध्येमध्ये लाकडाच्या राहुटया उभारल्या होत्या. पर्यटक चिखलातून चालत होते आणि फोटो काढत होते. मधेच कुठे झोपाळे बांधले होते तर कुठे बदामाच्या आकाराचे प्रोप्स उभारून फोटो स्पॉट बनवले होते. नक्की शेत होते की सहलीची जागा हेच कळेना! आणि निदान दृश्य रम्य असावे तर तसेही काही खास नव्हते. आणि म्हणे वर्ल्ड हेरिटेज साइट! एकंदरीत ही जागा माझ्या खि फार पसंतीस पडली नाही. मी उपचारापुरते दोन-चार फोटो काढून तिथून बाहेर पडलो. 
टेकडीच्या पायथ्याचे मंदिर आणि वर जाणारी पायवाट 

रिज वॉक वरची हिरवाई  

कांपुहान रिज ट्रेल 

कॅफे कडे जाणारी वाट 
राईस टेरेस 
क्रमशः 

0 thoughts on “नयनरम्य बाली – भाग ६ – मुक्काम पोस्ट ऊबुद Beautiful Bali – Part 6 – In Ubud

  1. या आधीच्या भागांप्रमाणेच खूप सुंदर वर्णन, त्याहून सुंदर प्रकाश चित्रे. पुढील भाग लवकर येऊ द्या.

Leave a Reply