नयनरम्य बाली – भाग ४ – ग्रीन बाउल बीच आणि नुसा दुआ Beautiful Bali – Part 4 – Green Bowl beach and Nusa Dua

बालीचा
दक्षिण किनारा म्हणजे एकापेक्षा एक सरस अशा बीचेसची मेजवानी आहे. समुद्र आवडणार्‍या
पर्यटकांसाठी हा भाग म्हणजे जणू स्वर्गच. काल उलूवातू आणि सुलूबान असे दोन क्लिफ बीच
पहिले होते. पण तिथल्या गर्दीने सगळा विचका केला होता. मग आज ठरवलं आधी नीट होमवर्क
करायचा आणि मग शांत आणि सुंदर समुद्रकिनारे हुडकायचे. ब्रेकफास्ट करता करता हॉस्टेलमधल्या
काही पर्यटकांशी बोललो. बहुतेक सगळे सर्फिंग किंवा पार्टिंग करणारे होते. मला त्यांपैकी
काहीच नको होते. मग रिसेप्शनवर असलेल्या व्हिक्टरशी गप्पा मारू लागलो. परवा रात्री
अडीच वाजता यानेच माझे चेक इन केले होते. त्यामुळे त्याच्याशी एव्हाना चांगली ओळख झाली
होती. मला नक्की कशा प्रकारचा बीच हवा आहे हे मी त्याला समजावून सांगितले. मग त्याने
काही जागा सुचवल्या. स्थानिक लोकांशी गप्पा मारल्या की एखाद्या ठिकाणच्या अशा काही
गोष्टी कळतात की त्या कुठल्याच टुरिस्ट गाईडमध्ये सापडणार नाहीत. दिवसभराची रूपरेषा
ठरवली आणि बाइक चालू केली. वातावरण आजही छानच होते.

ग्रीन बाउल बीच 
पार्किंगच्या जागेवरून दिसणारा ग्रीन बाउल बीच 

काल
पार्ककडे जायला जे वळण घेतले होते त्याच्या अलिकडचे वळण घेऊन मी ग्रीन बाउल बीचकडे
निघालो. हा बीच म्हणजे बालीमधला एक सगळ्यात सुंदर पण काहीसा दुर्लक्षित बीच समजला जातो.
हा रस्ता पार्कच्या मागच्या बाजूने जात होता. काल पाहिलेली ती भव्य मूर्ती इथून वेगळ्याच
दृष्टिकोनातून दिसत होती. गरुडाच्या पंखांचा विस्तार इथून चांगलाच नजरेत भरत होता.
एका ठिकाणी थांबून तिथले फोटो काढले. तासाभरात ग्रीन बाउल बीचवर पोहोचलो. हाही क्लिफ
बीचच होता. मात्र क्लिफच्या खाली बर्‍यापैकी रुंद पुळण होती. स्कूटर पार्क करून मी
पायर्‍यांनी खाली उतरायला लागलो. गर्द हिरव्या झाडीतून पायर्‍या खाली उतरत होत्या.
हिरव्यागार डोंगरउतारामुळेच कदाचित या बीचला ग्रीन बाउल बीच म्हणत असावेत. लाटांचा
आवाज घुमत होता. पायर्‍या संपत आल्या आणि समोर बघतो तर काय
, वेगाने आदळणार्‍या लाटा आणि त्यांचे उंच उडणारे तुषार. बीच गेला कुठे? भरतीच्या पाण्याचा आवेग एवढा प्रचंड होता की पाण्याने सगळा बीचच गिळून टाकला
होता. बरेचसे पर्यटक तिथेच हताशपणे पायर्‍यांवर उभे होते. काही जण तसेच माघारी वळत
होते. तसे उजव्या बाजूने थोड्याफार उरल्यासुरल्या वाळूवर जाता येत होते. पण लाटा एवढ्या
उंच होत्या की दोन सेकंदांत माणूस चिंब भिजून जाईल. पाहिल्याच बीचवर भिजायची बिलकुल
इच्छा नव्हती. आता काय
? माझी चांगलीच फजिती झाली होती. पण इथे
आलोच आहे तर थोडा वेळ बसूया असं म्हणून मी तिथेच बसकण मारली. उसळणार्‍या लाटांचे फोटो
काढू लागलो. जागा तर सुंदरच होती. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या सार्‍या छटा तिथे एकवटल्या
होत्या. डोंगरउतारावरच्या झाडांचा गर्द हिरवा रंग समुद्राने जणू उसना घेतला होता. समोरच्या
खडकावर आदळून पाण्याचे तुषार सर्वत्र उडत होते. तिथे बसून मी अगणित फोटो काढले. कॅमेर्‍याची
वेगवेगळी सेटिंग्स वापरुन पाहिली. शेवटी भूक लागल्याचे जाणवताच माघारी वळलो.

वेगळ्या दृष्टीकोनातून दिसणारी पार्कमधली मूर्ती  

भरतीच्या पाण्यात गायब झालेला बीच  
बेभान आदळणार्‍या लाटा 

पुढचा
बीच होता पंडावा बीच. हा तसा मोठा आणि गर्दीचा बीच होता. पण इथे काहीतरी खायला मिळेल
अशा आशेने मी तो निवडला होता. अर्ध्या तासातच तिथे पोहोचलो. रस्ता जिथून खाली बीचकडे
वळत होता त्या वळणावर एक मस्त फोटो स्पॉट बांधला होता. तिथे जरा वेळ थांबलो. समोरचा
अथांग समुद्र फारच सुंदर दिसत होता. थोडीफार गर्दी होती. पण अगदीच कोलाहल नव्हता. मग
खाली उतरून बीचवर पोहोचलो. किनार्‍यालगत असंख्य हॉटेल्स होती. एका लहानशा हॉटेलमध्ये
शिरलो आणि व्हेज नूडल्स मागवले. समोरचा समुद्र बघत जेवण केले आणि पुढच्या बीचकडे निघालो.
हा पुढचा बीच म्हणजे एक लहानसा आडवाटेवरचा बीच होता. गुनुंग पयांग नावाचे एक लहानसे
मंदिर होते. त्याच्या खाली काहीसा खडकाळ असा किनारा होता. इथे तर अक्षरशः कुणीच नव्हते.
समुद्रही शांत दिसत होता. भरती असल्याने पुळण फारशी दिसत नव्हतीच. मात्र त्यावरून चालता
येत होते. वारा मंद सुटला होता. इथे मी एका दगडावर शांतपणे बसलो. घरी एक व्हिडिओ कॉल
केला. तिथली शांतता मनसोक्त अनुभवली आणि नुसा दुआच्या दिशेने निघालो.

पंडावा बीच 

पंडावा बीचकडे जाणारा रस्ता आणि समोर दिसणारा अथांग समुद्र 

पंडावा बीचवरचा फोटो स्पॉट 


अखेरीस सापडलेला शांत समुद्रकिनारा 

इथलं पानी कमालीचं शांत होतं 

नुसा
दूआ म्हणजे बालीमधले पंचतारांकित रिसॉर्ट टाउन. ऐषारामी पर्यटकांसाठी बांधलेली जागा.
इथला परिसर निश्चितच सुंदर होता. रुंद रस्ते
, सुंदर बागा, प्रत्येक चौकात सुरक्षारक्षक असा चोख बंदोबस्त होता. मी इथे आलो होतो ते वॉटरब्लो
नावाची जागा बघायला. इथे खडकांची नैसर्गिक रचना अशी काही बनली आहे की समुद्राचे पाणी
वेगाने आदळते आणि खडकाला असलेल्या भोकांतून कारंज्यासारखे वर उसळते. आज भरतीचा दिवस
असल्याने इथे पाण्याचा खेळ छान बघायला मिळेल अशा आशेने मी तिथवर पोहोचलो. खडकांची रचना
अगदीच वैशिष्ट्यपूर्ण होती. सततच्या पाण्याच्या आघाताने त्या खडकावर सुरेख आकार बनले
होते. आता उसळणारे पाणी कुठे दिसतेय ते शोधू लागलो. पण आजचा सगळा दिवसच फजितीचा होता.
दुपारी नको तेवढा उसळणारा समुद्र आता काहीसा शांत झाला होता. कारंजं कसलं
, पिचकारीतून पाणी उडवावं तसं अधूनमधून खडकातून पाणी वर उडत होतं. काय तरी नशीब
माझं! जिथे शांत बीच हवा होता तिथे समुद्राच्या लाटांनी कहर केलेला. आणि जिथे उंच उसळणारे
पाणी बघायला आलेलो तिथे जलाधिराज विश्राम अवस्थेत गेलेला. असो. भटकंती म्हटली की असे
फजितीचे प्रसंग यायचेच. त्यातही एक वेगळी मजा असते.

पाण्याच्या आघाताने खाडकावर बनलेले सुरेख आकार 

उंच लाटांची नुसती प्रतिक्षाच 


हॉस्टेलवर
परतलो तेव्हा जेमतेम साडेसहा वाजले होते. अजून सगळी संध्याकाळ बाकी होती. मग हॉस्टेलच्या
मागच्या बीचवर गेलो. गुगलवर सर्च करून एक मस्त रेस्तोरंट शोधलं. एक बियर मागवली आणि
बसलो. अंधार पडत आला होतं. जांभळ्या संधीप्रकाशात सारा परिसर रम्य वाटत होता. मग पाड
थाई हा पदार्थ मागवला. हा पदार्थ मूळचा थाई असला तरी सगळ्या दक्षिण-पूर्व देशांत प्रसिद्ध
आहे. जेवण संपवून मी कुटामधल्या मुख्य रस्त्यावर फेरफटका मारायला निघालो. उद्या बालीच्या
जवळच असलेल्या नुसा लेंबोंगान या बेटावर जायचा बेत आखला होता. त्यासाठी एक टुर बूक
करावी लागते. त्याची थोडीफार चौकशी केली. एकंदरीत व्हिक्टरने सांगितलेली कंपनीच सगळ्यात
स्वस्त वाटत होती. मग मी त्यांना फोन करून उद्याचे बुकिंग करून टाकले. उद्या हॉस्टेलही
सोडायचे होते. मग लगेच परत येऊन समान बांधून ठेवले आणि बेडवर आडवा झालो.                 

क्रमशः 

0 thoughts on “नयनरम्य बाली – भाग ४ – ग्रीन बाउल बीच आणि नुसा दुआ Beautiful Bali – Part 4 – Green Bowl beach and Nusa Dua

Leave a Reply