कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण – भाग १ – रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात

भटकंतीमध्ये रमलेला जीव सदैव नव्या जागांच्या शोधात असतो. कधी काळी भटके मित्र किंवा रविवारची पुरवणी एवढेच काही मार्ग होते नव्या जागा शोधण्याचे. मात्र आता तंत्रज्ञानाने सगळे जग अक्षरशः हाताच्या बोटांवर आणून ठेवले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरचे भटकंतीविषयक ग्रुप म्हणजे तर खजिनाच. असाच एकदा फेसबुक चाळत होतो. अचानक एका भटक्या मित्राची पोस्ट पहिली, कुमटा-गोकर्ण बीच ट्रेक! आता हा काय नवीन प्रकार? किल्ले, धबधबे, घाटवाटा, रानवाटा, हिमनद्या, दऱ्याखोरं, असे सगळे ट्रेकिंगचे रुळलेले मार्ग तर परिचयाचे होते. बीच ट्रेक हा प्रकार फारसा परिचयाचा नव्हता. वाटलं, नुसतं बीचवरून काय चालायचं? पण समोरचे फोटो तर फारच भारी होते. मग थोडी अजून माहिती काढली. हा ट्रेक केलेल्यांनी तर NOT TO BE MISSED अशी ग्वाही देऊन टाकली. मग काय, लगेच नोव्हेंबर मधला एक वीकेंड निवडला आणि नेहमीच्या ग्रुप सोबत या ट्रेकसाठी नोंदणी करून टाकली. 

ट्रेकमधला एक निवांत समुद्रकिनारा 
गोकर्ण हे तसे पर्यटनाच्या नकाशावरचे लोकप्रिय ठिकाण. गोव्यासारखेच सुंदर आणि प्रशस्त समुद्रकिनारे, पण तुलनेने कमी गर्दी असे हे ठिकाण. शिवाय मुरुडेश्वर, कारवार, जोग धबधबा अशा आजूबाजूच्या ठिकाणांची सोबत. त्यामुळे गोकर्णला पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असते. त्याच्याच दक्षिणेला, साधारण तीसेक किलोमीटर वर आहे कुमटा. हे अगदी लहानसे गाव. गोकर्णपासून थोडे दूर असलेले विलोभनीय समुद्रकिनारे कुमटा गावाच्या दिशेने वसलेले आहेत. हे सगळे किनारे पाहता यावेत म्हणून या ट्रेकचा मार्ग होता कुमटा ते गोकर्ण. शुक्रवारी रात्री मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेसने आम्ही निघालो. नेहमीप्रमाणे भटक्यांचा ग्रुप जमला की सुरु होतात तशा गप्पा सुरु झाल्या. गाडी मुंबईच्या बाहेर पडली तसा हवेतला गारवा जाणवू लागला. कोकण रेल्वेचा नयनरम्य मार्ग रात्रीच्या अंधारातच पार पडणार होता. गाडी वेळेत पोहोचेल अशी अपेक्षा करत थोडा वेळ गप्पा-टप्पा करून सगळे जण झोपी गेलो. 


ट्रेकचा मार्ग 



सातच्या सुमारास जाग आली. नुकतंच उजाडलं होतं. गाडीने नुकताच गोव्यात प्रवेश केला होता. थिवीम, करमाळी, वगैरे स्थानकं धाडधाड मागे पडत होती. मडगाव आलं तशी गाडी ऐंशी टक्के रिकामी झाली. मग काय, मी पळालो दारात. दारात उभं राहून धावत्या गाडीचा आनंद घेणं यासारखी दुसरी मजा नाही. तो झोंबणारा वारा, वळणावरून गाडी जाताना दिसणारे पुढचे-मागचे डबे, आजूबाजूच्या गावांतली उगाचच ट्रेनकडे बघून हात हलवणारी लहान मुले, गाडी अचानक बोगद्यात शिरली की दाटून येणारा अंधार, सारेच कसे गंमतीदार! वयाने कितीही आकडे ओलांडले तरी यातली गंमत कधी कमी झाली नाही. एकदा तिथे उभं राहिलं की गाडीच्या त्या बेसूर धडधडीतही लय सापडू लागते. पुलावरून गाडी जाताना घुमणारा आवाज एक्स्ट्रा बास सारखा वाटू लागतो. मग अचानक भास होतो, गाडी खरंच “कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी” असं गातेय की काय? मग उगीचच झुक झुक अगीनगाडी वगैरे बालगीतं आठवत राहतात आणि आपण काहीशा वेगळ्याच तंद्रीत रमतो. मग एखाद्या अधिकृत थांबा नसलेल्या मधल्याच लहानशा स्टेशनात गाडी थांबते आणि यादृच्छिक गोष्टींमध्ये रमलेला जीव धडधडत वर्तमानात येतो. एव्हाना गाडी कर्नाटकात शिरली होती. कारवार यायचे बाकी होते. आजूबाजूने नारळी-पोफळीच्या गच्च बागा दिसत होत्या. उतरत्या छपरांची लहान-मोठी घरे मधूनच डोकावत होती. मधूनच एखाद्या खाडीवरच्या पुलावरून गाडी धडाडत जात होती. दूरवर कुठेतरी त्या खाडीच्या पाण्याला पिऊन टाकणारा अथांग समुद्र दिसत होता. एखादी ब्राह्मणी घार ऐटीत पाण्यात सूर मारताना दिसत होती. किनाऱ्यावरच्या कांदळवनात राखी बगळे ध्यानस्थ होऊन मत्स्याराधना करताना दिसत होते. मधेच एखादा केकाटत जाणारा खंड्या त्यांच्या साधनेत व्यत्यय आणत होता. असे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात वेळ मजेत जात होता. 


कुठल्याशा छोट्या स्टेशनात थांबलेली ट्रेन 
म्हणता म्हणता कुमटा स्टेशन आले. गाडीने चांगलाच तासभर उशीर केला होता. लगबगीने सगळे उतरलो. इथून सगळ्यांच्या बॅगा गाडीने मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होत्या. त्यामुळे आम्हाला फक्त खाण्या-पिण्याच्या गोष्टी लहान बॅगेत वेगळ्या काढून मोठी बॅग टेम्पोमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. ही सगळी आवरा-आवर झाली आणि मग आम्ही ओळखपरेडसाठी गोल जमलो. साधारण तीस जणांचा ग्रुप होता. ओळखीसोबत थोडेफार स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार केले आणि नाश्त्याला निघालो. स्टेशनच्या बाहेरच एका टिपिकल दाक्षिणात्य उपहारगृहात शिरलो. तिथे मस्त नाश्ता केला. तिथले केळ्याचे बन्स तर फारच चविष्ट होते. मग तिथून स्थानिक बस पकडून कुमटा बीचवर पोहोचलो. इथून ट्रेक सुरु होणार होता. पुरेसे पाणी आहे की नाही याची खातरजमा करून घेतली. आयोजकांनी हव्या त्या सूचना दिल्या. आणि मग मोरया म्हणत आम्ही ट्रेक सुरु केला. 

स्टेशनबाहेर वाॅर्मिंग अप  

Leave a Reply