अविस्मरणीय रूपकुंड – भाग २ – लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

पहाटे साडेपाचच्या सुमारास आपोआप जाग आली. एरवी साडेसातचा गजर खणखणतो तेव्हा कुठे मुश्किलीने डोळे उघडतात. इथे मात्र कोंबडं आरवताच चुटकीसरशी झोप गायब! निसर्गाच्या जवळ गेलेलं शरीराला बिनचूक कसं काय कळतं कुणास ठाऊक? आपोआप शरीरातल्या सगळ्या क्रिया निसर्गाच्या तालाशी एकरूप होऊ लागतात. तशी बाहेर लोकांची लगबग सुरु झालीच होती. मी उत्साहाने उठलो आणि आवरायला लागलो. ट्रेकला न लागणारे सामान एका वेगळ्या बॅगेत भरून ठेवले. आता खांद्यावरच्या बॅगेचे वजन काहीसे कमी झाले होते. बऱ्याच जणांनी त्यांच्या बॅगा पोर्टरकडे दिल्या होत्या. मलाही वाटत होते पोर्टरकडे बॅग द्यावी म्हणून. पण आधीचे ट्रेक तरी बॅग घेऊन यशस्वीपणे पार केले होते. आताही होऊन जाईल असे म्हणून मी बॅग स्वतःजवळच ठेवली. चहा-नाश्ता करून एकदाचे आम्ही ट्रेक सुरु करायला सज्ज झालो. 

ट्रेकची सुरुवात 
लोहाजुंग म्हणजे रूपकुंड ट्रेकचा बेस कॅम्प. तसा रूपकुंड ट्रेक बराच लोकप्रिय असल्याने इथे ट्रेकर्सची बरीच गर्दी होती. लवकर आवरून झालेले आम्ही तीन-चार जण गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. वातावरण स्वच्छ होतं. त्या प्रसन्न गारव्यात कोवळं ऊन फारच सुखावह वाटत होतं. एका टपरीवर चहाला थांबलो. चहावाल्याशी उगीच हवा-पाण्याच्या गप्पा सुरु केल्या. गेले काही दिवस रोज दुपारनंतर पाऊस पडत असल्याचे त्याच्याकडून  कळले. ट्रेकिंग सकाळी लवकर सुरु करून शक्य तितक्या लवकर पुढच्या कॅम्पवर पोहोचण्याचा अनाहूत सल्लाही त्याने दिला. तेवढ्यात ट्रेक लीडरची हाक ऐकू आली. आम्ही लगेचच बॅगा घेऊन सज्ज झालो. हर हर महादेवची आरोळी ठोकली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. वाट मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने खाली उतरत होती. ट्रेकचा पहिला एक चतुर्थांश भाग उताराचा होता. एका अर्थाने चांगलंच होतं. Acclimatization साठी अशी सोपी सुरुवात असणं नेहमीच चांगलं. काही वेळातच गाव मागे पडलं आणि घनदाट अरण्य सुरु झालं. दूरवर नंदा घुंटी शिखर दिसत होतं. आम्हा ट्रेकर्सची लगबग मिश्कीलपणे पाहत होतं. मधेच एखाद्या सपाट जागी थोडीफार वस्ती आणि शेती दिसत होती. कधी गर्द झाडीतून मंद खळखळ करत वाहणारे झरे लागत होते. रानात अधेमध्ये ऱ्होडोडेंड्रॉन ची लालभडक फुले फुललेली दिसत होती. वाटेत एका वस्तीजवळ जरा वेळ विसावलो. त्या जागेवरून दूरवर डिडना गाव दिसत होते. लोहाजुंगवरून जेवढे खाली उतरलो होतो तेवढेच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वर चढायचे होते. आत्तापर्यंत रमत गमत चाललेला ट्रेक आता खरा इंगा दाखवणार होता. मनाची तयारी करून आम्ही चढणीच्या वाटेला लागलो.

गर्द झाडीतून जाणारी वाट 

ऱ्होडोडेंड्रॉनची  लालभडक  फुले 
हळूहळू चढण तीव्र होऊ लागली. एकेका वळणावर पावले दम खायला अडखळू लागली. एरवी सह्याद्रीत एवढी चढण तासाभरात सहज पार केली असती. पण इथे त्यालाच दोन-अडीच तास लागत होते. वाटेत एक लहानसे हॉटेल लागले. हॉटेल कसले, तीन बाजूंनी दगडांची भिंत रचून त्यावर अंथरलेली ताडपत्री. पण तिथे शीतपेये, चहा-कॉफी, मॅगी, ओम्लेट, पराठे वगैरे सगळ्या गोष्टींची सोय. थकल्या-भागल्या ट्रेकर्ससाठी असे आडवाटेवरचे हॉटेल म्हणजे एक हक्काचा विसावा. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. गरम चहाचे दोन घोट घशाखाली घातले आणि पुढे निघालो. इतक्यात हिमालयातल्या लहरी वातावरणाने त्याचे बदलते रंग दाखवायला सुरुवात केली. इतका वेळ निळंभोर दिसणारं आकाश अचानक काळ्या ढगांनी दाटून गेलं. डिडना यायला अजून किमान अर्धा तास होता. आम्ही चालायचा वेग वाढवला. नशिबाने आता चढण आता फार तीव्र राहिली नव्हती. गावातली घरं लांबून दिसत होती. म्हणता म्हणता भरलेलं आभाळ गळू लागलं. थंडगार थेंब अंगावर पडू लागले. घामाने आधीच भिजल्या अंगावर थंडगार पाणी पडू लागल्याने हुडहुडी भरू लागली. आम्ही जवळपास पळत पळतच गाव गाठले. एकदाचे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी चहावाल्याने सांगितलेला वातावरणाचा अंदाज खरा ठरताना दिसत होता. पुढचे सगळे दिवसही असाच अवचित पाऊस कोसळणार की काय या भीतीने आम्ही थोडे धास्तावलो होतो. पण हिमालय म्हटल्यावर असे काहीतरी घडायचेच असे म्हणून जे होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा अशी मनाची समजूत घातली.   

इथून पुढे चढण तीव्र होऊ लागली 
विसाव्याची जागा 
गावातल्या एका टुमदार दुमजली घरात आमचा मुक्काम होता. हिमालयातल्या ट्रेकमध्ये पक्क्या घरात अंथरूण-पांघरूण घेऊन झोपायची सोय म्हणजे तर ऐषआराम! मुक्कामाची सोय बघून आम्ही सगळे एकदमच खुश झालो. ओले कपडे बदलून जरा वेळ विश्रांती घेतली. तोपर्यंत जेवण तयार झालेच होते. त्या थंड पावसाळी वातावरणात गरमागरम राजमा-चावल स्वर्गीय वाटत होते. जेवणानंतर मस्त गप्पांचा फड रंगला. ग्रुपमधले बहुतांश सगळे दर्दी ट्रेकर्स होते. ट्रेकिंगमधले अनुभव एकमेकांसोबत शेअर करण्यात जो आनंद असतो तो दुसऱ्या कशात नसावा. एव्हाना तर ग्रुपमधल्या लोकांची टोपणनावंही तयार झाली होती. चेष्टा-मस्करी आणि गप्पांमध्ये ती संध्याकाळ छानच गेली. सातच्या सुमारास रात्रीचे जेवण आटोपून सगळेजण निद्राधीन झालो. 
डिडना गाव आणि तिथले रम्य वातावरण   
क्रमशः 

Leave a Reply