बर्फाळलेले आईसलँड – भाग ५ – आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता
हॉस्टेलमधून बाहेर पडलो. जवळच्याच एका कार रेंटल सेंटरवर गेलो आणि एक गाडी
भाड्याने घेतली. मॅगीचे ड्रायव्हिंग उत्तमच होते. पण आम्ही मुख्य रस्त्यावर आलो
आणि अचानक एक गाडी थेट समोरून मोठ्याने होर्न वाजवत येऊ लागली. आम्हाला काही
कळेनाच! तेवढ्यात फिलीप ओरडला,
“we are on the wrong side of the road!!” मॅगीचा
ड्रायव्हिंग अनुभव ब्रिटनमधला असल्याने सवयीनुसार तिने गाडी रस्त्याचा डाव्या
बाजूने चालवायला घेतली होती. पुढे बसलेली क्लाराही ब्रिटीश असल्याने तिलाही त्यात
काही वावगे वाटले नव्हते. अखेरीस तिने पटकन गाडी थांबवली आणि रिवर्स घेऊन उजव्या
बाजूला घेतली. आमचा तर अगदी जीवच भांड्यात पडला. त्या रस्त्यावर फार वर्दळ नव्हती
म्हणून नशीब. नाहीतर आमची ट्रीप थेट पोलीस स्टेशनमध्ये संपवावी लागली असती! मॅगीने
गाडी सुरु केली की तिला रस्त्याच्या उजव्या बाजूकडे नेण्याची सूचना करायची असा
अघोषित नियमच मग बनून गेला.

सुवर्ण वर्तुळ – थिंगवेलीर, गल्फोस, आणि गेसीर 
थोड्या वेळातच आम्ही मुख्य हायवेवर आलो. रस्ता तसा मोकळाच होता. थिंगवेलीर नॅशनल
पार्क, गल्फोस धबधबा, आणि गेसीर येथील गरम पाण्याचे झरे अशी तीन ठिकाणं आज आमच्या
यादीमध्ये होती. ही सारी ठिकाणं रिकयाविक पासून साधारण ६०-७० किमीच्या परिघात असून
एका दिवसाच्या वर्तुळाकार फेरीत बघता येतात. म्हणूनच या ठिकाणांना मिळून सुवर्ण वर्तुळ
असे संबोधले जाते. या सगळ्या जागा उत्तम रस्त्यांनी रिकयाविकला जोडलेल्या आहेत.
आमचा पहिला मुक्काम होता थिंगवेलीर नॅशनल पार्क. वर-खाली होणाऱ्या भूप्रदेशातून
सुरेख वळणं घेत रस्ता पुढे सरकत होता. दूरवर दिसणारी पर्वतराजी, आजूबाजूची हिरवी
कुरणे, आणि त्यातली ल्युपिनची फुले त्या रस्त्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होती. आकाश
ढगाळलेलेच होते. या देशातल्या मुक्कामाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी सूर्य
पहिला होता. त्यानंतर पुढचे तीन दिवस काही सूर्यदर्शन झाले नव्हते. आजचे वातावरण
पाहता तशी अपेक्षाही करण्यात काही अर्थ नव्हता. अशाच राखाडी वातावरणात आजचे
 स्थलदर्शन होणार अशी मनाची समजूत घालून मी आजूबाजूच्या
निसर्गाचा आस्वाद घेऊ लागलो.

रम्य महामार्ग 
आता दूरवर एक भलामोठा तलाव दिसू लागला. थिंगवेलीरच्या जवळ आल्याची ती खूण होती.
Thingvallavatn या नावाने ओळखला जाणारा हा तलाव आईसलँडमधला सर्वात मोठा तलाव आहे. आम्ही गाडी
थांबवून खाली उतरलो. या तलावाच्या काठी अनेक कॅम्पसाईट्स आहेत. स्कुबा डायविंग आणि
स्नोर्केलिंग साठी हा तलाव प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठी थोडा वेळ फोटोग्राफी करून
आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात थिंगवेलीरच्या मुख्य पार्किंग जागेवर आम्ही गाडी
पार्क केली आणि आतमध्ये शिरलो. तसे ते पार्क बरेच मोठे आहे. मात्र त्यातले प्रमुख
आकर्षण म्हणजे मिड-अटलांटिक रिज. अटलांटिक समुद्राच्या बरोब्बर मध्यात दक्षिणोत्तर
पसरलेली ही रांग उत्तर अमेरिकन आणि युरेशियन भूप्रतालांना विभाजित करते. ही रांग
बहुतांश पाण्याखाली असली तरी या रांगेची काही उंच शिखरे काही बेटांवर पाहता येतात.
आईसलँड हे त्यातलेच एक बेट. आईसलँडमध्ये ही रांग अगदी सहज जाता येईल अशा भूप्रदेशात
असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. थिंगवेलीर मध्ये ही पर्वतरांग आणि दोन
भूप्रतलांमधली दरी अगदी स्पष्टपणे पाहता येते. भूवैज्ञानिकांसाठी तर ही जागा
म्हणजे पर्वणीच! निर्देशित मार्गावरून आम्ही जाऊ लागलो. म्हणायला पर्वतरांग असली
तरी इथे तर एका रेषेत जाणाऱ्या दोन टेकड्या दिसत होत्या. एक छोटी वाट त्यांच्या
मधल्या दरीतून जात होती. तसे ते भूदृष्य अगदीच सामान्य होते. पण त्यामागचे
भूवैज्ञानिक सत्य तितकेच रोमांचक होते. डाव्या बाजूची टेकडी ही उत्तर अमेरिकन तर
उजव्या बाजूची टेकडी युरेशियन भूप्रतलाचे प्रतिनिधित्व करत होती. आणि या दोन टेकड्यांच्या
मधून चालणारे आम्ही चक्क दोन महाप्रतलांच्या मधून चालत होतो. इथला एक अन् एक दगड लाखो
वर्षांपूर्वी घडलेल्या भूप्रतलांच्या हालचालींची गाथा सांगत होता. किंबहुना त्या
हालचाली आजही घडत आहेत. ही दरी वर्षाला २.५ सेमी या वेगाने रुंदावते आहे. कदाचित
पुढच्या काही लाख वर्षांनी ही जागा आज आहे तशी नसेल. अचंबित करणाऱ्या निसर्गापुढे
मानवी आयुष्याच्या क्षुद्रतेची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. 
थिंगवेलीरचे महत्त्व नुसतेच भौगोलिक नाही तर ऐतहासिकही आहे. इसवी सनाच्या दहाव्या
शतकात जसजशी इथे लोकवस्ती वाढू लागली तसतशी एका स्थिर राजकीय व्यवस्थेची गरज भासू लागली.
इसवी सन ९३० मध्ये थिंगवेलीर येथे पहिली संसद भरली. त्यास
Althing असे
म्हणतात. ही घटना म्हणजे आईसलँडच्या राष्ट्रीय अस्मितेचा उगम मानली जाते.
कालांतराने ही संसद आईसलँडमधली सर्वोच्च राजकीय व विधीय संस्था बनली. थिंगवेलीरचा
हा परिसर त्या साऱ्या घटनांचा मूक साक्षीदार आहे.

मिड अटलांटिक रिज 
आता पोटात कावळे ओरडू लागले होते. हॉस्टेलमधला नाश्ता सात वाजता तयार नसल्याने
काही न खाता पिताच निघालो होतो. आता मात्र एका गरमागरम कॉफीची तीव्र इच्छा होत
होती. दरीतले तत्त्वचिंतन आटोपते घेऊन मी पार्किंगच्या जागेवर परतलो. इथे केवळ छोट्या
मशीनमधली कडवट कॉफी उपलब्ध होती. खायला तर काहीच नव्हते. एवढी सुप्रसिद्ध जागा आणि
खाण्या-पिण्याची सोय नाही? मला जरा आश्चर्यच वाटले. पण आता शरीराला उर्जा हवी
होती. मी मुकाट्याने एक कुकीजचा पुडा आणि कॉफी घेतले आणि घशाखाली उतरवले. युरोपियन
लोकांची खाद्यसंस्कृती एव्हाना माझ्या अंगवळणी पडली होती. पण प्रचंड भूक लागलेली
असताना मनासारखे खायला नाही मिळाले कि होणारी चिडचिड काही थांबवता येत नाही. आपण
भारतीय लोक एकंदरीतच अन्नग्रहण हा प्रकार जरा जास्तच मनावर घेतो. इथे युरोपात लोकं
काहीही खाऊन भूक भागवतात. या विषयावर कदाचित अजून एक लेख लिहता येईल. असो.

दरीत अदृश्य होणारा पाण्याचा प्रवाह 
आमचा पुढचा मुक्काम होता गल्फोस धबधबा. सुवर्ण वर्तुळातले हे एक महत्त्वाचे
पर्यटन स्थळ. थिंगवेलीर वरून साधारण अर्ध्या तासात आम्ही गल्फोसला पोहोचलो.
स्कोगाफोस सारखा हा धबधबा काही सहज दृष्टीस पडणारा नव्हता. मात्र दूरवरून येणारा
पाण्याचा प्रचंड आवाज आणि हवेतली विलक्षण आर्द्रता धबधब्याचे सानिध्य सूचित करत
होती. पार्किंग च्या जागेपासून धबधब्यापर्यंत जायला लहानशी वाट बांधली होती. आम्ही
त्यावरून धबधब्याकडे जाऊ लागलो. थोड्या वेळातच दूरवरून वाहत येणारा नदीचा प्रवास
दिसू लागला. आम्ही चालत होतो ती जागा थोडीशी उंचावर असल्याने आजूबाजूचा बराच परिसर
दृष्टीक्षेपात येत होता. पण नदीचा पुढे जाणारा प्रवाह काही दिसत नव्हता. एका जागी
तो प्रचंड जलप्रवाह जणू काही धरणीच्या उदरात लुप्त होत होता! थोडं पुढे जाताच
समोरची खोल दरी दिसू लागली. दरीत घुमणारा कोसळणाऱ्या पाण्याचा प्रचंड आवाज कानांवर
आदळत होता. गुरुत्वाकर्षणाच्या बंधनातून मुक्त होऊन असंख्य जलकणांनी आसमंतात फेर
धरला होता. जेमतेम तीसेक मीटर रुंद असणारी ती दरी नदीच्या प्रवाहाला नव्वद
अंशांच्या कोनात छेदत होती. अशा वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे आम्ही जेथे उभे होतो
तिथून तो धबधबा दिसतच नव्हता. केवळ त्याचा आवाज त्याचे अस्तित्व जाणवून देत होता.
दरीच्या काठाकाठाने जाणारी ती वाट धबधबा दिसेल अशा ठिकाणी जात होती. त्या प्रचंड
उर्जास्रोताला डोळे भरून पाहता यावं एवढाच ध्यास आता लागला होता. निसरड्या वाटेवरून
तोल सावरत एकदाचे त्या दरीमध्ये डोकावणाऱ्या दरडीवर जाऊन पोहोचलो. पुढचे दृश्य तर
डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. फेसाळलेले पाणी स्वतःला दरीमध्ये झोकून देत होते.
पाण्याच्या प्रवाहापुढे एवढीशी वाटणारी ती दरी त्या उर्जेला मोठ्या ताकदीने स्वतःमध्ये
सामावून घेत होती. काश  
मनातल्या विचारांचं
काहूर ताब्यात घेणारी अशी एखादी दरी असती. काही क्षण तिथे शांत उभं राहून मनातले
यादृच्छिक विचार त्या प्रवाहासारखे एखाद्या दरीत विसर्जित करता येतात का ते पाहू
लागलो. पण असे सहजासहजी विसर्जित होतील ते विचार कसले! तितक्यात कोणाचातरी कॅमेरा हातातून
सटकला आणि धबधब्यात विसर्जित झाला. बिचाऱ्या पर्यटकाचा किती हिरमोड झाला असेल याची
कल्पना करून मलाच फार वाईट वाटायला लागलं. आपला कॅमेरा सुरक्षित आहे ना याची उगाच
खातरजमा केली आणि तिथून पार्किंगच्या जागेकडे परत यायला निघालो.

गल्फोस धबधबा 
आता आम्ही गाडी वळवली गेसीर गावाकडे. मॅगीला आता रस्त्याचा उजव्या बाजूने गाडी
चालवणे बऱ्यापैकी अंगवळणी पडले होते. मधूनच तिचा डावा हात खिडकीवर आपटत होता.
त्यावर आमची मस्करीपण सुरु होती. मी आणि फिलीप जगातल्या उत्तमोत्तम ट्रेकिंगच्या
जागांविषयी चर्चा करत होतो. मी त्याला हिमालयातल्या आणि सह्याद्रीतल्या ट्रेकिंगविषयी
अगदी भरभरून सांगत होतो. मेक्सिकोमधल्या काही अप्रतिम जागांविषयी माझ्या ज्ञानात
भर पडत होती. क्लारा आणि मॅगी त्यांच्या पुढच्या सहलीविषयी चर्चा करण्यात गुंतल्या
होत्या. एवढ्यात गेसीर आलंच. हे गाव इथल्या ज्वालामुखीय गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी
प्रसिद्ध आहे. जमिनीवरचे पाणी झिरपत खोलवर जाते आणि तप्त खडकांच्या व मॅग्माच्या संपर्कात
येते. तिथे प्रचंड तापलेले पाणी आणि वाफ वाट मिळेल तसे वर सरकू लागतात. एखाद्या ठिकाणी
नैसर्गिक पोकळी सापडली की त्यातून हे पाणी वाफेसकट प्रचंड वेगाने वर उसळी घेते.
जमिनीखालचा पाण्याचा प्रवाह सतत वाहता असेल तर ठराविक वेळेच्या अंतराने वर उसळणारे
असे कारंजे बघायला मिळते. साधारणपणे जिथे ज्वालामुखीय हालचाली जास्त असतात तिथे
अशा प्रकारची गरम पाण्याची कारंजी बघायला मिळतात. उत्तर अमेरीकेतील येलोस्टोन
नॅशनल पार्क यासाठी प्रसिद्ध आहे. गेसीरमध्ये असणाऱ्या या झऱ्यांमुळेच या झऱ्यांना
इंग्रजीमध्ये गीझर हा शब्द रूढ झाला. किंबहुना आज आपल्या स्नानगृहात आढळणाऱ्या
पाणी तापवणाऱ्या यंत्राला गीझर म्हटले जाते त्याची व्युत्पत्ती याच ठिकाणाशी निगडीत
आहे!

गेसीरमधला वाफाळलेला परिसर 
गेसीर मधली कारंजी अगदी रस्त्यातून दिसतील अशा अंतरावर होती. आम्ही गाडी पार्क
करून तिथे जायला निघालो. नशीबाने आकाशातले ढगांचे आवरण थोडे विरळ झाले होते.
ढगांच्या फटीतून वाट काढत जमिनीकडे झेपावणारी सूर्यकिरणे वातावरणात एक वेगळाच
उत्साह निर्माण करत होती. त्या भागात एकूण चार कुंडे होती. प्रत्येक कुंडाच्या शेजारी
त्यातल्या पाण्याचे तापमान एका फलकावर लिहले होते. कुठे ८० अंश सेल्सियस तर कुठे
९५ असे ते फलक होते. कुठेही पाण्यात हात घालू नये अशा स्पष्ट  सूचना लिहलेल्या होत्या. त्या सगळ्या परिसरातूनच
वाफा बाहेर पडत होत्या. उसळणाऱ्या कारंज्यांची वारंवारिता सतत बदलत असते. जमिनीखालचा
पाण्याचा प्रवास बदलला तर एखादे कारंज उसळणे बंद होऊ शकते. तसेच नवी कारंजी
निर्माणही होऊ शकतात. तिथल्या मुख्य कारंज्याची वारंवारिता ४ ते ५ मिनिटाला एकदा
अशी होती. आम्ही त्याच्यापुढे जाऊन कारंज्याची वाट पाहू लागलो. मी कॅमेरा तयार
ठेवला. काही मिनिटातच त्या कुंडातून वाफा यायला सुरुवात झाली. आणि क्षणार्धातच
पाण्याचा एक स्तंभ उंच झेपावला. काही सेकंद ते कारंज फुत्कारत राहिले आणि शेवटी
शांत झाले. निसर्गाचा तो चमत्कार पाहून सारे पर्यटक भारावून गेले होते. त्या
कारंज्याकडे पाहता पाहता मला फोटो काढायचे भानच उरले नव्हते. मी आणखी ५ मिनिटे
थांबून पुढच्या कारंज्याचे मनसोक्त फोटो काढले. थोडा वेळ त्या परिसरात फेरफटका
मारून आम्ही गाडीकडे परतलो. 

गरम पाणी वाफ यांचे कारंजे 
एव्हाना संध्याकाळचे चार वाजत आले होते. तासाभरात आम्ही रिक्याविकला पोहोचलो. फिलीपचे
विमान रात्री अकराचे होते. तर माझे दुसऱ्या दिवशी पहाटे सहाचे. क्लारा आणि मॅगी आईसलँडमध्ये
अजून काही दिवस राहणार होत्या, मात्र रिकयाविकमधला त्यांचा शेवटचा दिवस होता. या
नवीन  
दोस्तांना फेसबुकवर अॅड करून आणि अलविदा
करून मी हॉस्टेलवर परतलो. जवळच्याच पिझ्झेरीयामध्ये जाऊन एक छान पिझ्झा मागवला.
पेटपूजा करून थोडा वेळ शहरात एक फेरफटका मारला. आता घरी परतायचे वेध लागले होते.
जर्मनीमध्ये तापमान ३५ अंश सेल्सियसच्या वर गेल्याच्या बातम्या वाचनात आल्या
होत्या. त्यामुळे होणाऱ्या तापमानबदलाची मनाशी तयारी करत मी सामानाची बांधाबांध
करू लागलो. थोडा वेळ झोप काढून मी पहाटे चारच्या सुमारास विमानतळाकडे जायला
निघालो. आज मी निघायच्या दिवशी लख्ख उन पडलं होतं. त्या ‘कोवळ्या’ उन्हात
सुस्तावलेल्या रिकयाविकचा मी विमानाच्या इवलाश्या खिडकीतून मी निरोप घेतला. निसर्गाचे
आणि मानवी संस्कृतीचे एक अनोखे रूप आठवणींच्या गुलदस्त्यात कायमचे बंदिस्त झाले
होते. 

गेसीरच्या आसपासचा रम्य परिसर 

समाप्त
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *